प्रा. वसंत काळपांडे यांचा ‘‘असर’चे निदान आणि असरकारी’ उपाय’ हा लेख (२२ जाने.) निश्चितच शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत विचार करायला लावणारा आहे. नवीन शिक्षण धोरणानुसार ज्ञानरचनावादाचा वापर करून विद्यार्थी शिकावा असे अपेक्षित आहे व ते रास्तही आहे. परंतु त्यादृष्टीने शिक्षकांची, शाळांची तयारी असणे गरजेचे आहे. त्या पद्धतीची अभ्यासक्रमाची रचना, अध्ययन-अध्यापन पद्धत असून भागणार नाही, तर त्याची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होतेय ते महत्त्वाचे आहे. उपक्रम प्रकल्प घ्यायचे असतात म्हणून घ्यायचे अशी शिक्षकांची औपचारिकता असेल तर हाती काय लागणार? याचाही विचार होणे गरजेचे आहे. ज्ञानरचनावादाने विद्यार्थी शिकेल, परंतु त्या पद्धतीची वातावरणनिर्मिती व अंमलबजावणी हवी आहे. यासाठी शिक्षकांची ज्ञानरचनावादाबाबतची तयारी करणे गरजेचे वाटते. खरेतर शिक्षक आजही हर्बार्टच्या पंचपदीच्या बाहेर जायला तयार नाही. पाठय़पुस्तकाच्या पलीकडे जायचे म्हणजे काय करायचे? याचे नियोजन असायला हवे.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी सर्वागीण विकास अपेक्षिला आहे. त्या मार्गामध्ये अनेक अडचणी, त्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन रेकॉर्ड म्हणून होणार असेल तर अपेक्षित उद्देश साध्य होणार नाही. अप्रगत विद्यार्थी दिसायलाच तयार नाही ही बाब अयोग्य आहे. याच पद्धतीने शिक्षणप्रक्रिया चालली तर भवितव्य शोचनीय आहे.
उपक्रम, प्रकल्प, मूल्यमापन, अध्यापनाची वेगवेगळी प्रतिमाने यांचा प्रत्यक्ष वापर याबाबत अधिक बारकाव्याने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचे निदान होऊन व त्यावर उपचार झाले तरच यश हाती लागेल नाहीतर ‘ऑपरेशन इज सक्सेसफुल, बट पेशंट इज डेड’ अशी स्थिती झाल्याशिवाय राहणार नाही.
भारतात भाषणस्वातंत्र्य सर्वात महाग !
नंदी आणि नंदीबल या अग्रलेखात (२९ जाने.)म्हटले आहे त्याप्रमाणे, वृत्त वाहिन्यांच्या बाल बुद्धीमुळे अशी प्रकरणे नको तितकी फुगवली जातात आणि त्यांच्यापेक्षाही बालबुद्धी असलेले आपले प्रेक्षक तोंडात बोटे घालून या चर्चाचे रवंथ करत असतात. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत ही बौद्धिक दिवाळखोरी सुखेनव सुरू असते. हिंदीत तर शिसारी येईल इतकी वाईट असते.
परंतु याच अग्रलेखात नंदी यांच्याबद्दल मांडलेला मुद्दा मात्र मला जरा दुसऱ्या अंगाने विचारात घ्यावासा वाटतो. प्रा. नंदी यांनी मागासवर्गीयांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलताना ते, ‘तेही आता उच्चवर्णीय यांच्याबरोबरीने आले आणि त्यामुळे मला प्रजासत्ताकात आशा वाटते,’ असे म्हणाले असतील तर तेही विधान आक्षेपार्हच नाही का? कारण जरी त्यांनी त्यांच्या मते दलितांना उच्चवर्णीय मंडळींच्या बरोबर आणून बसवले असले तरी भ्रष्टाचार या संदर्भात ते आहे आणि इतर मागासवर्गीय, दलित, आदिवासी हे भ्रष्टाचार करतात ते त्यात सापडतात, असे विधान सार्वजनिक व्यासपीठावर करणे हा मागासवर्गीय अत्याचार कायदय़ांतर्गत गुन्हा ठरू शकतो.
भाषणस्वातंत्र्य आपल्याकडे जरूर आहे, पण ते चांगलेच महाग आहे इतकेच!
सागर पाटील, कोल्हापूर</strong>
नेहरूंना बोटचेपे ठरवणे अनाठायी
‘तणावामागचे ताण’ हा अग्रलेख (१० जाने.) वाचून सखेद आश्चर्य वाटले. स्व. जवाहरलाल नेहरूंबद्दल ‘अतिभाबडे शेजारप्रेम’, ‘स्वतच्याच प्रतिमेच्या प्रेमात पडलेले पंतप्रधान’ हे शब्दप्रयोग वाचून सामान्य नागरिक आणि बहुश्रुत, व्यासंगी संपादक यांच्यात फरक काय हा प्रश्न पडला. खोलवर जाऊन, वस्तुस्थिती जाणून घेण्याऐवजी नेहरूंना स्वप्नात रमणारे, आदर्शवादी आणि म्हणून चीन व पाकिस्तान यांच्या बाबतीत बोटचेपे धोरण ठेवणारे अशी त्यांची प्रतिमा जाणूनबुजून उभी करणारे विशिष्ट विचारसरणीचे लोक आहेत. आपण त्यांचीच री ओढावी याचे आश्चर्य वाटले.
