अमेरिकेचे वित्तीय सत्ताकेंद्र अर्थात वॉल स्ट्रीटवरील एक उद्योगरत्न आणि भारतासह अमेरिकेच्या राजकारणी वर्तुळात ऊठबस असलेल्या रजत गुप्ताला अखेर गजाआड जावे लागले. मॅकिन्सी या जगभरात ख्यातकीर्त सल्लागार संस्थेचे जागतिक प्रमुख आणि गोल्डमन सॅक्ससह आख्यायिका ठरलेल्या अनेक संस्थांमध्ये कारकीर्द केलेल्या गुप्ता यांनी अमेरिकेतील जवळपास सर्व न्यायासनांचा- अगदी सर्वोच्च न्यायालयाचा व्यर्थ धावा केला. पण सुटका मिळाली नाहीच, उलट कोर्टकज्जांत वकील मंडळींची देणी वाढत गेली आणि तीही थकविली गेल्याचा आणखी एक गुन्हा त्यांनी शिरावर घेतला. अखेर मंगळवारी गुप्ता यांनी दोन वर्षांच्या कारावासासाठी न्यूयॉर्कमधील जिल्हा न्यायाधीशापुढे शरणागती स्वीकारली. गुप्ता यांच्यावरील खटला हा ‘इनसायडर ट्रेडिंग’च्या आरोपांचा म्हणजे पांढरपेशा मंडळींनी केलेल्या लबाडीचा आहे. जागतिक वित्तीय अरिष्ट चरमसीमेवर पोहोचले असताना २००८ सालच्या उत्तरार्धात हा प्रकार घडला. वित्तीय बाजार तेजीत असताना चाणाक्ष चमक दाखवून प्रकाशझोतात आलेले गुप्ता यांना बाजाराला मंदीचा वेढा पडलेला असताना, घायाळ-हतबलांचे लचके तोडण्यासाठी टपून बसलेल्या लबाड लांडग्यांच्या टोळीच्या म्होरकेपदाचा मोह जडला. त्यावेळी गुप्ता गोल्डमन सॅक्सच्या संचालक मंडळात होते आणि या वित्तसंस्थेत होऊ घातलेल्या मोठय़ा भांडवली गुंतवणुकीचे ते अर्थातच माहीतगार होते. ही अंतस्थांपुरती मर्यादित आणि अर्थातच गोपनीय असलेली माहिती त्यांनी आपल्या टोळीतील एक साथीदार आणि गॅलियन ग्रुप हेज फंडांचे चालक राज राजरत्नम यांना पुरविली. कंपनीतील हा संभाव्य व्यवहार जगजाहीर होण्याआधी, गुप्ता यांनी पुरविलेल्या माहितीच्या आधारे राजरत्नम यांनी गोल्डमन सॅक्सचे समभाग खोऱ्याने खरेदी केले आणि अर्थातच रग्गड फायदाही मिळविला. ‘इनसायडर ट्रेडिंग’चे कारस्थान अर्थात, अंतस्थांकडून होणारी दगाबाजी ही अशी चालते. अमेरिकी शेअर बाजाराचे नियंत्रण करणाऱ्या रोखे आयोगाने (‘एसईसी’ने) दाखल केलेल्या गुन्ह्य़ाला राजरत्नमने कबुली दिली आणि ११ वर्षांच्या कैदेत त्याची आधीच रवानगी झाली आहे. आता गुप्ताही त्याच तुरुंगात त्याची साथसोबत करतील. गुप्तांना दिवाणी स्वरूपाचा एक कोटी ३९ लाख डॉलर- म्हणजे सुमारे ८३ कोटी ७९ लाख रुपयांचा दंड झाला आहे. पश्चिम बंगालच्या माणिक्ताला येथे जन्मलेले गुप्ता हे मूळचे भारतीय, एवढाच आपला या प्रकरणाशी संबंध मर्यादित नाही. तिकडे गुप्ता यांच्या तुरुंगवासावर शिक्कामोर्तब होत असताना, इकडे भारतात भांडवली बाजाराची नियंत्रक ‘सेबी’च्या अधिकारांबाबत जुन्या चर्चेला नव्याने कढ देणे सुरू होते. ताज्या जागतिकीकरणाच्या प्रवाहात आणि विशेषत: माहिती व संचार साधनांच्या आधुनिक रूपातून पांढरपेशा लबाडय़ांचाही एक प्रकारे वैश्विक संचार सुरू आहे. ‘इनसायडर ट्रेडिंग’ची कारस्थाने आपल्यालाही नवी नाहीत. व्याप्ती आणि परिणाम अमेरिकेच्या तुलनेत कमी असेल, पण प्रमाण निश्चितच जास्त असेल. पण अमेरिकेत तो पहिल्याच पायरीवर फौजदारी गुन्हा ठरतो, तसे तेथील रोखे आयोग या नियंत्रक संस्थेला क्षमता व अधिकार सोपविण्यात आले आहेत. तर भारतात तपासासाठी साध्या पोलिसांना असलेलेही अधिकार व बळ नसलेल्या ‘सेबी’ने हे प्रकरण आधी सिद्ध करावे आणि मग झालीच तर फौजदारी कारवाईची प्रक्रिया जमेल तशी आठ-दहा वर्षांनंतर सावकाशीने सुरू होते. म्हणून अशा प्रकरणात तुरुंगाची हवा खावी लागण्याचे एकही लक्षणीय उदाहरण आपल्याकडे नाही, तर तेथे गुप्ता यांची अवाढव्य कीर्ती आणि साधनांची मुबलकता त्यांना शिक्षेपासून वाचवू शकलेली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jun 2014 रोजी प्रकाशित
अंतस्थांची कूटनीती
अमेरिकेचे वित्तीय सत्ताकेंद्र अर्थात वॉल स्ट्रीटवरील एक उद्योगरत्न आणि भारतासह अमेरिकेच्या राजकारणी वर्तुळात ऊठबस असलेल्या रजत गुप्ताला अखेर गजाआड जावे लागले.
First published on: 19-06-2014 at 12:19 IST
TOPICSरजत गुप्ता
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajat gupta begins serving two year insider trading sentence