बेळगावच्या प्रश्नावर आजही विनोबा आठवून पाहावेत... | Maharashtra and Karnataka border issue Vinoba Bhave should be remembered role thoughts | Loksatta

बेळगावच्या प्रश्नावर आजही विनोबा आठवून पाहावेत…

आज पासष्ट वर्षांनंतर महाराष्ट्र व कर्नाटक सीमा प्रश्नाला नव्याने तोंड फुटले आहे. अशा काळात आपण सीमा प्रश्नाबाबत विनोबा भावे यांची भूमिका व विचार नव्याने समजून घेतले पाहिजेत…

बेळगावच्या प्रश्नावर आजही विनोबा आठवून पाहावेत…
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

विजय प्र. दिवाण

बेळगावचा प्रश्न १९२९ सालापासून वादग्रस्त बनला होता. १९२९ ला शि.म.परांपे यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावात चौदावे महाराष्ट्र साहित्य संमेलन भरले होते. त्यावेळी कर्नाटक एकीकरणाच्या समर्थकांनी संमेलनावर बहिष्कार घालण्याची आणि काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर बेळगाव शहरात दुसरे साहित्य संमेलन १२ मे १९४६ रोजी, प्रसिद्ध कादंबरीकार व पत्रकार ग.त्र्यं.माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या संमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा अस्तित्वासाठी ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ स्थापन करण्याचा ठराव मांडण्यात आला. संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणाऱ्या तीन ठरावांना विनोबांनीही आपला लिखित पाठिंबा दिला. एक जुलै १९४६ च्या पत्रात विनोबांनी माडखोलकरांना लिहिले, ‘‘भाषावार प्रांतरचनेचे तत्त्व काँग्रेसने स्वीकारलेच आहे. दर एक भाषेचा अलग प्रांत करण्यात, त्या त्या भाषांचा विकास, त्याद्वारा ग्रामीण व नागर जनतेची सहज सेवा आणि राज्यकारभाराची सुलभता अशी तिहेरी दृष्टी आहे. म्हणून एकीकरणाची मागणी सेवावृत्तीस अनुसरूनच आहे. हीच मागणी संकुचित अभिमानानेही केली जाणे शक्य आहे. पण तशी ती करू नये. हिंदुस्तानच्या त्या सर्व भाषा बहिणी बहिणी आहेत. सर्वांचा विकास साधावयाचा आहे. यासाठी एकीकरण उपयोगी आहे अशी दृष्टी आहे. सर्व भाषांनी मिळून अखिल भारताची सेवा करावयाची आहे. म्हणून सरहद्दीच्या प्रश्नाबद्दल कटुता उत्पन्न होण्याचे कारण नाही. थोडी गावे इकडे आणि थोडी गावे तिकडे हा काही मोठा प्रश्न नाही. त्या त्या प्रांतात दुसऱ्या प्रांतातले लोक येऊन राहिलेले असतात. त्यांचा धर्म प्रांतीय भाषेशी समरस होऊन जाणे हाच आहे. उदाहरणार्थ मद्रासकडच्या महाराष्ट्रीयनचा धर्म तमिळांची सेवा करणे. स्वभाषेचा अभ्यास अर्थात कोणीही करू शकतातच.

बेळगावच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करताना सप्टेंबर १९४९ ला विनोबा म्हणाले होते की, ‘ महाराष्ट्राचा काही भूभाग कर्नाटकात राहिला तर मराठी भाषेला नुकसान पोहोचणार आहे का? ज्या मराठी भाषेला ज्ञानदेव आणि तुकारामाने समृद्ध केले ती भाषा संस्थेवर आधारित नाही.’ राज्य पुनर्रचना आयोगाचा अहवाल ऑक्टोबर १९५५ मध्ये प्रकाशित होताच देशभर सर्वत्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. दोन राज्यांच्या सीमाभागात गावागावांवरून वाद सुरू झाले आणि द्वेषभावना पसरू लागली. विनोबा म्हणाले, “सीमा भागातील लोकांनी दोन्ही भाषा प्रेमपूर्वक शिकल्या पाहिजेत. जनतेच्या सोयीसाठी, भाषेच्या विकासासाठी आणि समन्वयासाठी भाषावार प्रांतरचना झाली पाहिजे, न की अभिमान व द्वेषासाठी. त्याने देशाची शक्ती वाढली पाहिजे. पण आमच्या देशात भाषेच्या प्रश्नावर असंतोष आहे. या बेचैनीची काही आवश्यकता मला वाटत नाही. उलट शांतचित्ताने विचार करण्याची गरज आहे.”

