काँग्रेसकडे ‘वैचारिक कल्पकता’ नाही म्हणूनच..
‘विद्वानांचा विरंगुळा’ हा अग्रलेख (४ ऑगस्ट) वाचला. राष्ट्रवाद आणि हिंदुत्व यांना विभागणारी विचाररेषा धूसर होऊन कधी हे मुद्दे भारतीय समाजमनात एकरूप झाले, हे काँग्रेसला कळलेच नाही. वास्तविक देशपातळीवरच नव्हे, तर जागतिक स्तरावरदेखील एवढी राजकीय उलथापालथ होत आहे की, कालची विचारधारा ही आज निर्थक वाटू लागत आहे. लवचीकता- जी आधी राजकारणात शिवीसम समजली जायची, ती आज विचारधारेचा गुणविशेष समजली जाते! काँग्रेसच्या विध्वंसक अधोगतीचे मुख्य कारण म्हणजे, त्यांना परिस्थितीनुरूप स्वत:मध्ये बदल घडवून आणणारी न उमगलेली वैचारिक कल्पकता (लवचीकता) होय!
भाजपला सत्ताखुर्ची मिळवून देण्यामध्ये हिंदुत्ववादाचा सिंहाचा वाटा होता, हे कोणीही नाकारू शकत नाही. हिंदुत्व जरी काँग्रेसची विचारधारा नसली, तरी काँग्रेसची धर्मनिरपेक्षता एवढी अतिरेकी असते, की त्यास हिंदूविरोधी दाखवून देण्यात भाजपला विशेष मेहनत करावी लागली नाही. एवढा मोठा पक्ष जर इतक्या वर्षांनीही नेतृत्वासाठी एका परिवारापलीकडे पाहायला तयार नसेल, तर शेवटी तो परिवारच पक्ष म्हणून उरण्याचा दिवस उजाडणे दूर नाही! राजकीय व्यभिचार करण्याचे वय काँग्रेसमधील ज्येष्ठांचे राहिले नसले, तरी महत्त्वाकांक्षा बाळगणारे तरुण नेते मात्र आजच्या काँग्रेस नेतृत्वाच्या अकार्यक्षमतेला माफ करत नसल्याचे पाहायला मिळत आहे. आज काँग्रेसला केवळ आपल्या गाडीचा चालकच बदलण्याची गरज नाही, तर एक वेगळा मार्ग घेऊन भाजपला गाठू शकणारा वेग निर्माण करणे आवश्यक आहे.
– अजित कवटकर, अंधेरी (मुंबई)
घराणेशाहीचा बाणा सोडून संवाद हवा..
‘विद्वानांचा विरंगुळा’ हा अग्रलेख (४ ऑगस्ट) वाचला. काँग्रेसची सत्ता गेली, सतत पराभव झाले म्हणून नेते सोडून गेले हे खरे नाही. नेते सोडून गेले व जात आहेत यामागचे खरे कारण म्हणजे पक्षास दिशा नाही, हे अग्रलेखातील म्हणणे योग्यच आहे. खरे म्हणजे, भाजपचे नेते पक्षवाढीसाठी मेहनत घेत असले व पद्धतशीर प्रयत्न करीत असले तरी, काँग्रेसमधीलच अनेकांना पक्षात घेऊन भाजपची झालेली वाढ (आणि अनेक राज्यांत मिळालेली सत्ता) ही भाजपची खरी ‘वाढ’ नसून त्या पक्षाला आलेली ‘सूज’ आहे. ती काँग्रेस पक्षातील नेत्यांमुळे आली आहे, हे काँग्रेसमधील वरिष्ठांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. यात काँग्रेसमधील तरुण नेतेही आले. या ज्येष्ठ व तरुण नेत्यांना काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात का जावेसे वाटते, यावर मंथन होण्याची गरज आहे. सत्तेची सवय झालेले काँग्रेसी नेते ज्या पक्षाची सत्ता आहे त्या पक्षाच्या वळचणीला जाणारच. परंतु प्रश्न आहे तो या नेत्यांमधील ‘कार्यकर्ता’ जागृत करण्याचा व त्यांना स्वपक्षात थोपवून त्यांच्यात भविष्यात काँग्रेसलाही पूर्वीचे दिवस पुन्हा येऊ शकतात हा विश्वास जागवण्याचा. त्यासाठी काँग्रेसमधील वरिष्ठांना घराणेशाहीचा बाणा सोडून पक्षातून जाऊ पाहणाऱ्या नेत्यांशी व तरुणांशी संवाद करावा लागेल. अजूनही काँग्रेसच्या विचारांना, तत्त्वांना मानणारा फार मोठा वर्ग आहे, ज्याला अजूनही आशा आहे की, काँग्रेसला पूर्वीचे दिवस येऊ शकतात. पण त्यासाठी, अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे, ‘सोनिया वा राहुल वा प्रियंका या कोणा गांधीस आधी बाह्य़ा सरसावून राजकारणाच्या दलदलीत उतरावे लागेल.’
