अमृतांशू नेरुरकर

मोझॅक नावाच्या ब्राउझरने १९९३ मध्ये जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ब्राउझरचा मान मिळवला. मोझॅकच्या निर्मितीत सिंहाचा वाटा होता मार्क अँड्रीसनचा! पुढे १९९५ मध्ये मायक्रोसॉफ्टही या क्षेत्रात उतरली.  आपल्या प्रतिस्पध्र्याना नेस्तनाबूत करून, त्या क्षेत्रात आपली मक्तेदारी निर्माण करण्याचे प्रयत्न कंपनीने सुरू केले..

नव्वदच्या दशकात इंटरनेटचा प्रसार व विनियोग भूमितीश्रेणीने वाढत होता व इंटरनेटच्या सुलभ वापरासाठी विविध साधनांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली होती. यातलं सर्वात महत्त्वाचं आणि प्रत्येक इंटरनेट वापरकर्त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात येणारं साधन म्हणजे वेब ब्राउझर! आज आपल्या सर्वाचा ब्राउझरशी चांगलाच परिचय आहे. इंटरनेटवरच्या कोणत्याही संकेतस्थळापाशी चुटकीसरशी नेऊन महाजालाचं विश्वरूपदर्शन आपल्याला बसल्याजागी घडवणाऱ्या या ब्राउझरला इंटरनेटमधला वाटाडय़ा असं सार्थपणे म्हणता येईल. आपण खुल जा सिम सिम म्हणण्याचाच अवकाश, आपल्यासमोर महाजालातली अलिबाबाची गुहा खुली करण्याचं काम तो अगदी इमानेइतबारे पार पाडत असतो.

आज आपण सर्व जण क्रोम, इंटरनेट एक्सप्लोरर, सफारी किंवा मॉझेला असे विविध ब्राउझर्स अगदी सहजपणे वापरतो. पण जगातला पहिला ब्राउझर हा महाजालाची निर्मिती करणाऱ्या टीम बर्नर्स-लीने १९९१ साली बनवला होता ज्याचे नाव होते – ‘नेक्सस’! नेक्ससवर आधारित पण वापरकर्त्यांसाठी अनेक सुविधा समाविष्ट असलेला ब्राउझर बनवला मागील लेखात उल्लेखलेल्या व पहिल्या वेब सव्‍‌र्हरची निर्मिती करणाऱ्या इलिनॉईस विद्यापीठातील नॅशनल सेन्टर फॉर सुपरकॉम्प्युटिंग अ‍ॅप्लिकेशन्स (एनसीएसए) या संस्थेने. १९९३ साली निर्मिलेल्या मोझॅक (Mosaic) नावाच्या ब्राउझरने काही महिन्यांतच जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ब्राउझरचा मान मिळवला.

मोझॅकच्या निर्मितीत सिंहाचा वाटा होता इलिनॉईस विद्यापीठात संगणकशास्त्राची पदवी घेतलेल्या कुशाग्र बुद्धीच्या मार्क अँड्रीसनचा! १९९४ च्या पूर्वार्धात एनसीएसएच्या सल्लागार मंडळाबरोबर ब्राउझरच्या तांत्रिक आरेखनासंदर्भात झालेल्या मतभेदांमुळे तो मोझॅक प्रकल्पातून बाहेर पडला व जिम क्लार्क या सिलिकॉन व्हॅलीमधल्या प्रख्यात संगणक तंत्रज्ञाबरोबर मिळून त्याने मोझॅक कम्युनिकेशन कॉर्पोरेशन ही ब्राउझर निर्मितीसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन केली. आपल्या ब्राउझरचं नाव त्यांनी मोझॅक नेटस्केप असं ठेवलं होतं.

