समता : व्यापक की संकुचित समूहांची?

‘बदलता महाराष्ट्र’मधल्या ‘समता की समरसता’ या विषयावरील परिसंवादाच्या वार्ताकनामधली काही विधानं (लोकसत्ता, १७ सप्टेंबर) वाचली.

‘बदलता महाराष्ट्र’मधल्या ‘समता की समरसता’ या विषयावरील परिसंवादाच्या वार्ताकनामधली काही विधानं (लोकसत्ता, १७ सप्टेंबर) वाचली.  
रा.स्व.संघ समता मानतो आणि समता, समानता टिकवण्यासाठी आणि स्थिर होण्यासाठी समरसता हवी असं संघ मानतो असं भिकूजी इदाते म्हणतात. पुढे ते म्हणतात की समरसता ही कल्पना संपूर्ण समाजाला कवेत घेणारी आणि वंचितांना न्याय देणारी आहे.
परंतु ‘समरसता यात्रे’संबंधीची पूर्वी केलेली निवेदनं पाहिल्यानंतर खालील गोष्टी लक्षात येतात.
१) या यात्रेसंबंधीच्या निवेदनांत फक्त हिंदू समाजाचा विचार केलेला आहे. त्यामुळे ‘संपूर्ण समाजा’ला हे लागू होत नाही. कारण संपूर्ण समाजात मुस्लीम, ख्रिश्चन, पारशी, शीख, बौद्ध असेही जनसमूह येतात याची आठवण करून देणं आवश्यक आहे. यांपकी बौद्ध आणि शीख हे ‘आपलेच’ आहेत असं संघाला कितीही वाटत असलं तरी त्याला हे दोन्ही जनसमूह सरसकट मान्य करतील असं नाही. या दोहोंखेरीज इतरांचा विचार करण्याचं कारण नाही असं संघाला वाटत असावं.
२)  याला पूरक गोष्ट म्हणजे ज्या महापुरुषांची आणि महास्त्रियांची यादी या यात्रेकरूंनी दिली आहे, त्यांच्यात इतर धर्मीयांच्या समाजसुधारकांना स्थान नाही. अर्थात, ‘आमचं म्हणणं फक्त हिंदूंपुरतं सीमित आहे,’ असं जर त्यांना म्हणायचं असेल तर गोष्ट वेगळी. पण मग त्यांचा ‘संपूर्ण समाज’ म्हणजे हिंदू समाज आहे असा याचा अर्थ होतो.
३) ज्या हिंदू महापुरुषांची नावं यात्रेकरूंच्या यादीत आहेत, त्यात डॉ. हेडगेवार आणि सावरकर यांचीही नावं आहेत. यांपकी हेडगेवारांच्या विचारातील एक प्रभाव डॉ. मुंजेंच्याकरवी आलेल्या इटलियन फॅसिझमचा होता, आणि िहदुत्वाच्या मुद्दय़ावरच हेडगेवारांचे राष्ट्रीय काँग्रेसशी मतभेद झाले होते. दुसरीकडे सावरकरांचे विचारसुद्धा फॅसिझम आणि नाझी विचारसरणीला अनुकूल होते असं दिसतं.
सावरकरांचा ‘ज्वलंत’ मुस्लीमविरोध त्यांच्या लेखनात पानापानावर स्पष्ट दिसून येतो. जर जर्मनीला आपल्या देशासाठी नाझीवाद; तसंच इटलीला फॅसिझम योग्य वाटत असेल तर त्या त्या देशांच्या गरजांप्रमाणे त्या देशांना आपापली शासन व्यवस्था निवडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळे आपण िहदूंनी या देशांबद्दल अढी बाळगण्याचं कारण नाही, असे विचार सावरकरांनी ऑगस्ट १९३८ मध्ये पुण्यात एका जाहीर सभेत मांडले होते.  
हिटलरला ज्यूंबद्दल वाटणारी द्वेषभावना सावरकरांना माहीत नव्हती असं मानता येत नाही. ज्यू विरोधाला जर्मनीत १९३० च्या अगोदरपासून सुरुवात झाली होती. परंतु, इस्रायलच्या झायनवादी राजवटीविषयी त्यांच्या तोंडून कायम प्रशंसोद्गारच येत असतात. पॅलेस्टाइनच्या भूमीवर ज्यूंचा कसा हक्क आहे आणि अरब हे तिथे आलेले उपरे कसे आहेत हे सावरकर आपल्याला हिरिरीने पटवून द्यायचा प्रयत्न करतात.
 सावरकरांची समता ही फक्त हिंदूंपुरती मर्यादित होती, असं त्यांच्या विविध कृतींतून दिसतं. अशा व्यक्तींचा आपण समाजसुधारकांच्या यादीत समावेश करू शकतो काय हा एक मूलभूत प्रश्न आहे. अशा विचारसरणीत ‘समता’ किती आहे याचं मूल्यमापन प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे.
तरीही, अशा व्यक्तींचा समाजसुधारकांच्या यादीत समावेश करून ते लोकांच्या पचनी पाडणं हा उद्योग समरसता मंच गेली कित्येक र्वष करत आहे. त्याचा आंधळेपणाने स्वीकार न करता त्यांना प्रश्न विचारत राहणं ही एक उत्तम सामाजिक कृती आहे.
समता, न्याय, मानवता, बंधुभाव, शांतता या सगळ्या विशिष्ट समूहांच्यापेक्षा अधिक उंचीवरून पाहण्याच्या गोष्टी आहेत आणि त्यात जातिनिष्ठ / धर्माधिष्ठित / राष्ट्राधिष्ठित  वा तत्सम संघटना हे  महत्त्वाचे अडथळे आहेत. विशिष्ट समूहांना इतरांपेक्षा वरचा दर्जा प्रदान करणाऱ्या असमानतेच्या चौकटीत सामाजिक पुरोगामित्वाचं सोंग आणण्याचा कुणी प्रयत्न केला तर तो हास्यास्पद ठरेल.

