रजनी कोठारी हे विचारवंत होते, असे म्हटल्यावर आपल्याकडे किमान तीन प्रश्न येऊ शकतात :  डावे विचारवंत की उजवे? कोणता विचार दिला त्यांनी? की उगाच पद्धत म्हणून कुणालाही विचारवंत म्हणतात तसलेच हे? – या तीनही प्रश्नांच्या किती तरी पलीकडे कोठारी यांचे कर्तृत्व गेले होते. जागतिकीकरणाच्या आधीच्या आणि नंतरच्या काळातील प्रश्न साकल्याने समजून घेणाऱ्या या विचारवंताने, राजकीय-सामाजिक संशोधनाची दिशा कशी असावी हे स्वत:च्या निर्णयातून आणि अभ्यासातून दाखवून दिले होते. ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज’ची- म्हणजे ‘विकासशील समाज अध्ययन केंद्रा’ची दिल्लीत १९६३ साली झालेली स्थापना हा असाच एक निर्णय. ‘भारतीय लोकशाहीचा घाट आणि तिचे सत्त्व’ या विषयावर, त्या वेळी वयाच्या तिशीत असलेल्या कोठारींनी १९६१ साली इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पोलिटिकल वीकलीमध्ये दीर्घ लेखमाला लिहिली होती. ती वाचून एशिया सोसायटीच्या एका संस्थापकाने कोठारी यांना खासगी निधीतून ७० हजार रुपये दिले. या पैशाचा वापर कोठारींनी बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातील प्राध्यापकी सोडून, स्वतंत्रपणे ग्रंथलेखनासाठी करावा, अशी दात्याची अपेक्षा होती; पण कोठारींनी त्याऐवजी संस्था-उभारणी केली. ‘त्या वेळी सरकारी योजनांवरच सामाजिक अभ्यासाचा भर असे. हा अभ्यासही सरकारी आकडेवारीच्या आधारे होई. त्यामुळे, स्वतंत्र संशोधन व त्यातून येणारे- सरकारला काय हवे आहे याची तमा न बाळगणारे- निष्कर्ष काढण्यास वाव नसे. हे थांबावे म्हणून संस्था काढली’ असे कोठारी अनेकदा सांगत. ती परिस्थिती या केंद्राने बदलू पाहिली, केरळमध्ये १९६५ आणि पुढे देशभर १९६७ सालच्या निवडणुकांपूर्वी जनमताचा कौल कसा अजमावायचा, याचे निष्पक्ष आडाखे आणि कार्यपद्धती या संस्थेने तयार केली. विविध राज्ये, तेथील प्रादेशिक पक्ष, यांचा अभ्यास यापुढे करावाच लागेल कारण ‘केंद्र सरकार’च्या शासनशीलतेची पातळी खालावत चालली आहे, लोकांमध्ये समानीकरण आणि विभाजन अशा दोन्ही प्रक्रिया (याला कोठारींचा शब्द ‘अ‍ॅग्लोमरेशन’ किंवा मराठीत, ‘समाजन’?) वेगाने सुरू आहेत, असे सिद्धान्तन कोठारींनी केले. जातीचे राजकारण हे राज्याराज्यांत विभाजित झालेल्या ‘भारतीय’ राजकीय प्रक्रियेचा महत्त्वाचा घटक असल्याने ते अभ्यासावेच लागेल, हेही कोठारींनी सप्रमाण दाखवून दिले. कोठारींचा अभ्यासझोत ‘लोकांचे राजकीय वर्तन’ हाच असला, तरी राजकीय वर्तनाच्या ज्या अमेरिकी अभ्यासपद्धती आयत्याच उपलब्ध होत्या, त्या नाकारून त्यांनी या नव्या दिशा शोधल्या. अभ्यासक हा ‘निष्ठावंत’ असेल तर संशोधन-अभ्यास यांनाच बाधा येते, याची जाणीव बहुधा कोठारींना अगदी आपसूकच होती. स्वायत्त बाणा त्यांच्याकडे अंगभूत होता आणि त्यांनी जपला. नवनिर्माण आंदोलनाच्या संपर्कात असणारे कोठारी हे संजय गांधींच्या उदयापूर्वी ‘इंदिरा गांधींचे खास दूत’ म्हणून नवनिर्माण आंदोलकांशी वाटाघाटी करीत होते, पण आणीबाणीच्या काळात इंदिराविरोधकच होऊन त्यांनी लोकायन ही संस्था स्थापली, मोरारजी देसाईंच्या सरकारला विद्यापीठांच्या स्वायत्ततेसाठी स्वत:हून दीर्घ अहवाल पाठविला. ‘कोठारी हे अमेरिकी हेरसंस्थेचा (सीआयए) माणूस आहेत’, ‘त्यांचे केंद्र म्हणजे सीआयएचा अड्डा’ अशा टीकेला हसण्यावारीच नेले आणि ‘स्वयंसेवी संस्थांचा निधी कोठूनही येवो- त्या भारताच्या राजकारणापुढे निराळे प्रश्न मांडताहेत आणि या ‘बिगरपक्षीय राजकीय प्रक्रिये’चा अभ्यास केलाच पाहिजे, हे मत मांडत राहिले. अभ्यासेतर प्रसिद्धीचे लिप्ताळे अजिबात नसल्यानेच, पुढे ‘गुजरातमध्ये राज्याच्या आशीर्वादाने झालेल्या हिंसाचाराबद्दल तेथील लोकांनी गप्प आणि समाधानीही राहणे, हे भावी राजकारणाची दिशाच बदलणारे आहे,’ असा इशाराही त्यांनी २००२ सालच्या लेखातून दिला होता. कदाचित अभ्यासाच्याच परिभाषेत ते अडकले अशी टीका होईल, पण ही परिभाषा तयार करण्याचे त्यांचे कष्ट पुढल्या अभ्यासकांना उपयोगी पडताहेत. ‘विचारवंत’ म्हटले की किमान तीन प्रश्न येऊ शकतात, अशा समाजात कोठारींच्या निधनवार्तेने हळहळ पसरणारही नाही; तरीदेखील ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे त्यांना आदरांजली.