१४४. शत्रू

मनोबोधाच्या २९व्या श्लोकात समर्थ सांगतात, ‘‘पदीं राघवाचे सदा ब्रीद गाजे

मनोबोधाच्या २९व्या श्लोकात समर्थ सांगतात, ‘‘पदीं राघवाचे सदा ब्रीद गाजे। बळें भक्तरीपूशिरीं कांबि वाजे।’’ म्हणजे ज्याच्या मुखी सदोदित भगवंताचं नाम आहे अशा भक्तांचे जे शत्रू असतील त्यांच्या मस्तकावर रामाच्या हातातला धनुष्यदंड ताडकन् बसतो आणि त्या शत्रूंचा चुराडा होतो. पण प्रश्न असा की, भगवंतावाचून जो कदापि विभक्त राहू इच्छित नाही, अशा भक्ताचे शत्रू तरी कोण आहेत हो? तर काम, क्रोध, लोभ, मोहादि षड्विकार हे त्याचे शत्रू आहेत. षड्रिपू म्हणतात ना त्यांना? आणि या विकारांतून आपण स्वबळानं मुक्त होऊच शकत नाही. सहज आठवलं. एकानं अगदी प्रामाणिकपणे विचारलं की, मला विकारांचा भोग घ्यायला, देहसुख घ्यायला आवडतं. मी त्यानंही आनंदातच आहे. तर मग ते सोडून मी माहीत नसलेल्या आनंदापाठी का धावू? प्रश्न अगदी रास्त वाटतो. पण विचार केल्यावर जाणवतं की विकारांपायी मन परावलंबी होत जातं. कारण या विकारांच्या पूर्तीसाठी व्यक्तिंचाच आधार लागतो ना? हे विकार आपल्याला अतृप्तीनंच झुरायला लावतात. कामना निर्माण होतात आणि त्यांच्या पूर्तीशिवाय त्या मनाला स्वस्थ बसू देत नाहीत. क्रोध उत्पन्न होतो आणि तो व्यक्त झाल्याशिवाय मनाला तो तळमळत ठेवतो. लोभ ज्या गोष्टींपायी निर्माण होतो त्या वस्तू वा व्यक्तींच्या प्राप्तीशिवाय शमत नाही आणि लोभ शमला की प्राप्त वस्तूच्या आसक्तीतून मोहच निर्माण होतो.. त्याला अंत नाही.. तेव्हा असे हे सारे विकार मनाला गुलाम करून टाकतात. आज ज्या गोष्टी, वस्तू आणि व्यक्तिंच्या असण्यानं मी आनंदात असल्याचं मानत आहे, त्या वस्तू, व्यक्ती कायमच्या आहेत का? त्यांचा माझ्याबद्दलचा आणि माझा त्यांच्याबद्दलचा भाव कायम तसाच राहाणार आहे का? तेव्हा हा आनंद काही खरा नाही. टिकणारा नाही. आपल्यालाही अनेकदा त्याचा अनुभवदेखील येतो. हव्याशा वाटणाऱ्या व्यक्तींच्या असण्यानं आपण आनंदी होतो आणि नकोशी वाटणारी माणसं नसल्यानंही आपण आनंदी असतो. पण हवीशी वाटणारी माणसं दुरावली आणि नकोशी वाटणारी माणसं नशिबी आली तर आनंद टिकेल का? तेव्हा असा कारणावर अवलंबून असलेला आनंद ही ती कारणंच तकलादू असल्यानं तकलादूच राहातो. मग तो आनंद काय कामाचा? तेव्हा विकारांच्या गुलामीत नव्हे तर विकारांच्या मालकीत आनंद असला पाहिजे. आणि ती कला सद्गुरूंशिवाय कोणीच शिकवू शकत नाही. अंबुराव महाराज साठीकडे येत होते. त्यांचे सद्गुरू उमदीकर महाराज त्यांच्याकडे अचानक आले होते. जाताना ते काय म्हणाले? ‘‘अंबुराया आता कामादि विकारांचं तुला काही भय नाही ना?’’ अंबुराव भोळ्या भावानं म्हणाले, ‘‘नाही महाराज!’’ उमदीकर महाराज म्हणाले, ‘‘चला ओझं उतरलं माझं!’’ आणि ते निघून गेले. घोडय़ावरून जात असत ते.. तर अंबुरावांना धक्का बसला.. काय बोललो आपण हे! तसेच कितीतरी अंतर ते धावत घोडय़ामागे गेले. महाराज अचानक थांबले. अंबुरावांना पाहून म्हणाले, ‘‘काय झालं अंबुराया?’’ त्यांचे पाय धरून अंबुराव महाराज म्हणाले, ‘‘देह आहे तोवर सर्वच विकारांची भीती कायम आहे! माझं ओझं तुमच्याचकडे आहे..’’ आपल्या सर्वासाठी अगदी मार्गदर्शक असा हा प्रसंग आहे. तेव्हा देह आहे तोवर देहाला चिकटून असलेले विकार, वासना कधीच नष्ट होणार नाहीत. मात्र जर त्यांना वळण लावल्याशिवाय भौतिकातल्या उत्तुंग गोष्टीही साध्य होत नाहीत, तर मग अध्यात्मातली वाटचाल कशी साध्य होईल? त्यासाठी एकच उपाय सदोदित सद्गुरूप्रदत्त साधनेचा अभ्यास, सद्गुरू स्मरण, सद्गुरू चिंतन, सद्गुरूंच्या बोधाचं मनन आणि त्या बोधानुसार जगण्याचा प्रामाणिक अभ्यास. अशा भक्ताच्या ‘शत्रूं’कडे सद्गुरूंचंच लक्ष आहे!

 – चैतन्य प्रेम

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Samarth ramdas philosophy

ताज्या बातम्या