व्यवस्थेला प्रश्न विचारणारे नको असतात, प्रतिवादी नको असतात. व्यवस्थेत धडपडून उठू पाहणारा, वेगळे काही सांगू पाहणारा बरोबर नेम धरून टिपला जातो. अशा वेळी तळाच्या माणसाबद्दल बोलण्याची जोखीम उचलली पाहिजे, हस्तक्षेपाचा शब्द उच्चारला गेला पाहिजे, तळाची वेदना शब्दात आली पाहिजे. निखळ माणूसपणाचा शोध घेणारा हा प्रवास मग वेदनादायी असला तरीही एका आश्वासक दिशेच्या बाजूने चाललेला असतो.
वर्तमानातील जटिलता उलगडणे ही आव्हानात्मक बाब होऊन बसली आहे. खेडय़ांभोवती सध्या अर्धनागर असे जग आकाराला येत आहे. गाव आणि शहर यांच्यातल्या सीमारेषा अंतराच्या दृष्टीने कधीच पुसट होत गेल्या; पण माध्यमे, दळणवळणाची साधने यामुळे आता दोन्ही जगांत िभत घालता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गावांनी कात टाकली आहे. पूर्वी रस्त्यालगत जे फाटे होते त्या ठिकाणी भरदुपारीही निर्मनुष्यता आढळायची आणि अंधार पडल्यानंतर अशा फाटय़ांवर उतरून गावी जायलापण भीती वाटत असे. आता अशा फाटय़ांवर प्रचंड गोंगाट असतो. प्रत्येक टपरीवर, ढाब्यावर, छोटय़ा-मोठय़ा उपाहारगृहांवर वेगवेगळी गाणी कर्णकर्कश आवाजात चाललेली असतात. या गाण्यांचे आवाज एकमेकांत मिसळू लागतात. हे सगळे अगदी टिपेला पोहोचलेल्या आवाजाद्वारे आपल्यावर येऊन आदळत असते. हा सगळा बधिर करून टाकणारा गलबला आपल्याभोवती असल्यावर वर्तमानाचे कंगोरे तपासताना गोंधळ उडतो. कुठल्याही गोष्टीचा चटकन अर्थ लावणे कठीण जाते आणि नेमका अर्थ उशिराच उलगडतो.
..गावांनी कूस बदलली असे सगळेच म्हणतात. सर्व काही झपाटय़ाने बदलले आहे आणि एक प्रगत असे जग अस्तित्वात आले आहे असे म्हणावे तर पावलोपावली ठेचाळायला लावणारे, चकित करणारे अनेक प्रश्न आहेत. सगळीच वाताहत झाली असे म्हणावे तर काही कल्याणकारी खुणा दिसू लागतात. म्हणजे निबिड असा घनघोर अंधार नाही आणि आसमंत उजळून टाकणारी आश्वासक सकाळही नाही. एका संधिकालाचीच अवस्था सर्व खेडी अनुभवत आहेत. चाचपडायला लावणे हेच संधिकालाचे वैशिष्टय़ असते. अशा वेळी या संधिकाळाला चिमटीत पकडणे ही गोष्ट सोपी नाही. हा संभ्रम  पकडण्यासाठी तीक्ष्ण आणि धारदार अशीच नजर असावी लागते. एक निराळे तल्लखपण असल्याशिवाय हे वर्तमान निरखता येत नाही.
..आवाज जेव्हा टिपेला पोहोचतो तेव्हा बारीकसारीक आवाज ऐकू येत नाहीत. हे आवाज क्षीण असतात. जिवाच्या आकांताने जरी अशा बारक्या जीवांनी ओरडायचे ठरले तरीही त्यांचा आवाज या गदारोळात उमटून पडत नाही. व्यवस्थेत चिणले जात असताना अशा वंचितांनी प्रतिकाराचा शब्द उच्चारला तरी तो जागच्या जागीच विरतो. अशा वेळी त्यांच्या वतीने कोणाला तरी बोलावे लागते. त्यांच्या अस्फुट शब्दांना वाचा द्यावी लागते. या लोकांचे उमाळे, उसासे शब्दात बांधावे लागतात. कधी कधी मोठी लाट येऊन आदळते किंवा जोराचे वादळ सुटते, अशा वेळी समुद्रकिनाऱ्यावर वाळूत मारलेल्या रेघा मिटून जातात, नष्ट होतात. या रेघांचे अस्तित्वच संपून जाते, तसेच अनेक लोकांच्या जगण्याचे होते. रेटय़ाची ताकद अजस्र असते आणि ती सर्वानाच पेलता येते असेही नाही.