– मिलिंद यशवंत नेरलेकर, डोंबिवली पूर्व (जि. ठाणे)
काँग्रेसला ‘नरसिंह रावां’सारख्या नेत्यांची गरज!
‘विद्वानांचा विरंगुळा’ हे संपादकीय (४ ऑगस्ट) वाचले. संपादकीयात- ‘काँग्रेस व भाजप या दोहोंत फरक आहे तो पक्षाची मोटार सतत सुरू राहील याची तजवीज करणाऱ्या नेतृत्वाचा,’ असे म्हटले आहे. अमित शहा किंवा जे. पी. नड्डा- या दोघांचे ‘काँग्रेसमुक्त भारत’ हे ध्येय आहे व त्यासाठी त्यांना झटावे लागत आहे. काँग्रेसच्या वर्तमान नेतृत्वाला राजकीय संघर्षांची तोंडओळखदेखील असण्याचे कारण नाही. त्यात, भाजपच्या समाजमाध्यमी हल्ल्यापुढे ते हतबल झालेले दिसते आहे. तसेच मोटारीच्या पहिल्या रांगेत बसलेल्या विद्वानांचीदेखील काँग्रेसची धुरा स्वत:च्या खांद्यावर वाहून नेण्याची क्षमता नाही. त्यामुळे काँग्रेसला आज आवश्यकता आहे ‘नरसिंह राव’ यांच्यासारख्या नेत्याची. परंतु आजच्या काँग्रेस संस्कृतीत अशी व्यक्ती मिळणे कठीण!
– शैलेश न. पुरोहित, मुलुंड पूर्व (मुंबई)
प्रसंगी तुरुंगात जाण्याची तयारीही ठेवावी लागेल!
‘विद्वानांचा विरंगुळा’ हा अग्रलेख (४ ऑगस्ट) वाचला. काँग्रेसला आजही दखलपात्र आणि देशव्यापी असे जनसमर्थन आहे. काँग्रेसविरोध या मुद्दय़ावर निर्माण झालेल्या प्रादेशिक पक्षांच्या मर्यादाही स्पष्ट होत असल्याने काँग्रेसचे जनसमर्थन हळूहळू वाढत आहे. खरा प्रश्न आहे तो पक्षनेतृत्व आणि आक्रमक विरोधाचा. पक्षातील नेतृत्वपोकळी तातडीने भरली पाहिजे. अनेक वर्षे सत्तेत राहिल्याने जनतेच्या प्रश्नांवरील आंदोलनाबाबत काँग्रेस आणि बरेच प्रादेशिक पक्ष अनभिज्ञ आहेत. त्यांना याबाबत भाजप आणि डाव्या पक्षांप्रमाणे सातत्याने जनतेसाठी रस्त्यावर उतरावे लागेल, मग ‘देशद्रोही’ म्हणून संबोधले जाण्याची, प्रसंगी तुरुंगात डांबले जाण्याची तयारीही ठेवावी लागेल. जनतेच्या प्रश्नांवरील आंदोलने हे लोकशाहीचे अभिन्न अंग आहे आणि त्यास देशद्रोही संबोधण्याची प्रथा वेगाने रुजवली जात आहे. देशाची अर्थव्यवस्था, राज्यघटना आणि घटनात्मक संस्था यांच्या रक्षणासाठी आंदोलन करण्यासाठी सद्य:स्थिती पोषक आहे. यासाठी धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही मूल्ये याआधारे डाव्या आणि पुरोगामी पक्ष/ संघटना यांना बरोबर घेण्याचा काँग्रेसने गांभीर्याने विचार केला पाहिजे. भाजपने विरोधी पक्ष म्हणून नेमके हेच केले होते. सध्या गरज आहे ती विद्वानांपेक्षा सामूहिक नेतृत्व आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची. सरकारतर्फे विरोधी पक्ष आणि संघटनांच्या होत असलेल्या मुस्कटदाबीला जाब विचारण्यासाठी अशा व्यापक एकजुटीने राजकीय पर्याय निर्माण करण्यासाठी काँग्रेसने नेतृत्वपोकळी तातडीने भरण्यास पर्याय नाही.
– अॅड. वसंत नलावडे, सातारा
हा अन्य भाषांचा अवमान नव्हे काय?
