‘विद्यापीठाची तरी लाज राखा’ हा अग्रलेख (लोकसत्ता, १२ डिसेंबर) वाचला. मुंबई विद्यापीठासारख्या एके काळी नावाजलेल्या विद्यापीठामध्ये राजकीय हस्तक्षेप ही खरे तर लाजिरवाणी बाब आहे. जिथे विद्वत्तेची कसोटी लावली जाते तिथे लायक नसलेली व्यक्ती कुलगुरूसारख्या उच्चपदावर नियुक्ती मिळवते व सर्व कारभार सुमार दर्जाचा बनवते हे अगदी वाईटच. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची वाताहत लावणारे शिक्षण संस्थांचे व्यवस्थापक यांनादेखील कुलगुरू डॉ. वेळुकर यांचा वरदहस्त असल्याने काही महाविद्यालयांनी नियम डावलूनही त्यांच्याविरोधात कधीच कारवाई झाली नाही.
ज्याप्रमाणे डॉ. वेळुकर यांनी प्रा. हातेकर यांना निलंबित करून स्वत:चे बौद्धिक खुजेपण सिद्ध केले होते तशीच परिस्थिती अनेक महाविद्यालयांमध्ये दिसून येते. प्राचार्याना हाताशी धरून किंवा धमकावून कर्मचाऱ्यांच्या विरोधात खोटे पुरावे बनवून नियमबाह्य़ निलंबन करणे, आर्थिक नुकसान करणे, असा छळ सुरू आहे. कुलगुरू व संस्थाचालक यांचा घरोबा आणि राजकीय संरक्षण यामुळे आमचे कोण काय बिघडवणार? आम्ही संस्थेचे मालक आणि कर्मचारी हे नोकर (गुलाम) अशी दांभिक आणि गुंडगिरीची भाषा वापरतात. डॉ. हातेकरांच्या बाबतीत तीच अरेरावी डॉ. वेळुकरांची दिसून आली.

खरा ‘अजातशत्रू’
‘धूळपेर’ या सदरात (१५ डिसेंबर) आसाराम लोमटे यांनी ‘अजातशत्रू’ या विशेषणावर, चांगलाच ऊहापोह केला आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रांतील अशा तोंडदेखल्या हसतमुखरावांना ‘अजातशत्रू’ म्हणण्याची चुकीची पद्धत आहे. माझ्या पाहाण्यात असेही लोक आहेत, सर्व क्षेत्रांतील की, ज्यांनी आपला स्पष्टवक्तेपणा व रोखठोक विचारांशी जराही तडजोड न करता, व्यक्त होऊनही अपवाद सोडला तर कुणाचे वैर किंवा कुणी त्यांच्याशी वैर धरलेले नाही. उलट अशा परखड माणसांचा प्रगल्भ व विचारी माणूस आदरच करतो. स्पष्टवक्ताच खरे तर माझ्या लेखी अजातशत्रू असतो/असावा.
 – संदीप ल. राऊत,वसई

नव्या सत्ताधाऱ्यांचा  खेळ आता निमूटपणे पाहा
भाजपच्या दिल्लीतील एका नेत्याने साखर कारखाना हडप केल्याचा प्रताप व महाराष्ट्राचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांची आंध्रच्या एका आमदारासोबत तिरुपतीवारी या बातम्या (लोकसत्ता, ११ डिसेंबर) वाचून आश्चर्य किंवा खेद वाटला नाही. याचे कारण म्हणजे भारतीय राजकारणी, मग ते कोणत्याही पक्षाचे का असेनात, त्यांना जनतेशी बांधीलकी नकोच असते.
हे राजकारणी जेव्हा विरोधी पक्षात असतात तेव्हा सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेतात व त्यांचा भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आणतात. गरीब भोळ्या जनतेला वाटते की, हेच आपले तारणहार आहेत आणि त्यांना सत्ता बहाल करतात. (निवडणुकांपूर्वीची देवेंद्र फडणवीस आणि कंपनीची वक्तव्ये आठवा.)  परंतु सत्ताग्रहणानंतर हेच लोक पूर्वीच्या सरकारचीच धोरणे राबवतात व जनतेच्या पैशावर मौजमजा करतात. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर कारवाई होण्याची शक्यताही धूसरच आहे. पाच वर्षांत हे सरकार निष्क्रियच राहील, कारण भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे असलेले संबंध. कोणीही कोणास अडचणीत आणणार नाही. तेव्हा ज्यांनी त्यांना सत्ता अर्पण केली आहे त्यांनी पुढील पाच वर्षे फक्त निमूटपणे पाहात राहावे.
– चंद्रशेखर खारकर, ठाणे</strong>