युद्ध जिंकले, तहात हरणार?
राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला जेमतेम चार आठवडे शिल्लक राहिलेले असताना महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यात कोलांटउडय़ा चालूच आहेत. शिवसेना आणि भाजप यांची गेली २५ वष्रे युती असली तरी प्रमोद महाजन -बाळ ठाकरे यांच्या कालखंडापासून आजपर्यंत खूप स्थित्यंतरे झाली; पण संयमावर मात्र दोन्हीकडून दिवसेंदिवस नियंत्रण सल पडताना दिसते. जनहिताच्या गोष्टी आणि मराठी प्रेमाची भाषा करणारी सेना सत्तेसाठी आपल्या तत्त्वांना मुरड घालत दुसरीकडे बाळ ठाकरे यांच्या प्रखर तत्त्वांचे पोवाडे गात आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेणाऱ्या भाजपला मराठी भाषिक, संस्कृती यांच्याबद्दल काहीही देणे घेणे नाही. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईत येतातच बाळ ठाकरेंच्या पुतळ्याला पुष्पहार घातला, शिवाजी पार्कवर जाऊन त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले; परंतु यापूर्वी उत्तर मुंबईच्या खासदार असलेल्या भाजपच्या मेहताबाईंनी मराठी भाषिकांची केलेली अवहेलना शिवसनिकांना कशी विसरता येईल?
महाराष्ट्रहिताच्या दृष्टीने शिवसेनेने विदर्भ, कोकण विकास, जैतापूर प्रकल्प या प्रश्नांवर पूर्वीपासून घेतलेल्या ठाम भूमिकांना सेना मुरड घालेल असे वाटू लागले आहे. युद्धात जिंकले, पण तहात नाक आपटून हरले अशी परंपरागत केविलवाणी स्थिती न होवो म्हणजे झाले!
-पम्मी प्रदीप खांडेकर, माहीम (मुंबई)