डिसेंबर ४, १९४७ रोजी संसदेमध्ये परराष्ट्र धोरणाबद्दल बोलताना नेहरूंनी स्वत: ‘ I do not think it is purely idealistic… it is, if you like, opportunism in long term… ’ असे म्हटले होते. चीनच्या बाबतीत नेहरूंची धोरणात्मक चूक असली, तर ती सीमारेखेतील अनिश्चित (मॅकमोहन लाइनने न निश्चित केलेल्या ) भागाबाबतीत चीनची बाजू नजरेआड करून (बऱ्याच प्रमाणात, त्या वेळच्या दिग्गज विरोधी नेत्यांच्या दबावामुळे) ‘फॉरवर्ड पॉलिसी’चा अवलंब करणे, ही होऊ शकते.
– श्रीधर शुक्ल, ठाणे.
धुरा सोपवण्याचा सोपस्कार!
‘गांधी आडवा येतो’ हा वक्रोक्तीपूर्ण लेखनशैलीतल्या अग्रलेखात (२१ जाने.) काँग्रेसजनांची गांधी घराण्याबद्दल असलेली अगतिकता आणि त्यांची लाचारी चांगल्या प्रकारे मांडली आहे. देशवासियांचे दुर्दैव असे की, विरोधी पक्षही असंवेदनशील आणि गटबाजीत गुंतलेले असल्यामुळे सत्तासंपादनामध्ये हा गांधी खरोखरच आडवा येतो की नाही, हे पाहावे लागेल.
तसे पाहिले तर राहुल गांधी हे कोणत्या पदावर होते हे महत्त्वाचे नसून काँग्रेसमध्ये सोनियांनंतर ते निर्विवाद नेते होते. काँग्रेसमध्ये आजपर्यंत कधीही नसलेले पद निर्माण करून ते राहुल गांधी यांना दिले, म्हणून त्यांच्या कामामध्ये आणि काँग्रेसमध्ये काहीही फरक पडणार नाही. निवडणुकीच्या परीक्षेत सातत्याने नापास झालेल्या या ढ विद्यार्थ्यांला ‘पुढच्या वर्गात ढकलावे’ त्याप्रमाणे राहुल यांच्याकडे पक्षाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्याचा सोपस्कार उरकण्यात आला आहे.
विवेक विश्वनाथ ढापरे, कराड.
नवा सर्वसमावेशक प्रवाह हवा
ज. वि. पवार यांचा ‘राजकीय आरक्षण : गोंधळाचे कारण’ हा लेख (२९ जाने.) वाचला. मुळात आपले राजकारणी, मार्गदर्शक, आदर्श हे एखाद्या महापुरुषाला, त्याच्या कार्याला एका विशिष्ट समाजाचे बनवतात आणि तेथूनच हा जातिवाद विस्तारतो. त्यानंतर भरीस भर म्हणून आरक्षणाच्या नावाखाली द्वेषाची बीजे पेरली जातात.पुढे विशिष्ट समाजाचे नेतृत्व करण्यासाठी संघटना, ब्रिगेड, संघ स्थापन केले जातात आणि मग तस्सम भिंती, कुंपणे उभारली जातात.
आज त्या महापुरुषांची समुद्रात, वेशीवर स्मारके उभारण्यापेक्षा गरजवंत लोकांना सोयी-सुविधा पुरवा. एक सक्षम भारत उभा करा.आजही दलित समाजात किंबहुना अनेक समाजांत ज्यांना आरक्षणा पेक्षा आíथक, शैक्षणिक मदतीची गरज आहे असे लोक खूप आहेत. त्यांच्या सबलीकरणासाठी एक नवीन पारदर्शक आणि सर्वसमावेशक (काँग्रेसकडून फक्त उच्चारलाच जाणारा) प्रवाह उदयास आला पाहिजे.
निखिल कुलकर्णी, ठाणे.
विडंबनासारखी स्थिती!
राजेंद्र कृष्ण यांनी १९६५ मध्ये लिहिलेले आणि मोहम्मद रफींनी गायलेले ‘जहां डाल डाल पर सोने की..’ हे देशभक्तिपर गीत आजही प्रचंड लोकप्रिय आहे आणि पुढेही राहील; पण परवाच्याच प्रजासत्ताक दिनी ते पुन:पुन्हा कानावर पडले आणि एकेकाळचे हे देशभक्तिपर गीत आजच्या परिस्थितीत देशाबद्दल व्याजोक्ती करणारे विडंबन गीत वाटू लागले. असत्य, िहसा, असहिष्णुता या सगळ्यांचा सामना सर्वसामान्यांना करावा लागत असताना, आपल्या नद्यांमधून अमृत नव्हे, तर प्रदूषणाचे विष वाहात असताना, आपले ‘ते’ शब्द आणि आजची ही सर्व परिस्थिती पाहून राजेंद्र कृष्ण यांच्या आत्म्यालाही (मृत्यू : १९८८) वेदनाच होत असाव्यात.
रवीन्द्र पोखरकर, कळवा-ठाणे
हा राष्ट्राचा अपमान नाही?
ज्येष्ठ दाक्षिणात्य गायक कलावंत एस. जानकी यांनी पद्म पुरस्कार नाकारल्याचे वाचले. काही वर्षांपूर्वी सितारादेवी यांनाही असा पुरस्कार जाहीर झाल्यावर तो नाकारल्याचे स्मरते. हे अयोग्य आहे. माझ्या माहितीप्रमाणे असे पुरस्कार देण्याआधी शासन संबंधित व्यक्तीची संमती घेते. त्यामुळे नंतर तो नाकारणे गर आहे. हा पुरस्कार राष्ट्राच्या वतीने दिला जातो. तो असा नाकारणे हा एका अर्थाने राष्ट्राचा, तुमच्या रसिक चाहत्यांचा अपमान नव्हे काय?
– राम ना. गोगटे, वांद्रे (पूर्व)