महाराष्ट्राच्या मुरब्बी राजकारण्यांच्या भाऊगर्दीतही पाच वर्षांपूर्वी कच्चं लिंबू म्हणून आपला डाव सुरू करणाऱ्या आणि राजकारणावर आपली मोहोर उमटविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येत्या लोकसभा निवडणुकीवरदेखील शिवसेना-भाजप युतीवरील आपले सावट कायम ठेवले आहे. शिवसेनेतील वारसावादातून पक्षाबाहेर पडलेल्या राज ठाकरे यांच्या नव्या स्वतंत्र पक्षास, शिवसेनेतील असंतुष्टांची आणि सेनेच्या सहानुभूतीदार मतदारांचीही साथ मिळाल्याने पाच वर्षांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाने सेना-भाजप युतीला धूळ चारली, हे त्या निवडणुकीतील मतांच्या आकडेवारीवरूनच स्पष्ट दिसते. मनसेच्या त्याच कर्तबगारीमुळे राजकीय क्षेत्रात राज ठाकरे यांचा दबदबा निर्माण झाला असला, तरी त्यामुळेच या पक्षाच्या राजकीय भूमिकेविषयी शंकाकुशंकांचे मोहोळही निर्माण झाले. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीपेक्षाही, शिवसेनेच्या विचारांशी जवळीक असल्याचा आभास मतदारांमध्ये टिकविण्याकरिता धडपडणाऱ्या या पक्षामुळे प्रत्यक्षात मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीला लाभ होतो, हा प्रचारही त्यामुळेच सुरू झाल्याने राज ठाकरे यांनी टाकलेले आपल्या पटावरचे नवे फासे असे चक्रावून टाकणारे ठरतील याची बहुधा भल्याभल्यांनाही नेमकी कल्पनाच आली नसावी. या पक्षाने रालोआसोबत यावे यासाठीचे प्रयत्न आधी फुसके ठरले आणि रालोआचे दरवाजे राज ठाकरे यांच्यासाठी बंद असल्याचे स्पष्ट झाले, तेव्हा ते थंडावले. त्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांची खेळी अजाणतेपणाची होती, की जाणीवपूर्वक केलेली होती, याचा शोध घेण्यासाठी साऱ्या पक्षांचे धुरीण वेळात वेळ काढून बसलेले दिसतात. रालोआमध्ये नसतानाही पंतप्रधानपदासाठी मात्र रालोआचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याचा पवित्रा घेऊन राज ठाकरे यांनी केलेली सेना-भाजपची कोंडी म्हणजे, ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’, असा प्रकार ठरू लागला आहे. त्यातच, शरद पवार यांनीही राज ठाकरे यांच्यावर स्तुतिसुमने उधळून भर घातली. राजकीय नेत्याने कधी झोपावे, कधी उठावे याचा सल्ला देऊन कधी काळी राज ठाकरे यांची खिल्ली उडविणाऱ्या शरद पवारांच्या तोंडूनच ही स्तुती झाल्याने राज ठाकरे यांना राजकीय विश्वात जणू ‘शत्रुंजया’चे स्थान मिळाले आहे. भाजपची राजकीय सद्य:स्थिती मजबूत असल्याचे स्पष्ट झाल्याने, मनसेच्या पाठिंब्याची आता रालोआला गरज राहिलेली नाही. म्हणून राजनाथ सिंहांनी राज ठाकरे यांच्या मोदीस्तुतीला आक्षेप घेतला असला तरीही मनसेच्या प्रचारातील मोदी स्तुतिस्तोत्रांचा फायदा भाजपला होणार, की मोदी समर्थक मतदारांची भाजपला मिळणारी मते मनसेकडे वळणार, या चिंतेने मात्र भाजपला ग्रासले आहे. राज ठाकरेंच्या ‘नमोस्तुती’ला आक्षेप घेत भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मनसेपासून भाजपला सुरक्षित अंतरावर नेऊन ठेवले असले तरी मनसेच्या सावल्या महाराष्ट्रातील भाजप-सेना युतीवरून हटलेल्या नाहीत. दुसरीकडे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज ठाकरे यांच्या मनसेला भाजपच्या मांडीवर बसवले आणि शिवसेनेला अलग पाडण्याचा प्रयत्न करीत संशयाचे बीज पेरले. भविष्यात शिवसेनेला दूर सारून मनसेला सोबत घेण्याचा भाजपचा डाव असल्याचा राजकीय आरोप करून पृथ्वीराज चव्हाण यांनी सोडलेला बाण सेना-भाजप युतीने तात्पुरता चुकविला असला, तरी आता काँग्रेस आघाडी आणि भाजप-सेना युती यांच्यातील सामन्याचे हत्यार म्हणून साऱ्यांचे लक्ष मनसेकडे लागल्याचे मात्र स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेचा फटका कदाचित गेल्या निवडणुकीएवढा तीव्र नसेल, पण राजकीय वातावरणाच्या रालोआकडे झुकणाऱ्या लहरी थोपविण्यासाठी तरी हे हत्यार वापरावे, यासाठीचे एक खटाटोप नाटय़ सुरू झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Apr 2014 रोजी प्रकाशित
राज, राजनाथ आणि पृथ्वीराज!
महाराष्ट्राच्या मुरब्बी राजकारण्यांच्या भाऊगर्दीतही पाच वर्षांपूर्वी कच्चं लिंबू म्हणून आपला डाव सुरू करणाऱ्या आणि राजकारणावर आपली मोहोर उमटविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण
First published on: 10-04-2014 at 02:33 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj rajnath and prithviraj