ऑक्टोबर १९५७ पासून विनोबांची भूदान पदयात्रा कर्नाटकात सुरू होती. बेळगावच्या प्रश्नावर दोन्ही भाषिकांच्या भावना तीव्र होत्या. १५ मार्च १९५८ ला बेळगावला विनोबांची प्रचंड सभा झाली. तेथे विनोबांनी बेळगावच्या प्रश्नावर तोडगा सुचविला की, ‘बेळगावचे ग्रामदान करा, ( ग्रामदान म्हणजे, जमिनीची व्यक्तिगत मालकी गावाकडे विसर्जित करणे.) म्हणजे तेथील लहान-मोठे प्रश्न सुटतील. तेथे चव्हाण किंवा निजलिंगप्पा यांच्यापैकी कोणाचे राज्य हा प्रश्नच उद्भवणार नाही व लोकांचे खरेखुरे राज्य येईल.’

२३ मार्च १९५८ ला विनोबांनी कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश केला. कोल्हापुरातील खडकेवाडा येथे त्यांचा पहिला पडाव होता. ‘संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’च्या घोषणातच विनोबांचे स्वागत झाले. आचार्य अत्रे यांनी निपाणीला पोलिसांच्या गोळीबारात बळी पडलेल्या कमळाबाई मोहिते या महिलेच्या, तीन वर्षाच्या अनाथ मुलीला विनोबांसमोर उभे केले. भावनिक आवाहन व संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा, या वातावरणात महाराष्ट्राच्या नेत्यांशी विनोबांची दीड तास चर्चा झाली. पण या चर्चेनंतरही संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांचे समाधान झाले नाही.

 याच खडकेवाड्याच्या सभेत विनोबा म्हणाले, ‘माझ्यापाशी मते नाहीत. माझ्यापाशी विचार आणि प्रेम आहे. महाराष्ट्रात मला हृदयप्रवेश हवा आहे. संयुक्त हृदय झाल्याशिवाय जगात काही संयुक्त होऊ शकत नाही. तेव्हा संयुक्त हृदयाचे आंदोलन करू. अवांतर संयुक्त आपण काढू. ते वियुक्त करणारेच, चिरफाड करणारे असणार. अन्योन्य अनुराग निर्माण होऊ द्या, म्हणजे संयुक्त महाराष्ट्रातून पुढे संयुक्त विश्व निर्माण होईल.’

 पुढे एका पत्रकार परिषदेत विनोबा म्हणाले, ‘शेवटी पार्लमेंटचा संतोष हेच आपले मुख्य साधन आहे. पार्लमेंट लोकमाता आहे. तेथील सदस्यांना आपण सांगावे की, तुमच्या संतोषाने जे होईल तेच आम्हाला मान्य आहे. शेवटी हा प्रश्न पार्लमेंटवर सोपवावा. माझ्या मते हा सर्वोत्तम सत्याग्रहाचा नमुना आहे. ज्याला आजकाल रूढ अर्थाने सत्याग्रह म्हणतात, तसा या संयुक्त महाराष्ट्राचे बाबतीत करणे सर्वथा अयोग्य आहे. असा काही सत्याग्रह केल्यास महाराष्ट्राविषयी भारतात प्रेम उत्पन्न होणार नाही. सत्याग्रह म्हणजे नैतिक अनुकूलता संपादन करणे. मी सर्वोदय मानणारा आहे. सर्वसंमती शिवाय एखादी गोष्ट दबावाने घडून आली तर त्यात हानीच आहे. आपल्याला सगळ्यांना मिळून सर्व हिंदुस्तानचे वैभव वाढवायचे आहे. त्यात महाराष्ट्राचे योगदान असायला हवे.’

रुकडी, जयसिंगपूरच्या सभेत विनोबा म्हणाले, “भाषिक राज्याच्या अतिरेकी हव्यासामुळे आज महाराष्ट्र संकुचित झाला आहे. विज्ञानाच्या आजच्या काळात कोणी जर एखाद्या प्रांताच्या तुकड्यापुरती भाषा बोलतील तर, अशा सर्वांना मी स्पष्ट बजावतो की, तुम्ही हराल. ‘महाराष्ट्र महाराष्ट्र’ म्हणून प्रचार करणाऱ्यांना समजावयास हवे की, अशा प्रचारात आत्मघात आहे. ज्ञानेश्वरांनी विचार केला तो या टीचभर तुकड्यांसाठी नव्हे. विचारांची व्यापक परंपरा सोडून, विकासास मारक अशा प्रवृत्ती आज फार झाल्या आहेत. या परिस्थितीचा आपण विचार करावा. व्यापक ज्ञान नसल्यामुळे अभिमानच राहतो. एवढ्यासाठी सत्यदर्शन फार महत्त्वाचे आहे.”