आपल्या ब्राउझरच्या एनसीएसएच्या ब्राउझरबरोबर असलेल्या नामसाधम्र्यामुळे आपण कायदेशीर कचाटय़ात सापडू ही जाणीव झाल्यानंतर त्यांनी कंपनीचे नाव नेटस्केप कम्युनिकेशन कॉर्पोरेशन असं बदललं व ब्राउझरचं नाव ठेवलं नेटस्केप नॅविगेटर! नेटस्केप ही मोझॅकची पुष्कळ पटीने सुधारलेली आवृत्ती होती. मोझॅकमध्ये एखादं संकेतस्थळ उघडायला उपलब्ध इंटरनेटच्या वेगानुसार बराच वेळ लागायचा, कारण मोझॅक संकेतस्थळाची पूर्ण माहिती वेब सव्‍‌र्हरकडून मिळेपर्यंत वाट पाहायचा. नेटस्केपने मात्र प्रथमच संकेतस्थळाची वेब सव्‍‌र्हरकडून टप्प्याटप्प्याने येणारी माहिती ब्राउझरवर दाखविण्यास सुरुवात केली. यामुळे वापरकर्त्यांचा इंटरनेट वापरण्याचा अनुभव सुधारण्यास व इंटरनेटचा वापर कैक पटीने वाढण्यास पुष्कळच मदत झाली.

९०च्या दशकाच्या मध्यावर इलेक्ट्रॉनिक व संगणक क्षेत्रातील क्रांतीमुळे अनेकांना वैयक्तिक पातळीवर संगणक खरेदी करणं सहज परवडण्यासारखं होत होतं. तर दळणवळण क्षेत्रातल्या नवनव्या शोधांमुळे इंटरनेटसाठी अत्यावश्यक असणारा नेटवर्कचा वेग व क्षमता गगनभरारी घेत होते. या दोनही परस्परपूरक घटनांमुळे या कालावधीमध्ये महाजालाची लोकप्रियता जोमाने वाढत होती व नेटस्केप नॅविगेटर हा वापरकर्ता आणि इंटरनेट यामधला प्रमुख दुवा बनला होता. नेटस्केपचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे बिगरव्यावसायिक वापरासाठी (शैक्षणिक वा संशोधन कार्य) तो संपूर्णपणे मोफत उपलब्ध होता, ज्यामुळे त्याच्या प्रसाराला चांगलाच हातभार लागला.

या सर्व कालखंडात आपल्या प्रोप्रायटरी विंडोज ऑपरेटिंग प्रणालीच्या जोरावर जोरदार घोडदौड करणाऱ्या मायक्रोसॉफ्टचं इंटरनेट क्रांतीकडे काहीसं दुर्लक्ष झालं. १९९५ च्या मध्यापर्यंत मायक्रोसॉफ्टने कोणत्याही प्रकारच्या ब्राउझर सॉफ्टवेअरवर काम केलं नव्हतं. त्यानंतर मात्र इंटरनेट व नेटस्केपची वाढत जाणारी लोकप्रियता बघून कंपनीच्या संचालक मंडळाने ब्राउझरच्या स्पर्धेत उतरायचं ठरवलं व ऑगस्ट १९९५ मध्ये मोझॅकवरच आधारित असलेल्या आपल्या स्वतंत्र ब्राउझरची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली. आज आपल्याला सुपरिचित असलेला हाच तो इंटरनेट एक्सप्लोरर!

लोकांना नेटस्केपची सवय झाल्यामुळे असेल कदाचित, पण जवळपास सारखी वैशिष्टय़ं असूनही, पहिल्या वर्षांत इंटरनेट एक्सप्लोररचा अंगीकार फारच कमी लोकांनी केला. उत्तरोत्तर इंटरनेटची व्याप्ती वाढतच जाणार आहे याचा मायक्रोसॉफ्टला आता अंदाज आला होता. त्यामुळे या क्षेत्रात आपला जम बसवण्याचा मायक्रोसॉफ्टने चंग बांधला. एकदा एखाद्या क्षेत्रात उतरायचं ठरवल्यावर आपल्या सर्व प्रतिस्पध्र्याना नेस्तनाबूत करून, त्या क्षेत्रात आपली मक्तेदारी निर्माण करण्यामध्ये मायक्रोसॉफ्टचा हात कोणी धरू शकला नसता.

