कवितेवर निरतिशय प्रेम करणाऱ्या शंकर वैद्य यांच्या निधनाने कवितेलाच क्लेशाला सामोरे जावे लागणे अगदी स्वाभाविक आहे. अतिशय शांत आणि संयमी स्वभावाच्या वैद्यांनी महाराष्ट्राला आपली कविता ऐकवता ऐकवता एकूणच कवितेवर प्रेम कसे करायचे, याचे धडे दिले. उत्तम अध्यापक म्हणून त्यांचे अनेक विद्यार्थी जशी त्यांची आठवण काढतील, तसेच एक मर्मग्राही रसिक आणि विचक्षण रसग्राहक म्हणून त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला त्यांच्या निधनाने हळहळ वाटेल. कविता हा कोणत्याही साहित्यातील एक अतिशय शब्दार्थ श्रीमंत असा साहित्यप्रकार. शब्दांना नवे अर्थ प्राप्त करून देणाऱ्या आणि अनेकविध पदर कधी अलगदपणे तर कधी रोखठोकपणे व्यक्त करणारी कविता हा प्रकार जगातल्या सगळ्याच भाषा अतिशय संपन्न आणि संपृक्त होण्यास सहयोगी ठरला आहे. शंकर वैद्य यांनी या कवितेवर अगदी मनापासून प्रेम केले. कोणतीही कविता साहित्यदृष्टय़ा कशी सुंदर आहे, याचे जे विवेचन वैद्य करीत असत, त्यामध्ये कमालीची निर्विषता असे. याचे कारण त्यांना कवीपेक्षा कविता अधिक महत्त्वाची वाटत असे. दुसऱ्यांच्या कविता अशा अलवारपणे समजावून घेण्यासाठी शंकर वैद्य यांच्यासारख्या आरस्पानी कवी असलेल्या समीक्षकाची साथ आजवर रसिकांना कायम मिळत आली. ते समीक्षक खरे, कारण त्यांना स्वत:च्याच कवितांकडेही दूरस्थ नजरेने पाहता आले. आपण लिहिलेल्या अनेक कविता बदलत्या साहित्य संदर्भात टिकणार नाहीत, असे वाटल्याने त्यांनी बाद करून टाकल्या. कवितेवरील हे अद्भुत प्रेम खचितच निराळे वाटावे असे. त्यांच्या पत्नी सरोजिनी वैद्य यांनाही मराठी भाषेतील एक मानाचे पान मिळाले, ते त्यांच्या समीक्षेमुळे. या पतीपत्नींनी मराठी कवितेला जे बाळसे दिले, त्याने ती बहरली आणि त्याहून अधिक म्हणजे वाचकांपर्यंत ‘सार्थ’ पोहोचू शकली. पुण्यापासून जवळ असलेल्या ओतूरला जन्म झाला, पण साहित्याचे सगळे संस्कार पुण्यातील महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात झाले. तो काळही रविकिरण मंडळाच्या बहराचा. मंद, शीतल आणि करुणतेचा परीसस्पर्श झालेल्या त्या काळातील सगळ्याच ज्येष्ठ, श्रेष्ठ कवींनी त्यांना भुरळ घातली. ती त्यांच्या कवितेतही चंद्राच्या किरणांप्रमाणे सहजपणे विरघळून गेली. त्यातूनच ‘एक एक दार बंद, पटल्या ना काही खुणा, शब्द कुठे जाइ उणा, नजरा जुळल्या न कुठे, तुटल्या वाटांवर मन घालि येरजारा’ यांसारखे शब्द पाझरले. कवितेवरचे त्यांचे प्रेम असे आतून होते. त्यामुळे त्यातील नवप्रवाहांनीही त्यांना न खुणावले, तरच नवल. साहित्यातील आधुनिकतेचा स्पर्श झालेल्या मर्ढेकरांच्या कवितेनेही ते वेडावून गेले आणि ही नवकविता त्यांच्याही कुशीत सहजपणे आली. संयतपणे आपल्या भावना व्यक्त करण्याच्या मूळ स्वभावाला मुरड न घालताही शंकर वैद्यांनी नव्याने कवितेला सामोरे जाण्याचे ठरवले. त्यातून त्यांची कविता पुन्हा बहरून आली. ‘आला क्षण गेला क्षण’, ‘कालस्वर’, ‘दर्शन’ हे त्यांचे काव्यसंग्रह याची साक्ष आहेत. हृदयस्थ प्रेयसी असलेली कविता कायम तशीच राहावी, म्हणून त्यांना वेगळे काही करावेच लागले नाही. ते त्यांच्या स्वभावातच होते. नर्म शैलीचे देणे लाभलेल्या या कवीने आयुष्यभर साहित्याच्या रसपूर्ण वातावरणात स्वत:ला गुंतवून ठेवले आणि कधीही, कुठेही त्या साहित्यप्रेमाला जरासेही नख लागणार नाही, याची काळजी घेतली. त्यामुळे आयुष्यभर कवितेचा सखा होण्यातच त्यांना आनंद वाटला. ‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’ या कवितेचे गीत झाले, तरीही मिळालेल्या लोकप्रियतेपासून अलिप्त राहण्याचे कसब त्यांच्या अंगी होते. शंकर वैद्यांच्या निधनाने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना आणि त्यांनी प्रेम केले त्या कवितेलाही त्यामुळेच दु:ख होणे स्वाभाविक आहे.