पाँडेचेरीच्या श्रीमदर यांना एका साधकानं विचारलं, ‘‘माताजी गुहेत बसून योग करणे सोपे आहे परंतु जगात वावरताना योग करणे फार निराळे आहे नाही का?’’ त्यावर श्रीमाताजी म्हणाल्या, ‘‘योग दोन्हीकडे सोपा नाही. मला असे वाटत नाही की गुहेत राहून साधना करणे हे सोपे आहे. फक्त तिथे तुमचा अप्रामाणिकपणा लपून राहू शकतो. तर जीवनामध्ये, प्रत्यक्ष व्यवहारात तो लपू शकत नाही. गुहेत तुम्ही योग्यासारखे दिसू शकता पण जीवनात भोंदूपणा अवघड असतो. तेथे तुम्हाला योग्यासारखे वागावे लागते.’’
सद््गुरूंच्याच जगण्यात केवळ ‘बोले तैसा चाले’चा प्रत्यय येतो. श्रीगोंदवलेकर महाराज देहात असतानाची गोष्ट. संध्याकाळ मावळली आणि रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात झाली तेव्हा लक्षात आले की सरपणासाठी पुरेशी लाकडं नाहीत. श्रीमहाराज सुरुवातीला थोडे रागावले. म्हणाले, अरे तुम्ही प्रापंचिक माणसं. प्रपंचात पुढचा थोडा विचार करावा लागतो, थोडी तजवीज करावी लागते. मग रात्री चूल पेटवायला पुरेशी लाकडं नाहीत, हे दुपारीच लक्षात यायला नको होते का? वगैरे.. नंतर क्षणभर थांबून म्हणाले, चुलीत काय लाकडंच लागतात ना? मग आपल्याकडे लाकडं काय कमी का आहेत? असं म्हणून घरातले काही लाकडी पाट तोडून चुलीत टाकले. मग पोळपाट-लाटणेही आगीच्या स्वाहा केले. तरी तेवढे पुरेना तेव्हा लगतच एक नवी खोली बांधणे चालू होते. त्या खोलीच्या आढय़ाचे लाकूड काढून ते तोडून घ्यायला सांगितले! शेवटी चूल पेटली आणि स्वयंपाक झाला! प्रपंचात जे नाही त्याच्या काळजीने पोखरून जाणे नाहीच आणि जे आहे त्याचंही ममत्व नाही. श्रीमहाराज एकांतवास सोडून जेव्हा गोंदवल्यात आले आणि प्रपंचही करू लागले तेव्हा त्यांच्यातील वेगळेपण जाणवून अनेक लोक जमू लागले. त्यांना मान देऊ लागले. हे पाहून त्यांच्या मातोश्री गीताबाईंना कृतार्थ वाटू लागले. आता काशीयात्रेची एकच इच्छा बाकी आहे ती पुरी व्हावी, असं त्यांना वाटलं. महाराजांनी लगेच हो म्हटलं. काशीयात्रेचा दिवस जवळ येऊ लागला तसं आईंनी महाराजांना म्हटलं, ‘‘आपण यात्रेला गेलो तर घराकडे कोण पाहील?’’ महाराज म्हणाले, त्याची काळजी तू करू नकोस. मी सर्व व्यवस्था करतो. यात्रेला निघायचा दिवस उजाडला. गीताबाईंनी लोकांना सांगितले, अरे घराकडे जरा लक्ष असू द्या बरं! यात्रा संपवून मी लवकरच परत येते. तेव्हा श्रीमहाराज म्हणाले, ‘‘आई तू आता थकली आहेस. काळ कसा येईल कोण जाणे. तू घराचा लोभ कशाला ठेवतेस? मी त्याची वाट लावतो.’’ असं म्हणून भटजीबुवांना बोलावून श्रीमहाराजांनी विधिपूर्वक घरावर तुळशीपत्र ठेवलं आणि लोकांना सांगितलं, ‘‘ज्यांना जे हवं ते घरातून घेऊन जा.’’ पंधरा मिनिटांत घर स्वच्छ झालं! महाराज म्हणाले, ‘‘बघ आई. आता तुझे लक्ष अडकायला मागे काही शिल्लक राहिले नाही. चल आता!’’ गीताबाई कपाळाला हात लावून म्हणाल्या, तू बैरागी तो बैरागीच राहिलास बाबा! त्या काशीयात्रेतच गीताबाईंनी देह ठेवला. खरोखर मन अडकण्यासारखं सारं त्याआधीच महाराजांनी संपवून टाकलं होतं!
(चैतन्य प्रेम यांच्या विविध सदरांतून)