वंदना भाले
स्वातंत्र्यानंतरच्या काळाकडे पाहिले तर ध्येयाने प्रेरित झालेली पिढी समोर येते. माहिती क्रांतीमुळे आज स्वैरसंचारी झालेल्या पत्रकारितेचा उद्रेक पाहून समाज धास्तावलेला आहे. त्यातून असुरक्षितता व नाराजीचा सूर लागलेला दिसतो. भविष्याबद्दल सर्वव्यापी संभ्रमही जाणवतो. या पार्श्वभूमीवर १९६० साली महाराष्ट्र राज्य निर्माण झाले तेव्हा आपो राज्य पुढे राहील, नेतृत्व पुरवील या ध्येयाने अनेक जण झपाटलेले होते. विविध क्षेत्रात आपआपल्या शक्तीनुसार मूलभूत व दिशादर्शक काम करीत होते.
श्री. ग. माजगावकर, माझे बाबा हे अशाच एका ध्येयाने प्रेरित झाले होते. अर्थशास्त्रातील उच्च पदवी हातात होती. चांगल्या सुरक्षित आयुष्यासाठी लागणारी नोकरी मिळणे हा ‘होकार’ देण्याचाच प्रश्न होता. संपूर्ण एकत्रित कुटुंबाची जबाबदारी ‘मोठा भाऊ’ म्हणून खांद्यावर होती. मागे कुठलाच आधार नव्हता. हे वडीलधारेपण त्यांनी अखेरपर्यंत निभावलं. सुसंस्कृत, सुशिक्षित, विचारी समाजाला दिशादर्शक ठरेल अशीच पत्रकारिता करावयाची हे निश्चित करून जून १९६१ मध्ये त्यांनी ‘माणूस’ची मुहूर्तमेढ रोवली. साप्ताहिकाच्या नावातच माणूस घडविण्याचा त्यांचा इरादा पक्का दिसतो. पुढल्या २५ / ३० वर्षांची यशस्वी वाटचाल याची पुरेपूर साक्ष देते.
संपादक या नात्याने त्यांनी घडविलेली अनेक माणसे आज पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःचा वेगळा बाज राखून आहेत. गेल्या ३०/४० वर्षांतील अनेक नामवंतांच्या लिखाणाची सुरुवात ‘माणूस’ मधून झालेली दिसते. अनेक लेखमाला, वार्तापत्रे, वृत्तान्तकथन, समीक्षा, चरित्रे याची वाचनीयता आजही टिकून आहे याचा अनुभव ‘माणूस’च्या ब्लॉगला आजवर मिळालेल्या उत्साहवर्धक प्रतिसादावरून येतो. त्या लिखाणातील टवटवीतपणा आजही ताजा व तजेलदार वाटतो. बाबांच्या संपादन कुशलतेचे हे द्योतक आहे.
जग समजून घेतल्याशिवाय ते बदलणे शक्य नाही, याची नेमकी जाण त्यांना होती. पत्रकारितेबरोबरच प्रत्यक्ष कृतीही तेवढीच महत्त्वपूर्ण आहे, याची खात्री त्यांना होती. अनेक चळवळीतला प्रत्यक्ष सहभाग तसेच समविचारी सहकाऱ्यांच्या साथीने ‘ग्रामायन’ या संस्थेची उभारणी यातून हाच विचार प्रकर्षाने दिसतो. १९६० ते १९९० मध्ये महाराष्ट्रात झालेल्या अनेक राजकीय, सामाजिक चळवळींमध्ये ‘माणूस’चा कृतिशील सहभाग ठळकपणे दिसतो. ‘समर्थ, स्वयंपूर्ण भारत’ हे त्यांचे स्वप्न होते. परकीय अन्नधान्याला विरोध करावा यासाठी जनजागृती गरजेची होती. ‘श्री कैलास ते सिंधुसागर’ ही अठरा लक्ष पावलं त्यासाठी ते चालले. वेळोवेळी प्रत्यक्ष मैदानात उतरून सकारात्मक कृती करून दिशा देणारे असे ते बिनीचे संपादक होते.
२० फेब्रुवारी १९९७ रोजी बाबा गेले. ‘माणूस’चा वारसा जतन करावा, नवीन येणाऱ्या पिढ्यांना त्यांचे कार्य समजावे यासाठी १९९८ साली आम्ही कुटुंबीय तसेच माणूसस्नेही यांनी मिळून प्रतिष्ठानचे काम जोमात सुरू केले. ‘निवडक माणूस’ हा ग्रंथ प्रकाशित करून याची सुरुवात झाली. त्याला यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. ‘माणूस’च्या वाटचालीतील समृद्ध लेखनाचे प्रतिबिंब त्यात प्रामुख्याने दिसते. १९६० नंतरच्या महाराष्ट्राची जडणघडण अनेक सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडी याचा हा ऐतिहासिक दस्तावेजच आहे. यातून त्याचे संदर्भमूल्य अधोरेखित होते.