लिमामधील असाही एक फिडेल !
‘चे मरणाचा तिसरा अंक’ हा अग्रलेख (१९ डिसें.) वाचून एका प्रसंगाचे स्मरण झाले. तो असा. पर्यटनासाठी मागील वर्षी पेरू देशाची राजधानी लिमा शहरात आम्ही गेलो होतो. आम्हाला स्थानिक गाइड म्हणून थोडेफार इंग्लिश बोलू शकेल असा एक तरुण दिला गेला. त्याला नाव विचारले असता त्याने आपले नाव फिडेल असे सांगितले. त्यावर मी गमतीने बोललो की तू फिडेल कॅस्ट्रो आहेस का? त्यावर तो उत्तरला, मीसुद्धा क्युबाचा आहे. माझ्या वडिलांनी माझे नाव त्यांच्याच (फिडेल कॅस्ट्रो) नावावरून घेतले आहे.
 ते माझ्या वडिलांचे आवडते हिरो होते. क्युबामध्ये माझ्या वयाच्या खूप मुलांची नावे फिडेल आहेत. पण माझे नाव मला आवडत नाही. मला ते अपमानास्पद वाटते. त्यांनी क्रांती करून कम्युनिझम आणला पण आमचा देश गरीब आणि मागासलेलाच ठेवला. अमेरिकन ब्रॅण्ड्स आम्हाला पाहिजे आहेत. नवीन जगाच्या आम्ही मागे पडलो आहोत. त्यामुळे मी क्युबा सोडून पेरूमध्ये गाइडचे काम करीत आहे. क्युबामधले सगळे तरुण माझ्यासारखाच विचार करतात. तो पोटतिडिकेने बोलत होता.  तेव्हा जाणवले की क्युबामध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहू लागलेत. बराक ओबामा यांना ५४ वर्षांनंतर जे काही साध्य होऊ शकले त्यामध्ये जागतिकीकरणाचा जबरदस्त रेटा हे महत्त्वाचे कारण असावे.
– डॉ. कैलास कमोद, नाशिक

..तर लेखक बिच्चारा राहणार नाही
काही दिवसांपूर्वी सुदीप नगरकरच्या ‘यू आर द पासवर्ड टु माय लाइफ ‘ या पुस्तकाच्या प्रकाशनाला गेलो होतो. प्रत्येक राज्यात तो जातो.. प्रमोशन करतो. असे आमच्या मराठीच्या बाबतीत होत नाही.. प्रकाशकांची अनास्था हेच त्याचे महत्त्वाचे कारण आहे. वास्तविक पाहाता मराठी माणूस प्रत्येक राज्यात पसरलेला आहे, परदेशात आहे. तेव्हा स्वत: श्रीमंत होता होता लेखकाला श्रीमंत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही किती प्रती काढता हे लक्षात येण्यासाठी प्रतींची संख्या देणे गरजेचे आहे. निदान इतके प्रकाशकावर बंधन घातले गेलेच पाहिजे. खरे तर अशाही विषयांवर सर्वत्र चर्चा होणे गरजेचे आहे. आमची समीक्षक मंडळीही खूप हुशार आहेत, कारण एक वेळ लेखक दुखावला तर चालेल, पण प्रकाशक दुखावला जाता कामा नये याची मात्र काही जण खूप काळजी घेतात.
जर समीक्षकांनी या प्रश्नाला तोंड फोडले, तर लेखक हा कधीच बिच्चारा वगैरे राहणार नाही.
– सतीश चाफेकर, डोंबिवली

नववर्ष साजरे करताना..
३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्ष साजरे करण्याचे वेड दिवसेंदिवस वाढतच आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री किती वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावून गोंधळ घालायचा याबद्दल जाहीर पत्रक काढण्यास काँग्रेसच्या राज्यात नेहमीच गोंधळ असे. त्यामुळे वृद्ध तसेच आजारी लोकांस खूप त्रास सहन करावा लागत असे. पोलीस नियंत्रण कक्षास १०० नंबरवर तक्रार केल्यास त्यांनाही काही माहिती नसे, हा माझा अनुभव.
आता राज्यातील नवीन सरकारने तरी ३१ डिसेंबरला बंद जागेत, बंद हॉटेल्समध्ये तसेच उघडय़ा मैदानांवर किती वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वापरता येईल यासंबंधी स्पष्ट सूचना वृत्तपत्र, आकाशवाणी, टी.व्ही.वरून त्वरित प्रसिद्ध करावी. तसेच सर्व पोलीस नियंत्रण कक्षांना त्वरित तक्रारींवर कारवाई करण्याच्या सूचना कराव्यात, ही विनंती.
 – विनायक अनंत जोगळेकर, बोरिवली (प.), मुंबई</strong>