 १३ डिसेंबर १९५८ रोजी संयुक्त महाराष्ट्राचे नेते एस. एम. जोशी विनोबांना भेटले. मुलाखत साडेतीन तास चालली. विनोबांनी आपले पूर्वीचेच विचार मांडले. हे पाहिल्यावर आचार्य अत्रे यांचा भडका उडाला. आचार्य अत्रे यांनी लेख लिहून विनोबांना ‘काँग्रेसचा एजंट’, ‘नेहरूंचा मिंधा प्रचारक’, ‘महाराष्ट्रद्रोही’, ‘विनोबा की वानरोबा’ अशी शेलकी विशेषणे बहाल केली!

 भाषावार प्रांतरचना आणि भाषा यावर विनोबांचे निश्चित विचार होते. राष्ट्रभाषा आणि मातृभाषा हे देशाकडे पाहण्याचे दोन डोळे आहेत. “उत्तरेच्या लोकांनी दक्षिणेची एक भाषा व दक्षिणेच्या लोकांनी उत्तरेची एक भाषा शिकली पाहिजे,” असे विनोबांनी वारंवार केलेले आग्रही प्रतिपादन होते. भाषा ही जनतेच्या हृदय संपर्कासाठी व प्रेम-भावनेच्या विकासासाठी आहे, असे ते म्हणत. भाषा ही हृदय जोडण्यासाठी असल्याने, भाषावार प्रांतरचनेचा प्रश्न भलताच ताणून, भाषेच्या नावावर हृदय तोडणे त्यांना मंजूर नव्हते.

 भाषा आणि वाणी यात विनोबा फरक करतात. वाणी ही ईश्वराने दिली आहे, तर भाषा मनुष्याने निर्माण केली आहे. भाषा बदलत राहते. वाणी बदलत नाही. वाणी आतील वस्तू आहे तर भाषा बाहेरची वस्तू आहे. सत्यभाषण, मितभाषण, अनिंदाव्रत, उभयमान्य हितबुद्धीने केलेले दोषप्रकाशन, मौन ही सर्व वाणीची साधने आहेत, असे विनोबा म्हणतात. त्यामुळे वाणीकडे लक्ष घालावे असे त्यांचे म्हणणे आहे. वाणीचा उपयोग विशेष प्रकाराने केल्याने सिद्धी प्राप्त होते. वाणीच्या शुद्धतेकडे लक्ष दिले पाहिजे, असा विचार विनोबा मांडतात. त्यामुळे विनोबांना भाषिकवाद आणि भाषावार प्रांतरचना हे प्रश्न खूपच स्थूल वाटत होते!!

 विनोबांनी भाषा आणि वाणी यातील सूक्ष्म भेद जसा उलगडून दाखवला तसेच त्यांनी प्रांत रचनाही करून दाखवली. विनोबांच्या मनातील प्रांतरचना आध्यात्मिक होती. विनोबांनी कधीही आपण कर्नाटकातून महाराष्ट्रात, महाराष्ट्रातून गुजरातेत गेलो असे म्हटले नाही. ते म्हणत, “मी भगवान बुद्धाच्या भूमीतून (बिहार) चैतन्य महाप्रभूच्या भूमीत (बंगाल) गेलो. ज्ञानदेवाच्या भूमीतून (महाराष्ट्र) नरसिंह मेहताच्या (गुजरात) भूमीत व तेथून मीरेच्या (राजस्थान) भूमीत गेलो. मी लल्लेश्वरीच्या (काश्मीर) राज्यातून नानकांच्या राज्यात (पंजाब) गेलो. ” विनोबांची ही समन्वयाची आध्यात्मिक भाषा आपण आज समजून घेतली पाहिजे. व्यक्तीसमूहाकडे भाषिक अंगाने न पाहता, विनोबा सांगतात त्या दृष्टीने पाहिले तर भेदभाव आपोआपच गळून पडतील. दोन नद्यांचा संगम असलेले स्थान जसे पवित्र आणि तीर्थक्षेत्र, तसेच दोन भाषा बोलल्या जाणारा भूभाग पवित्र व तीर्थक्षेत्र आहे असे मानले पाहिजे. आज मराठी व कन्नड शाळा बंद पडत आहेत. आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकणारे मात्र आज मराठी व कन्नड भाषेच्या नावावर लढतांना दिसत आहेत. किंवा त्यांना लढवले जात आहे. हे सारे दुःखदायक आहे!

लेखक सर्वोदयाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते आहेत.

diwan.sarvodaya@gmail.com

मराठीतील सर्व विचारमंच ( Sampadkiya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 12:04 IST
Next Story
आनंद तेलतुंबडे यांच्या सुटकेनंतरचा प्रश्न…