तिन्ही लोकांवर माझी सत्ता आहे, मग तू कोणाच्या बळावर माझ्या विपरीत वागतो आहेस, हा हिरण्यकश्यपु याचा प्रश्न आहे आणि प्रल्हाद ते ‘बळ’ कोणतं आणि ते कसं सर्वाना सर्व काळी सर्वत्र सहजप्राप्य आहे, हे सांगत आहे. ‘हिरण्यकश्यपु’आणि ‘प्रल्हाद’ ही दोन्ही रूपकंही मोठी विलक्षण आहेत. तिन्ही लोकांवर आपलाच ताबा असावा ही वर्चस्वभावना ‘मी’रूपी हिरण्यकश्यपु याची आहे. तो त्रिगुणात बद्ध आहे आणि त्याला आपल्या या ‘गुणां’चा अभिमानही आहे! माझ्यासारखा कर्तृत्ववान कोणी नाही (रजोगुणी), मीच अनेकांना आधार दिला आहे, अनेकांचं भलं केलं आहे, अन्नदानं केली आहेत, मंदिरं उभारली आहेत (सत्त्वगुणी) आणि एवढं करूनही जर कोणी माझ्याविरोधात असेल तर त्याला गाडल्याशिवाय मी राहणार नाही (तमोगुणी) ही या ‘मी’रूपी हिरण्यकश्यपु याची स्थिती आहे. एवढं सारं असूनही अंतरंगात मात्र खरा ‘आल्हाद’ नाही! तो तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा अंत:करण बालकवत् निष्कपट, निरागस, निर्हेतुक प्रेममय बनतं. त्यामुळे या ‘मी’ला अशा ‘प्रल्हाद’ स्थितीतील भक्ताला पाहून प्रश्न पडतो की, कोणत्या ‘बळा’वर हा इतका निर्भय, निश्चिन्त आहे? आपणही साधनापथावर आहोत, पण आपली स्थिती ‘प्रल्हादा’च्या दिशेनं आहे की ‘हिरण्यकश्यपु’च्या? ती ‘प्रल्हादा’च्याच दिशेनं व्हावी, असं वाटत असेल तर प्रल्हादानं ज्या परम आधाराचा, त्याच्या प्राप्तीचा उपाय सांगितला आणि तो भगवंत प्रकट आणि प्रसन्न झाल्यावर त्याच्याकडे जो वर मागितला, तो जिवाचे कान आणि डोळे करून आपण ऐकला आणि वाचला पाहिजे. हा परमप्राप्तीचा उपाय ऐकूनही हिरण्यकश्यपु याची वृत्ती काही पालटली नाही. प्रल्हाद तोवर हिरण्यकश्यपुला ‘बाबा’ म्हणूनच हाक मारत होता. आता हा उपाय सांगताना प्रथमच त्यानं आपल्या पित्याचा उल्लेख ‘दैत्यराज’ असा केला. ‘भगवंत’ की ‘काका-मामा’ या निवडीची वेळ येताच नाती संपली! जन्मोजन्मी जो आपला आहे, जो कायमचा आहे, खरा आहे त्याच्यासमोर या जन्मापुरत्या आणि जन्मानंच जन्माला आलेल्या नात्यांना अधिक महत्त्व नाही, हे प्रल्हादानं ‘दैत्यराज’ या एकाच उल्लेखातून दाखवून दिलं! पुत्र म्हणून जे कर्तव्य होतं, त्यात तो पित्याच्या मृत्यूनंतरही कमी पडला नाही. ‘‘अज्ञानातून माझ्या पित्यानं तुझा अवमान केलाय त्याला पूर्ण क्षमा कर आणि दोषमुक्त कर,’’ अशी विनवणी त्यानं भगवंताला केली. म्हणजेच कर्तव्यात चुकू नका, पण मोहात फसू नका, हेच प्रल्हाद आम्हा साधकांना सुचवतो आहे. तर हिरण्यकश्यपु याच्या प्रश्नावर प्रल्हाद म्हणाला, ‘‘ दैत्यराज! ब्रह्मदेवापासून गवताच्या तृणापर्यन्त सर्वच जण खरं तर त्या एकाच आधारावर टिकतात. सर्व चराचरावर त्याचीच सत्ता आहे. तो परमेश्वरच खरा आहे. असुरभाव सोडा मग मनाचं समत्व प्राप्त होईल. या जगात अनियंत्रित असलेलं आणि कुमार्गात गोडी असलेलं मन हेच माणसाचा एकमेव आणि खरा शत्रू आहे. जोवर या मनावर जय मिळत नाही, तोवर दाही दिशा जिंकल्या तरी काय उपयोग?’’ मन जिंकायचं म्हणजे मनाचं अमन करायचं! सर्व अज्ञान-मोहजन्य भ्रामक सवयी, धारणा, धाटणींपासून मनाला मुक्त करायचं. ही ‘मुक्ती’ मनाला नको असते! ही ‘मुक्ती’ म्हणजे मनाला आपला अंतच वाटतो. त्यामुळे मन या, स्वत:ला जिंकू देण्याच्या विचाराचा प्रथम निकरानं प्रतिवादच करतं. त्यामुळे प्रल्हादाच्या बोलण्यानं हिरण्यकश्यपु याचं मनही खवळलं. प्रल्हादाच्या सत्यज्ञानाचा प्रतिवाद अज्ञानानं करण्यासाठी तो सरसावला. तो भगवंत सर्वत्र आहे, त्याची सत्ता सर्वत्र आहे का? मग तो या स्तंभातही असेलच नाही का, असा छद्मी प्रश्न त्यानं केला आणि समोरच्या स्तंभात आपले खड्ग अर्थात तलवार खुपसली! जणू आपल्या पित्याचा अंतकाळच जवळ आल्याच्या जाणिवेनं प्रल्हादच स्तंभवत् स्तब्ध झाला!
–चैतन्य प्रेम