scorecardresearch

राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक : आजचा उत्साह उद्याही कायम राहावा

कोल्हापुरातील शाहू मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांचे भव्य स्मारक उभे राहणे, हा राज्य शासनाच्या विचारसरणीला अनुसरून असा घेतलेला निर्णय आहे. शाहू महाराजांच्या स्मारकाबाबत नानाविध कल्पना लोकांच्या नजरेसमोर तरळत आहेत. आज तरी लोकांचा आणि शासनाचा उत्साह मोठा आहे. हा उत्साह भविष्यात कसा राहील आणि शासनाची इच्छाशक्ती कशी राहील, यावरच स्मारकाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक : आजचा उत्साह उद्याही कायम राहावा

कोल्हापुरातील शाहू मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांचे भव्य स्मारक उभे राहणे, हा राज्य शासनाच्या विचारसरणीला अनुसरून असा घेतलेला निर्णय आहे.  शाहू महाराजांच्या स्मारकाबाबत नानाविध कल्पना लोकांच्या नजरेसमोर तरळत आहेत. आज तरी लोकांचा आणि शासनाचा उत्साह मोठा आहे. हा उत्साह भविष्यात कसा राहील आणि शासनाची इच्छाशक्ती कशी राहील, यावरच स्मारकाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बहुजन समाजाचे दैवत आहेत. महाराष्ट्र शासन या दैवतांच्या विचारांनी चालणारे शासन आहे. तशा प्रकारची भूमिका या शासनाकडून नेहमीच मांडली जाते. कोल्हापुरातील शाहू मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांचे भव्य स्मारक उभे राहणे, हा राज्य शासनाच्या विचारसरणीला अनुसरून असा घेतलेला निर्णय आहे. त्यासाठी राज्य शासनाचे अभिनंदन करायला हवे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाहू महाराजांचे स्मारक पुतळा, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक संस्था यांच्या रूपाने उभे आहे आणि इथून पुढेही ते होत राहील. या पाश्र्वभूमीवर सर्व स्मारकांच्या तुलनेत कोल्हापुरात उभे राहणारे स्मारक हे आगळेवेगळे असावे, अशी सर्वसामान्यांपासून जाणत्यांची अपेक्षा आहे आणि ती सर्वथा योग्य आहे.
शाहू मिलमध्ये स्मारक बनवताना राज्य शासनाची इच्छाशक्ती महत्त्वपूर्ण आहे. स्मारक बनवायचे झाले तर या जागेसंदर्भात असणारे न्यायालयीन, कामगारविषयक प्रश्न सोडविण्याचे कर्तव्य शासनाला पार पाडावे लागणार आहे. पहिली गोष्ट अशी आहे की, ही जागा वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात आहे. शिवाय ती न्यायालयीन वादामध्ये अडकलेली आहे. याकरिता शासनाने प्रथम ही जागा पूर्णत: मोकळी करून देण्यासाठी तातडीने पावले उचलायला हवीत. अन्यथा न्यायालयीन तांत्रिक बाबी दूर करण्यातच कित्येक वर्षे जातील. त्यानंतर स्मारकासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याकडे शासनाचा कटाक्ष असला पाहिजे. सध्या शाहू जन्मस्थळाची जी परवड आहे, तशीच परवड स्मारकाच्या बाबतीत होत राहणे हे क्लेशदायक आहे. इतकेच नव्हे तर कोल्हापूरमध्ये थेट पाइपलाइन योजना, रस्तेविकास योजना, पंचगंगा नदी प्रदूषण अशा अनेक वादांच्या यादीत शाहू स्मारकाच्या नव्या विषयाची भर पडण्याची भीती जाणत्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शासन या कामी किती हिरिरीने पुढाकार घेते, इच्छाशक्ती दाखवते यावर स्मारकाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
गेल्या काही दिवसांत अनेक विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांनी स्मारकाविषयीच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. यातून एक सूर असा दिसतो की, राजर्षी शाहूंच्या विचाराला शोभेल असे हे स्मारक व्हायला हवे. आता शाहूंचा विचार म्हटला तर तो कोणता, हेही समजून घ्यायला हवे. शाहूंचा विचार म्हणजेच सामाजिक समतेचा विचार, सामाजिक न्यायाचा विचार होय. या विचाराला अनुरूप अशा कार्याचे प्रतीकात्मक स्मारक येथे निर्माण व्हायला हवे, असे मला वाटते. या दृष्टीने विचार केला तर असे दिसते की, शाहू महाराज हे बहुजन समाजाचे मुख्य प्रवर्तक होते. शिक्षणाच्या प्रसाराचे साधन म्हणून त्यांनी वसतिगृहांची स्थापना केली. तेव्हा १ हजार विद्यार्थ्यांचे मोठे वसतिगृह या ठिकाणी स्थापन करण्यात यावे. ज्यामध्ये दारिद्रय़रेषेखालील सर्व जातिधर्माच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. असे झाले तर शाहूंचे एक जिवंत स्मारक उभे राहिले असे म्हणता येईल.