‘माणूस’ प्रतिष्ठानने १९९९ सालापासून ‘श्रीगमा विधायक कृतिशीलता पुरस्कारा’ची सुरुवात केली. पत्रकारितेबरोबरच ग्रामीण विकास हा बाबांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. गेल्या २५ वर्षात अनेक स्वयंसेवी संस्था तसेच ग्रामीण किंवा निमशहरी पत्रकार संस्था, कार्यकर्ते यांना हा पुरस्कार दिला गेला. महिला सशक्तीकरण, पर्यावरण, भटके विमुक्त, बचतगट, अपंग कल्याण, आरोग्य शिक्षण, विज्ञान प्रसार अशा अनेकविध क्षेत्रात या पुरस्कारार्थींची स्वतंत्र ओळख आहे. याचबरोबर वृत्तपत्रविद्या व संज्ञापन विभाग यांच्या सहकार्याने पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रतिष्ठान शिष्यवृत्तीही देत आले आहे.
‘माणूस’मधील चित्रपटविषयक लेखन हा स्वतंत्रपणे नोंद घेण्याचा विषय आहे. त्या प्रकारचा चित्रपट रसग्रहण, समीक्षा, सिनेनटनट्यांची चरित्रे, चित्रपट संस्थांविषयीचे अत्यंत मार्मिक विश्लेषण आजही अभावानेच आढळते. केवळ मराठी, हिंदीच नव्हे, तर विदेशी चित्रपट कलावंतांचा परिचय आणि अभिजात कलाकृतींचा आस्वाद ‘माणूस’नेच त्या काळात वाचकांपर्यंत पोहोचवला. पुस्तकरूपात आजही तो वाचकप्रिय आहे. पुस्तकात न आलेला चित्रपटविषयक मजकूर लक्षात घेता प्रतिष्ठानने ‘फ्लॅशबॅक- चंदेरी दुनियेतील माणूस’ हा ग्रंथ प्रकाशित केला. चित्रपटलेखन कसे करावे याचा हा उत्तम नमुना आहे. त्यातील दर्जा व सौंदर्य उल्लेखनीय आहे. या ग्रंथाला मिळालेला वाचकांचा प्रतिसाद याची खात्री देतो. प्रतिष्ठानच्या प्रकाशनांना साहित्य परिषदेचे पुरस्कारही मिळाले आहेत.
महाराष्ट्राची व देशाची परिस्थिती हा कायम बाबांच्या चिंतनाचा विषय होता. राज्य आणि देश सर्वांगाने समर्थ व समृद्ध झाले पाहिजेत याच विचाराने त्यांनी ‘माणूस’मध्ये विपुल लेखन केले. ‘श्रीग्रामायन’, ‘निर्माणपर्व’, ‘बलसागर’ या पुस्तकात हे लिखाण संग्रहित झालेले आहे. त्यांची संपादकीये वाचकांना विचारप्रवृत्त करत. त्यामागील त्यांची अंत्योदयाची तळमळ व उत्कटता खूप लक्षणीय होती. बाबांचे हे विचारधन मराठीपलीकडे जावे या हेतूने ‘माणूस प्रतिष्ठान’ व ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ यांनी एकत्रितपणे ‘द नॅशनल कॉज’ हा ग्रंथ इंग्रजीत प्रकाशित केला. ‘राष्ट्रवादाचे समाजशास्त्र’ सांगणारा हा ग्रंथ आहे.
देशातील गरिबीचे स्वरूप व तिचे निवारण करण्याची दिशा दाखविणारा प्रा. वि. म. दांडेकर व प्रा. नीळकंठ रथ यांनी ५० वर्षांपूर्वी माणूसमधून सर्वसामान्य वाचकांसाठी सोप्या, सरळ शैलीत प्रदीर्घ निबंध लिहिले. अलीकडेच ‘आजचा सुधारक’चे कै. नंदा खरे यांनी ‘भारतातील गरिबी’ हे पुस्तक प्रकाशित केले. ते ‘माणूस’ मधील या लेखावर आधारित आहे. ‘माणूस’ चे द्रष्टेपण यातून समोर येते. तसेच त्यातील लिखाणाची सार्वकालिकताही दिसते. हे लक्षात घेऊन आम्ही प्रतिष्ठानतर्फे माणूसच्या सर्व अंकांचे डिजिटायझेशन केले. गोखले राज्य व अर्थशास्त्र संस्थेमधील ‘धनंजयराव गाडगीळ ग्रंथालया’च्या सहयोगाने हे काम पूर्ण झाले. त्यांच्या https://dspace.gipe.ac.in/xmlui/handle/10973/47474 या संकेतस्थळावर हे अंक सर्व वाचकांसाठी उपलब्ध आहेत.
vrbhale@gmail.com