‘मी’ हा संकुचितच असतो. ‘मी’ म्हणजे मर्यादा, ‘मी’ म्हणजे संकोच. मग हे जगही अशा अनंत ‘मीं’नी भरलेलं आहे, हे सद्गुरूबोधानं जाणवू लागलं की आपल्यातला संकुचितपणा आक्रसू लागतो. मन अधिक व्यापक होऊ लागतं, पण म्हणून काही चराचरातलं परमात्मस्वरूप लगेच जाणवू लागत नाही की मनात नि:शंकपणे ठसूही लागत नाही! त्यातही माझ्यासारख्या अनंत संकुचित ‘मीं’नी भरलेलं जग परमात्मस्वरूप कसं, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची प्रेरणा हीच साधनेची सुरुवात आहे. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ म्हणतात, मग या पिंडातच त्या ब्रह्मांडाचा शोध सुरू होतो. संकुचितात व्यापक, अशाश्वतात शाश्वत, नि:सारातलं सारतत्त्व शोधण्याची प्रक्रिया सुरू होते. साधुसंत मात्र अनंत रूपकांद्वारे हा बोध करत असतात. पाण्याचा बुडबुडा हा किती लहानसा, क्षुद्र असतो. त्याचा ‘जीव’ तरी किती क्षणिक! बुडबुडा पाण्यावर उत्पन्न होतो आणि क्षणार्धात त्याच पाण्यात विलीनही होतो. दिसायला बुडबुडा जरी स्वतंत्र भासत असला तरी प्रत्यक्षात ते पाणीच आहे. जलाशयात असे अनंत बुडबुडे ‘निर्माण’ होतात आणि ‘नष्ट’ होतात, पण प्रत्यक्षात अखंड पाणीच कायम आहे. बुडबुडय़ांचे त्या पाण्यावाचून स्वतंत्र अस्तित्व आहे का? पाण्यावाचून त्यांची वेगळी सत्ता आहे का? पण तो बुडबुडा जर स्वत:ला पाण्यापेक्षा वेगळा मानू लागला आणि आपलं वेगळेपण टिकवण्याचा नेटानं प्रयत्न करू लागला, तर त्याचा काही उपयोग आहे का? तसे प्रत्यक्षात आपण त्याच अनंतातून ‘निर्माण’ झालो आणि त्याच अनंतात विलीनही होणार, तरी या मधल्या काळात आपण आपली स्वतंत्र सत्ता निर्माण करून ती टिकवू आणि वाढवू पाहात आहोत! स्वामी स्वरूपानंदही ‘संजीवनी गाथे’त सांगतात, ‘‘नाना रूपीं विश्व नटलेंसे भासे। परी एक असे आत्म-रूप।। १।। जैसे सान थोर होती अलंकार। परी तें साचार सुवर्ण चि।। २।। वस्त्रीं ओत-प्रोत तंतु चि केवळ। तरंगी तें जळ अभिन्नत्वें।। ३।। स्वामी म्हणे तैसें विश्वीं निरंतर। स्थिर अविकार आत्म-तत्त्व।। ४।।’’ (अभंग क्र. २५६). एकाच सोन्यापासून लहानशी कर्णफुले, मोठा हार बनतो, पण त्यांचा आकार जरी वेगवेगळा असला, लहानमोठा असला तरी सोने एकच असते. एकाच सोन्यापासून ते घडलेले असतात. वस्त्रं जरी वेगवेगळ्या आकारांची, वेगवेगळ्या धाटणीची, वेगवेगळ्या रंगांची दिसत असली तरी त्यांचा तंतू एकच असतो. जलाशयातील तरंगही त्या जलाशयापासून अभिन्न असतात. अगदी त्याचप्रमाणे हे विश्व जरी अनंत रूपांनी नटलेले भासत असले तरी त्यांचे आत्मतत्त्व एकच आहे. आपली स्थूल इंद्रिये ही दृश्याचाच बोध करतात. त्यामुळे दृश्यातील विविधतेच्या मुळाशी असलेलं सूक्ष्म एकत्व आणि एकतत्त्व आपल्याला जाणवत नाही. त्यासाठीचा उपाय म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायला पाहिजे. स्थूलाचा प्रभाव आहे म्हणून स्थूलाची ओढ आहे आणि स्थूलाची ओढ आहे म्हणून मनात स्थूलाच्या प्राप्तीचे अनंत संकल्प आहेत. या अनंत संकल्पांच्या गर्दीमुळेच सूक्ष्म मन आत्म-तत्त्वाच्या जाणिवेला पारखे झाले आहे!