शाहू मिल बंद पडल्यामुळे शेकडो कामगारांचा संसार उघडय़ावर पडला आहे. बेरोजगार झालेल्या कामगारांची अशी अपेक्षा आहे की, या ठिकाणी ४००-५०० लोकांना काम मिळेल, असा उद्योग सुरू झाला पाहिजे जेणेकरून त्यांच्या हाताला काम मिळेल. या कामगारांच्या मागणीचा विचार स्मारक उभे करताना झाला पाहिजे. कारण याच जागेवर कामगारांचा घाम पडलेला आहे.
शाहू महाराजांनी अनेक कलांना, खेळांना राजाश्रय दिला. विशेषत: नाटय़, संगीत, चित्रकला, मल्लविद्या यांचे एक नवे युग महाराष्ट्रात त्यांनी सुरू केले. त्यांच्यामुळेच संगीतसूर्य केशवराव भोसले, बालगंधर्व, अल्लादियाँ खाँसाहेब, आबालाल रेहमान यांसारखे थोर कलावंत निर्माण झाले. ही परंपरा बाबूराव पेंटर, भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम यांनी पुढे प्रकाशमान केली. त्यातूनच कोल्हापूर हे कलापूर बनले. या कलानगरीचे खरे उद्गाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज होत. तेव्हा प्रस्तावित स्मारकामध्ये या कलांचे प्रशिक्षण देणारे अखिल भारतीय पातळीवरचे केंद्र स्थापन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली तर ती गैर ठरणार नाही.
क्रीडा क्षेत्रामध्ये राजर्षी शाहूंनी मल्लविद्येला (कुस्ती) दिलेल्या प्रोत्साहनामुळे कोल्हापूर हे भारतातील मल्लविद्येची पंढरी ठरली होती. आजही कोल्हापुरातील कुस्ती क्षेत्राचा लौकिक मोठा आहे. याचा वेध घेऊन आधुनिक पद्धतीचे मल्लविद्या प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी स्थापन झाले, तर ती शाहूरायांना खरीखुरी आदरांजली ठरेल.
कोल्हापुरात पॅलेस थिएटर निर्माण करून शाहू महाराजांनी नाटय़ क्षेत्राला उत्तेजन दिले. त्या काळामध्ये सर्व आशिया खंडात अशा प्रकारचे नाटय़गृह नव्हते. आज हे नाटय़गृह कोल्हापूरची लोकसंख्या वाढल्याने अपुरे पडते आहे. तेव्हा दोन हजार प्रेक्षक बसतील, असे भव्य नाटय़गृह निर्माण केले पाहिजे, त्याचा उपयोग सभागृहाप्रमाणे होऊ शकेल, याचा स्मारक उभारणीच्या बाबतीत जरूर विचार व्हावा.
शाहू महाराजांच्या चरित्राचा आणि समकालीन कालखंडाचा अभ्यास करणारे एखादे केंद्र या ठिकाणी स्थापन व्हावे. त्याला जोडूनच महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचे ग्रंथालय निर्माण झाले पाहिजे. जेणेकरून महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील लोक त्या ठिकाणी अभ्यास, संशोधन करण्यासाठी येतील, अशी अपेक्षा माझ्यासारख्या इतिहासअभ्यासकांनी केली तर ती चुकीची ठरणार नाही. कोल्हापुरात येणारा पर्यटक हा प्रथम महालक्ष्मीचे दर्शन घेतो. जोतिबाचे दर्शन घेऊन परततो. हा पर्यटक आता देवदर्शनानंतर शाहू महाराजांच्या स्मारकाच्या दर्शनाला येईल, असे स्मारक व्हायला हवे. शाहू महाराजांचे जीवनचरित्र व्यक्त करणारे शिल्पसमूह या ठिकाणी निर्माण करता येईल. यामध्ये राधानगरी धरण, खासबाग मैदान, पॅलेस थिएटर, नवा राजवाडा अशा अनेक घटकांचा वेध घेता येणे शक्य आहे. कोल्हापूरच्या लोकजीवनात शाहू महाराजांचे वैचारिक व सांस्कृतिक पाठबळ किती व्यापक आहे याचे दर्शनच यातून घडेल.
 शाहू महाराजांचे जीवन आणि कार्य पर्यटकांच्या डोळय़ांसमोर उभे राहील आणि एक प्रकारे सामाजिक प्रबोधन होऊन हा पर्यटक बाहेर पडेल. विशेषत: भावी काळातील शालेय विद्यार्थी जेव्हा या स्मारकाला भेट देतील, तेव्हा शाहू महाराजांचे चरित्र व कार्य हे त्यांच्या संस्कारक्षम वयामध्ये कळू शकेल. याद्वारे त्यांच्यावर शाहूंच्या विचारांचा संस्कार होईल. मला असे वाटते की, भावी पिढी घडविण्याच्या दृष्टीने ही सर्वात मोठी उपलब्धी राहील.

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-12-2012 at 12:42 IST

संबंधित बातम्या