कबूल, की ना निसर्ग तुझ्या हातचा ना बाजार. पराभूत योद्धय़ासारखा तू कायम या लढाईत हरलेला. तरीही घरादारासाठी, बायकापोरांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी तरी तू हे मदान सोडू नयेस. जगण्यालाच नाकारणारी ही वाट धरू नये..
गारपिटीने उभे पीक उद्ध्वस्त झाल्यानंतर आता सगळ्या आकांक्षांचाच चक्काचूर झाला अशी मनाची पक्की समजूत करून शेतकरी मृत्यूला कवटाळीत असल्याच्या बातम्या यायला लागल्या. ‘महाराष्ट्र ही शेतकऱ्यांची स्मशानभूमी झाली आहे’ या विधानाचा अजून विसर पडला नव्हता तोच या बातम्यांनी काही वर्षांपूर्वीच्या दु:खद घटनांवरील पडदा पुन्हा सारला गेला. गारपिटीनंतरच्या वाताहतीत कुणी जाळून घेतले, कुणी गळफास घेतला, तर कुणी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. गेल्या आठ-दहा दिवसांत आकडा वाढतोच आहे आणि त्यात दररोज भर पडत आहे. का संपवून टाकावे वाटते आयुष्य? साऱ्या घरादारावरची माया अशी का आटते? का नात्याचे पाश तटातटा तुटतात? सगळे दोर कापून टाकावेत आणि कडेलोट करावा एकदाचा आयुष्याचा असे का वाटते?
..कबूल, की तुझे झालेले नुकसान मोठे आणि त्यातून सावरायला बराच काळ जावा लागेल. वाट धगधगत्या निखाऱ्यावरची आहे आणि डोक्यावर सावली धरेल असा आभाळाचा तुकडा नाही. हे सगळे खरे, पण मुक्कामाची ही जागा नाही. असे केल्याने प्रश्न मिटतात असे थोडेच आहे. एखादा जीव सुटतो, पण मग बाकी घरादाराने काय करायचे, कुणासमोर हात पसरायचा, घरावरचे छप्पर उडून गेल्यानंतर पोरके होणाऱ्या लेकरांनी कोणाला बिलगायचे? आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तू गेल्यानंतर त्याचे इथल्या व्यवस्थेला, यंत्रणेला असे कोणते दु:ख वाटणार? राज्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरची रेषही हलणार नाही. लोक बातम्या वाचतील, विसरून जातील. यंत्रणेच्या काळ्याकभिन्न पत्थराचा टवकाही निघणार नाही, मग आपलेच आयुष्य का असे उधळून टाकायचे? याचा जरा विचार कर. घरात एखादे प्रेत जरी असेल तर पेरणीची घडी चुकवायची नाही, असे तुझ्या कुळाचा इतिहास सांगतो. गेलेल्या जिवासाठी झुरत बसण्यापेक्षा पुढच्या पिढीला जगविण्यासाठी नेटाने उठण्याची ही रीत. ‘मढे झाकोनिया, करिती पेरणी’ अशी सांगितलेली तुझी ओळख. तेव्हा आपणच मरणाच्या दारात कशासाठी जायचे? जगातल्या कोणत्याच व्यवहारावर तुझ्या जाण्याचा परिणाम होणार नाही. तू गेल्याने राज्यकर्त्यांची झोप उडेल, त्यांना घास तोंडात घालावा वाटणार नाही असे थोडेच आहे?
गारपिटीने उभ्या पिकांची दैना झाल्यानंतर आता खावे काय? कर्जाची परतफेड कशी करावी आणि पुढचा काळ कसा धकवावा या विवंचनेने अनेकांची झोप उडाली आहे. घरात बाप आपल्याच तंद्रीत असतो, तो कुणाशीही बोलत नाही, त्याची अन्नावरची वासना उडून गेली आहे. अशा परिस्थितीत सरभर झालेल्या आपल्या बापाला सहावी, सातवीत शिकणारा मुलगा म्हणतो, ‘दादा, तुम्ही एवढं काय मनाला लावून घेता, यंदा काहीच नाही पिकलं तर मी शाळा सोडून देईन. गुरं-ढोरं वळून घरकामाला मदत करील. पण तुम्ही आम्हाला पहिल्यासारखे दिसा.’ ही समज येते कुठून? गेल्याच आठवडय़ात उस्मानाबाद जिल्ह्य़ातल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याची मुलगी दहावीत शिकते. दहावीच्या परीक्षा सुरू. परीक्षा केंद्रावर टमटमने जावे लागते. ज्या दिवशी बापाने आत्महत्या केली त्या दिवशी सकाळी घरी सगळी रडारड. पोरीला वाटले पेपर दिला नाही तर वर्ष वाया जाईल. बाप गेल्याचा ताण तसाच मनावर ठेवून कढ आवरत पोरीने पेपर दिला आणि बाहेरगावाला परीक्षा केंद्रावरून अंत्यसंस्काराच्या ठिकाणी दुपारी तीन वाजता पोहोचली. परीक्षेचे तीन तास तिने कसे घालवले असतील? काय लिहिले असेल तिने पेपरात? काय म्हणणार आपण तिच्या धीराला. ‘मढे झाकोनिया, करिती पेरणी’ यापेक्षा वेगळे आहे का हे? शेतकरी कुटुंबातली ही मुलं कुठून गोळा करतात हे बळ. ‘हे सर्व कोठून येते?’ असा प्रश्न इथेही पडतोच. या साऱ्या गोष्टींचा विचार कर.. कबूल, की आम्ही आहोत सावलीत आणि तू भाजून काढणाऱ्या उन्हात. हेही कबूल की तुझी तगमग जीवघेणी आणि त्यातून सुटण्यासाठी कदाचित हाच एक मार्ग वाटत असणार तुला. तू वाहत्या धारेत गटांगळ्या खाणार आणि आम्ही किनाऱ्यावर. गारपिटीने नष्ट झालेली पिकं आम्ही फक्त टी.व्ही.वरून बघणार. समजा उद्या ज्वारी पंचवीसऐवजी पन्नास रुपये किलो विकली तरीही ती घेण्याची ऐपत आहे आमची. त्यामुळे तुझ्या जाण्याने आमच्या जगावर असा कोणता ओरखडा उमटणार आहे? नाही तरी दररोज आम्ही ज्या आत्महत्येच्या बातम्या वाचतो त्याने ‘अरेरे’ अशी हळहळ व्यक्त करण्यापलीकडे कुठे संवेदनशीलता पोहोचते आमची? त्यामुळेच वाटते की आपला असा लाखमोलाचा जीव कशासाठी डावावर लावला आहेस तू?