‘विशिष्ट विचारधारेच्या लोकांचा संस्कृतला विरोध!’ ही बातमी (लोकसत्ता, ४ ऑगस्ट) वाचली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नक्की कोणत्या विचारधारेच्या लोकांचा संस्कृतला विरोध आहे, हे सांगायचे टाळून संदिग्धता निर्माण केली आहे. त्यांनी या विचारधारेचा उल्लेख करायला हवा होता. तसेच तो विरोध कधीपासून होत आहे आणि का होत आहे, याचे विश्लेषणसुद्धा करायला हवे होते. संस्कृत भाषा ही फिनिक्स पक्ष्यासारखी आहे, हे विधान करून या भाषेची ‘राख’ झाल्याची म्हणजे मृत झाल्याची वस्तुस्थितीच ते सरळसरळ मान्य करीत आहेत. ही भाषा किती महान आहे, हे सांगण्याआधी त्यांनी पुढील प्रश्नांची उत्तरे दिली असती तर बरे झाले असते : (अ) संस्कृतसारखी एवढी महान भाषा भारतात अस्तित्वात असताना संविधानात उल्लेख केलेल्या २२ प्रमुख भाषा आणि सुमारे १९,५०० बोलीभाषा का अस्तित्वात आल्या? (ब) संस्कृत भाषा शिकण्यासाठी शूद्र/अतिशूद्रांना (म्हणजे आजचे अनुसूचित जाती/जमाती आणि ओबीसी) यांच्यावर कोणत्या विचारधारेच्या लोकांनी आणि कोणत्या कारणाने बंदी घातली होती? अगदी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनासुद्धा संस्कृत भाषा शिकवण्यास विरोध केला गेला. असे का झाले? (क) अशी बंदी घातल्यानेच संस्कृत भाषा एका विशिष्ट जातीतच कुंठित झाली आणि ती समस्त भारतीयांची दैनंदिन व्यवहारातील बोलीभाषा होऊ शकली नाही हे सिद्ध होत नाही काय? (ड) संस्कृत भाषा जर भाषा, संस्कार, विचार, संस्कृती, कला, विज्ञान आदींचे भांडार असेल आणि तिचा वापर फक्त एका जातीपुरताच मर्यादित असेल, तर त्याचा अन्य लोकांना काय उपयोग? आणि या क्षेत्रांमध्ये- विशेषत: विज्ञानात आपण काय दिवे लावले? अन्य भाषांचा हा अवमान नव्हे काय?
वास्तविक संस्कृतेतर भाषांच्या अस्तित्वामुळे कला, संस्कृती, विचार, विज्ञान यांना पर्याय निर्माण झाल्याने या क्षेत्रांत प्रगती होत आहे. असे असताना संस्कृतचे पुनरुज्जीवन केल्याने खास काही साध्य होईल असे वाटत नाही. तरीही, भाषाभिमान म्हणून ज्यांना ही भाषा शिकायची आहे त्यांनी जरूर शिकावी. परंतु ती दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करू नये.
– उत्तम जोगदंड, कल्याण (जि. ठाणे)
ही संख्या परिस्थितीची दाहकता दर्शवणारी..
‘महाराष्ट्र उद्योगनिष्ठच!’ हा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा लेख (‘पहिली बाजू’, ४ ऑगस्ट) वाचला. सैल होत गेलेल्या शैक्षणिक धोरणांमुळे उच्चशिक्षित व पदवीधरांचा आलेख महाराष्ट्रात वाढत गेला आहे आणि परिणामी बेरोजगारांचादेखील. आजवरच्या सर्व सरकारांनी राज्यातील बेरोजगारांना मोठमोठी दिवास्वप्ने दाखवत प्रचंड नोकऱ्या उपलब्ध करण्याचे स्वप्न रंगवले. मात्र प्रत्यक्षात रोजगाराची दयनीय वस्तुस्थिती समोर आहे. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ व ‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली मोठमोठे करार देशी-विदेशी कंपन्यांसोबत फडणवीस सरकारने केले, मात्र यातील किती उद्योग प्रत्यक्षात अवतरले व त्यात किती स्थानिकांना रोजगार मिळाला, हा संशोधनाचा विषय ठरेल! एकीकडे उच्चशिक्षित बेरोजगारांची संख्या राज्यात वाढत असताना, करोना-टाळेबंदीच्या काळात सध्या अस्तित्वात असलेल्या उद्योगधंद्यांवरदेखील आर्थिक नाकेबंदीची कुऱ्हाड कोसळली आणि आहेत ते रोजगारदेखील संपुष्टात येण्याच्या मार्गावर आलेत.
ही घडी व्यवस्थित बसवून पुन्हा नव्याने उद्योगधंदे राज्यात आणण्याचे मोठे आव्हान आज महाविकास आघाडी सरकारसमोर आहे. ‘महाजॉब्ज’सारख्या संकल्पनेतून भूमिपुत्रांना रोजगार देण्याच्या भूमिकेचे स्वागतच करायला हवे. पहिल्याच दिवशी जवळपास दोन लाख बेरोजगारांची यावर झालेली नोंदणी परिस्थितीची दाहकता दर्शवत असली, तरी जवळपास सात हजार कंपन्यांनी या ठिकाणी आपली मागणी नोंदवत दिलासादेखील दिलेला आहे. त्यामुळे रोजगारनिर्मितीच्या मोठय़ा संधी आगामी काळात उपलब्ध होतील, अशी ‘पुन्हा एकदा’ आशा करायला हरकत नाही! एकंदरीत आगामी काळात रोजगाराभिमुख व कौशल्याधारित शिक्षण तरुणांना उपलब्ध करून देणे व त्यांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणणे हे एकमेव उद्दिष्ट असायला हवे.
– वैभव मोहन पाटील, घणसोली (नवी मुंबई)