..काळाचे संदर्भ बदलत आहेत. ज्याचा आवाज जेवढा मोठा तेवढे त्याचे जगणे सुसह्य़. आता हेच पाहा ना, महागाईचा विषय निघाला किंवा एखाद्या वस्तूचे भाव वाढले कीलगेच माध्यमांसमोर जी प्रतिक्रिया उमटते ती दर महिन्याला आíथक सुरक्षितता असणारांची. जगण्याच्या लढाईत ज्यांची मोठी तारांबळ उडते आणि तोंडमिळवणी करताना ज्यांच्या नाकी नऊ येतात, दैनंदिन जगण्यातूनच जे चिपाडासारखे पिळून निघतात अशा हातावर पोट असणाऱ्या लक्षावधी असंघटितांना कुठे वेळ असतो महागाईबद्दल बोलायला किंवा त्यांच्या प्रतिक्रिया तरी कुठे उमटतात माध्यमाद्वारे. या धबडग्यात त्यांचे सुस्कारे विरून जातात. जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये हेच चालू आहे. आदळणाऱ्या लाटांचा प्रतिकार करण्याची कुवत नसणारे अनेक जीव पाहता पाहता संपून जातात. अशा वेळी त्यांच्याबद्दल, त्यांच्या वतीने, त्यांच्यासाठी बोलणारे कुणी तरी लागते. व्यवस्था इतकी चतुर आणि तडजोडीच्या तत्त्वावर उभी असते की तिथे असा वेगळा शब्द उमटूच नये याची खबरदारी घेतली जाते. व्यवस्थेला प्रश्न विचारणारे नको असतात, हस्तक्षेप करणारे नको असतात, प्रतिवादी नको असतात. व्यवस्थेत धडपडून उठू पाहणारा, वेगळे काही सांगू पाहणारा बरोबर नेम धरून टिपला जातो. अशा वेळी तळाच्या माणसाबद्दल बोलण्याची जोखीम उचलली पाहिजे, हस्तक्षेपाचा शब्द उच्चारला गेला पाहिजे, तळाची वेदना शब्दात आली पाहिजे. आपण जे बोलू ते केवळ ‘मोले घातले रडाया’ असे नको, तर ज्याबद्दल बोलू त्याबद्दलची जिवंत आस्था असली पाहिजे. ही आस्था संकुचित नको, एकांगी नको, केवळ हितसंबंधांवर आधारित नको. या आस्थेचा परीघ व्यापक, विशाल असेल तरच त्यात काही चांगले उगवून वर येण्याची अपेक्षा करू शकतो आपण. सर्व मर्यादा मोडून काढणारा, सर्वाविषयी झरणारा आणि निखळ माणूसपणाचा शोध घेणारा हा प्रवास मग वेदनादायी असला तरीही एका आश्वासक दिशेच्या बाजूने चाललेला असतो.
वंचितांचे वर्तमान शब्दात पकडण्यासाठी हे सगळे तर हवेच, पण त्या जोडीला लागते ती सहृदयी निर्दयता. संवेदनशीलता असल्याशिवाय कळवळा उमटत नाही, पण आपला सगळा कळवळा हा भावविवशतेला स्पर्श करणारा असेल तर त्यातून साकारते ते केवळ भावनेचे धुके आणि या धुक्यात मग सगळेच हरवते. अनुभव शब्दातून जेव्हा साकारतो आणि त्याला कलात्म रूप लाभते त्या वेळी त्याचा टणकपणा हरवू नये असेही वाटतेच प्रत्येक संवेदनशील लेखकाला. बऱ्याचदा अनुभवातली विदारकता आणि अस्वस्थता लिहिणाऱ्यालाच कोसळून टाकणारी असते. अशा वेळी कणा मोडून पडल्यानंतर येणारे पांगळेपण भोवती दाटून येते कधी कधी. त्यातून बाहेर पडण्यासाठी मग मोठी जीवघेणी धडपड सुरू होते. भावविवशतेत अडकून पडले तर कोणताच टोकदारपणा येत नाही अनुभवाला. अनुभव निसटू नये, सांडू नये असे वाटते तेव्हा त्याला पाऱ्यासारखे जपावे लागते. विदीर्ण करणारा अनुभव रेखाटताना लिहिणाऱ्याचेच काळीज फाटले तर मग त्याला आवश्यक ते टोक येणार नाही आणि नेमका परिणामही साधला जाणार नाही. ज्याच्या ठायी संवेदनशीलता असते तोच लिहितो हे तर खरेच, पण व्यक्त होताना आवश्यक असणारे हे निर्दयीपणसुद्धा हवेच. पाण्याचा बर्फ करून टाकणारे हे गोठलेपण असावेच लागते.
संवेदनशीलता, आस्थाभाव आणि हे असे सहृदयी निर्दयीपण या सर्व घटकांचा मिलाफ होतो तेव्हा एक वेगळेच रसायन दाटून येते. हे सारे एकवटल्यानंतर जो दाब येतो लिहिताना त्या वेळी एकूण मानवी जगण्याबद्दलचीच करुणा झिरपत जाते. या आंतरिक करुणेची ओल शब्दांना लागते तेव्हा त्यांना आपोआपच घनता लाभते आणि दुसऱ्याच्या काळजापर्यंत भिडण्याचे मोलही..

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…