..गोष्ट लीळाचरित्रातली आहे. ‘धांदुल नावे कुणबी: तेयाचे पल्हे इंद्राचा ऐरावतु चरौनी जाए: ‘दीसवडि पल्हे चरौनी कोणाचे ढोर जात असे पा: म्हणौनि राखो ठेला: तवं तो चरों आला:’ हे जेयाचे म्हैसरु तेयाचीया घरा नेवो: पुसं धरिले: तो उत्पवला: वरि गेला: तवं सभा बसली असे: ‘हे म्हसरु विकाना का: चरों कां दीया ना: माझे अवघे सेत खादलेछ आता मीं सी दावो काइसेनि फेडी’ एका शेतकऱ्याचे शेत इंद्राचा ऐरावत चरून जातो. इंद्राच्या दरबारात जाऊन हा शेतकरी म्हणतो, तुझ्या ‘म्हसरु’ने माझे अवघे शेत खाल्ले. इंद्राच्या ऐरावताला ‘म्हसरु’ म्हणण्याचे, शेत खाल्ल्याबद्दल इंद्राला जाब विचारण्याचे हे धाडस एक शेतकरी दाखवतो. त्याच्यात ही िहमत येते कुठून? जो ‘मढे झाकोनिया’ पेरणी करतो त्याचे शेत जर असे कोणी चरून जात असेल तर शेतकरी त्याबद्दलचा जाब आणखी कोणत्या भाषेत विचारणार..? हेही कबूल की जगण्याबद्दलच लळा वाटू नये असा काळ तुझ्या आयुष्यात आल्यानंतर लीळाचरित्रातली गोष्ट तुला किती आपली वाटणार असाही प्रश्न आहे मनात.
..तापत्या उन्हाने माती व्याकूळ होते. वैशाख वणव्याचा दाह शिवारात कुठेच हिरवळ ठेवत नाही. डोंगरमाथ्यावर भुकेल्या जनावरांच्या जिभा नुसत्याच फिरतात, त्यांना गवत लागत नाही. पर्णहीन झाडे निमूटपणे उभी असतात. कोरडय़ा नक्षत्रांच्या झळा शिवार सहन करते. हे सगळे असह्य़ होते. जीव कासावीस होत असतानाच वळीव कोसळतो. मातीवर पडलेला थेंब तापल्या तव्यावर पडल्यासारखा जिरून जातो. पुन्हा थेंब येतच राहतात. जरा ओल निर्माण झाली की इकडेतिकडे विखुरलेले, गुरांच्या पायाखाली खुंदळलेले बी अंकुरते. काही दिवसांत गवत डोके वर काढू लागते. आत्ता आत्तापर्यंत उजाड दिसणाऱ्या जमिनीवर कुठे कुठे हिरवळ दिसू लागते. हे सृष्टिचक्रही जगण्यात येवो तुझ्या. काहीच नाही अशा वातावरणात कुठे तरी काही दिसेल हा विश्वास महत्त्वाचा.
कबूल की ना निसर्ग तुझ्या हातचा ना बाजार. पराभूत योद्धय़ासारखा तू कायम या लढाईत हरलेला. तरीही घरादारासाठी, बायकापोरांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी तरी तू हे मदान सोडू नयेस. जगण्यालाच नाकारणारी ही वाट धरू नये. सगळे नात्यांचे पाश तोडून अगदी एकटा-एकटा होत जेव्हा कडेलोटासाठी टोकदार सुळक्यावर उभा असशील तेव्हा थांब आणि जरा मागे वळून बघ..
संग्रहित लेख, दिनांक 24th Mar 2014 रोजी प्रकाशित
थांब! जरा मागे वळून बघ..
कबूल, की ना निसर्ग तुझ्या हातचा ना बाजार. पराभूत योद्धय़ासारखा तू कायम या लढाईत हरलेला. तरीही घरादारासाठी, बायकापोरांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी तरी तू हे मदान सोडू नयेस.

First published on: 24-03-2014 at 02:21 IST
मराठीतील सर्व धूळपेर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No nature and market in farmers control