फेसबुक आणि ब्लॉगच्या जमान्यात तत्त्वज्ञानाची चर्चा केवळ पुस्तकांपुरती किंवा विद्यापीठीय चर्चासत्रांपुरती मर्यादित राहू नये, असे मानणारा एक चळवळय़ा प्राध्यापक, पुस्तकांच्या मानीव वर्चस्वामुळे तत्त्वज्ञान क्षेत्राचे काय नुकसान झाले, याबद्दलही बोलतो आहे आणि ही चर्चा पुस्तकांच्या बाहेरही झाली पाहिजे.. ती लोकाभिमुख झाली पाहिजे, असे सांगतो आहे..
युरोपीय-पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या विचारविश्वात प्रचंड उलाढाली नेहमीच चालू असतात. तत्त्ववेत्ते आणि तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक समाजातील प्रत्येक समस्या आपली मानतात. समस्यांवरील तत्त्वचिंतनाला केवळ वर्ग, चर्चासत्रे, परिसंवाद, नियतकालिके, विद्वतजड प्रकाशने इत्यादीच्या सोन्याच्या िपजऱ्यात बंदिस्त करून अल्पसंतुष्ट अन् आत्ममग्न न राहता समाजमाध्यमाच्या चव्हाटय़ावर समस्यांची तड लावू पाहतात. रिचर्ड ड्वारकीन्स, नोम चोम्स्की, सायमन ब्लॅकबर्न, ‘नॉब इफेक्ट’वाला जोशुवा नॉबसारखे तत्त्ववेत्ते, तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक आणि तत्त्वज्ञानाची चाह असलेले लाखो तत्त्वज्ञानप्रेमी कोणत्याही माध्यमातून व्यक्त होण्यात अवमान नाही तर सन्मान समजतात. फेसबुक, ट्विटर, ब्लॉग्ज, व्हाट्सअॅप, संकेतस्थळे यांचा संपूर्ण क्षमतेने ते वापर करतात. भारतातील तत्त्वचिंतन सामान्य लोकांपर्यंत नेऊन प्रवाही ठेवावयाचे असेल तर ‘ठेविले अनंते..’च्या स्थितीजड सोन्याच्या िपजऱ्यातून ते मुक्त होणे गरजचे आहे. यापैकी अमेरिकेतील एक विद्यमान चळवळे तत्त्ववेत्ते एरिक श्वाइत्झगेबेलयांचे हे चिंतन..
एरिक श्वाइत्झगेबेल हे अमेरिकेतील कॅलिफोíनया विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राद्यापक असून त्यांनी दोन प्रकारच्या समस्यांची चर्चा केली. मानसशास्त्राचे तत्त्वज्ञान, तत्त्वज्ञानाचे मानसशास्त्र, मनाचे तत्त्वज्ञान, विज्ञानाचे तत्त्वज्ञान, संवेदनात्मक आणि बोधात्मक मानसशास्त्र, मानवी जाणिवेचे स्वरूप इत्यादी तांत्रिक समस्या त्यांनी हाताळल्याच, पण मान्यताप्राप्त तत्त्ववेत्ते आणि तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांचे खासगी जीवनातील आणि सार्वजनिक जीवनातील नतिक वर्तन, त्यांचे दंभ, अहंकार आणि त्यांचे लालसी राजकारण या उग्र समस्यांची चर्चा रास्तपणे तात्त्विक चिंतनाच्या ऐरणीवर आणली. हे नाजूक काम करणारे ते पहिले तत्त्ववेत्ते आहेत.
तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांचे नतिक वर्तन खरेच नतिक असते काय?, (सामान्य पुस्तक चोरापेक्षा) नीतितज्ज्ञच जास्त पुस्तके चोरतात का?, तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि त्यांचे विद्यार्थी उदार अंतकरणाचे असतात काय?, तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक न चुकता मतदान करतात का?, तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांचे चर्चासत्रांमधील तथाकथित सभ्य वर्तन, नीतितज्ज्ञ आईशी चांगले वागतात काय?, (अिहसा शिकविणाऱ्या) नीतितज्ज्ञांचे मांसाहारी भोजन, नीतितज्ज्ञ वाईट वागत असतील तर त्यांच्याकडून जगाने नीतिशास्त्र का शिकावे?, या त्यांच्या अनेक मार्मिक लेखांनी एकच खळबळ उडविली. एका अर्थाने ते ‘तत्त्वज्ञानातील जागल्या’ आहेत, असे म्हणता येईल.
‘पर्प्लेक्सटीज ऑफ कॉन्शनेस’, ‘डिस्क्रायिबग इनर एक्स्पीरियन्स? प्रपोनन्ट मीट्स स्केप्टिक’ हे दोन ग्रंथ आणि अनेक लेख त्यांनी लिहिले आहेत. ‘द स्प्लिंटर्ड माइंड’ हा त्यांचा ब्लॉगही सुरू आहे.