पितृपक्षाचे गांभीर्य कोण घालवते?
प्रा.य. ना. वालावलकर यांनी पितृपक्षाच्या रूढीबद्दल मांडलेले विचार ( लोकमानस, १७ सप्टें.) पटले. कुठल्याही चांगल्या कामासाठी मुहूर्ताची गरज नसते. ते केव्हाही केले तरी चांगलेच असते. मुहूर्त खरा मानला तर मग वाईट काम चांगल्या मुहूर्तावर केले तर चालेल काय किंवा त्याला क्षमा असावी काय? याउलट चांगले काम वाईट मुहूर्तावर केले तर ते वाईट तर ठरणार नाहीच, परंतु त्यात सफलतादेखील मिळेल.
गमतीची गोष्ट म्हणजे जे लोक पितृपक्षात कुठलीही खरेदी करणे अशुभ म्हणून टाळतात, तेच त्या अशुभ समजल्या जाणाऱ्या काळातच सोने वगरेसारख्या मूल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी, भाव कमी असल्यामुळे लगबग करतात. एकीकडे शासनाने अंधश्रद्धाविरोधी कायदा केला आहे तर दुसरीकडे सगळे इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यासाठी मुहूर्ताची वाट बघतात. हे म्हणजे वर्षभर उनाडक्या करून विद्यार्थ्यांने परीक्षा जवळ आल्यावर देवळांच्या चकरा मारण्यासारखे आहे.
-शरद फडणवीस, कोथरूड, पुणे

पितृपंधरवडय़ामागे मोठे धर्मशास्त्र!
‘गुरुजी आणि पितृपक्षाची रूढी’ या पत्रातील, ‘गणेशोत्सवाच्या पूजेसा्ठी गुरुजींवर कामाचा खूप ताण पडतो (कमाई पण चांगली होते). आता त्यांना दोन आठवडय़ांची विश्रांती हवी असते, म्हणून पितृपक्षाची कल्पना त्यांनी रूढ केली.’ हा दावा (लोकमानस, १५ सप्टें.) हास्यास्पद व अज्ञानमूलक आहे.
मुळात ‘गणेशोत्सवा’चे जे भव्य स्वरूप आपण पाहतो आहोत ते गेल्या १०० वर्षांतले. यातील गणेशाची प्रतिष्ठापना असो वा नित्यपूजा त्याला १५ मिनिटांहून अधिक वेळ लागत नाही, परंतु हे माहिती असण्यासाठी स्वत: ती पूजा करावी लागते. कितीही पूजा केल्या तरी मोठमोठाले यज्ञयाग, वास्तुशांत-विवाहासारखे मोठे विधी करणारे गुरुजी असल्या किरकोळ कालावधीच्या पूजेने थकत असतील असे म्हणणे बालिशपणाचे आहे (हे मी स्वत: गुरुजी नसूनही ताडू शकतो)! कमाईचा मुद्दा तर अगदीच त्याज्य आहे. या दहा दिवसांइतकी दक्षिणा तर एका लग्नात वधुपिता देतो.
मुळात पितृपंधरवडय़ाला विरोध करणे हे या पत्राचे ध्येय दिसते, पण सखोल ज्ञानाचा अभाव व प्रभावी मुद्यांचा दुष्काळ असला की असले दावे होतात! पितृपंधरवडय़ामागे फार मोठे धर्मशास्त्र असून ते इच्छुकांनी अवश्य जाणून घ्यावे, त्यासाठी येथे जागेचा अपव्यय नको. गेली हजारो वष्रे हा शास्त्रसंमत विधी (रूढी नव्हे) सुरू आहे.
– प्रशांत बाळकृष्ण कुलकर्णी

वृत्तान्त सविस्तर हवा
‘प्रबोधनाची पायवाट..’ हा अग्रलेख (१८ सप्टें.) वाचला. आज सर्व माध्यमांनी सर्वसामान्य वाचक, प्रेक्षक, श्रोते यांच्या बुद्धिमत्तेच्या पातळीच्या उथळपणालाच गृहीत धरून त्यांचा अपमान करण्याचा जणू विडा उचलला आहे असे वातावरण आहे. अशा स्थितीत ‘बदलता महाराष्ट्र’ हा उपक्रम निश्चितच बौद्धिक आनंद देणारा आहे. मात्र फक्त निमंत्रितांसाठी असला तरी या कार्यक्रमाचा वृत्तान्त लोकसत्ता या दैनिकातून सर्व वाचकांपर्यंत पोचवणे आवश्यक आहे.                
 – प्रमोद तावडे, डोंबिवली
*‘लोकसत्ता’च्या रविवार २१ सप्टेंबरच्या अंकात, चर्चासत्राचा सविस्तर वृत्तान्त देण्यात येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta badalta maharashtra equality inclusive or exclusive