विंडोजप्रमाणे इंटरनेट एक्सप्लोररसुद्धा प्रमाण ब्राउझर बनला पाहिजे या महत्त्वाकांक्षेने मायक्रोसॉफ्टला ग्रासलं. आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने एक मोठा निर्णय घेतला. १९९६ च्या उत्तरार्धात प्रसिद्ध केलेली इंटरनेट एक्सप्लोररची तिसरी आवृत्ती त्यांनी विंडोजसोबत एकत्र वितरित केली. यामुळे विंडोजच्या व्यावसायिक अथवा बिगरव्यावसायिक ग्राहकांसाठी इंटरनेट एक्सप्लोरर पूर्णत मोफत उपलब्ध झाला. विंडोजसोबत नेटस्केपच्याच तोडीचा ब्राउझर मोफत मिळत असेल तर कोण कशाला नेटस्केप खरेदी करायला जाईल, असा धंदेवाईक विचार त्यामागे होता.

आणि झालंही तसंच! १९९६-९८ या कालखंडातल्या कित्येक पहिल्यांदाच संगणक वापरणाऱ्यांनी इंटरनेटसाठी इंटरनेट एक्सप्लोरर वापरायला सुरुवात केली, कारण त्यांच्या संगणकावर विराजमान झालेल्या विंडोज ऑपरेटिंग प्रणालीबरोबर तो मोफत मिळत होता. इथंच नेटस्केप नॅविगेटरच्या पीछेहाटीला सुरुवात झाली.

मायक्रोसॉफ्टच्या तुलनेत नेटस्केप अगदीच छोटी कंपनी होती व नेटस्केप नॅविगेटरची विक्री हा तिच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत होता. मायक्रोसॉफ्टचे तसे नव्हते. विंडोज ऑपरेटिंग प्रणाली व एम एस ऑफिस सॉफ्टवेअर ही तिची प्रमुख उत्पादनं होती व त्यातून मिळणारं उत्पन्न एवढं अवाढव्य होतं की त्यासमोर ब्राउझरच्या विक्रीने होऊ शकत असलेलं उत्पन्न अगदीच किरकोळ होतं, ज्यावर मायक्रोसॉफ्ट पाणी सोडायला तयार होती. दुसरं म्हणजे नेटस्केपच्या तुलनेत मायक्रोसॉफ्टकडे अफाट संसाधनं होती, ज्यामुळे ब्राउझरमध्ये नवनव्या संकल्पना व कार्यक्षमता आणणं मायक्रोसॉफ्टला सहज शक्य होतं व या रेटय़ासमोर नेटस्केप टिकूच शकली नसती. त्या काळात डेस्कटॉप ऑपरेटिंग प्रणाली क्षेत्रात विंडोजचा जागतिक बाजार हिस्सा ९०%हूनही अधिक होता. याचाच वापर करून मायक्रोसॉफ्टने नेटस्केपचं ब्राउझर मार्केट गिळंकृत करायला सुरुवात केली.

१९९७ सालच्या अखेपर्यंत वरील समस्या नेटस्केपसाठी अस्तित्वाचा प्रश्न बनला होता. नेटस्केपची मर्यादित व्याप्ती बघता ती मायक्रोसॉफ्टचं या क्षेत्रातलं वर्चस्व मान्य करून शरणागती पत्करेल की काय अशी रास्त भीती संगणक क्षेत्रातील अनेकांना वाटत होती. पण नेटस्केपला इतक्या सहजासहजी हार पत्करायची नव्हती. मायक्रोसॉफ्टला शह देण्यासाठी कंपनीचा त्या वेळचा मुख्य कार्यकारी अधिकारी जिम बार्क्‍सडेलने आपल्या प्रोप्रायटरी नेटस्केप ब्राउझरला ओपन सोर्स करण्याचा न भूतो न भविष्यति असा निर्णय घेतला व सगळं संगणक विश्व ढवळून निघालं.

त्याच्या या निर्णयामागे होता, नेटस्केपमधला मुख्य तंत्रज्ञ एरिक हान! या धक्कादायक निर्णयाची कारणमीमांसा, तसेच एका प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरचा ओपन सोर्स प्रवास किती सहजपणे झाला, बाह्य़ समुदायांची त्याला कितपत साथ लाभली व सरतेशेवटी नेटस्केप मायक्रोसॉफ्टला शह देण्यात यशस्वी झाली का, या सर्व प्रश्नांचा ऊहापोह आपण पुढील लेखात करू.