एव्हरेस्टची बर्फाने चमचमणारी शिखरे सर्व साहसी गिर्यारोहकांना सतत खुणावत असतात. यंदा मे महिन्याच्या मोसमात पाकिस्तानची समीना खयाल बेग (२३) ही एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली पाकिस्तानी महिला ठरली. त्याचबरोबर माउंट अकॉनकाग्वा, माउंट विन्सन, माउंट किलिमांजारो, माउंट मॅककिन्ले, कार्टेन्झ पिरॅमिड व एव्हरेस्ट तसेच आता जुलैत रशियातील माउंट एलब्रसच्या रूपाने सातवे शिखर पादाक्रांत करून तिने अद्वितीय कामगिरी केली आहे. सात खंडांतील सात शिखरे आठ महिन्यांच्या काळात सर करणारी ती पहिली पाकिस्तानी महिला बनली आहे. एक शेजारी देश म्हणून आपणही तिच्या या यशाचा अभिमान बाळगायला हरकत नाही. समीना ही पाकिस्तानातील हुंझा भागातील शिमशाल खोऱ्याची रहिवासी आहे. अलीकडेच तिने एव्हरेस्ट सर केले. बेस कॅम्प चारला म्हणजे ७९०० मीटर उंचीवर आल्यानंतरच तिने भावाला शनिवारी रात्री संदेश पाठवला होता. लोसे व माउंट एव्हरेस्ट या शिखरांच्या दरम्यान त्या वेळी ती होती. जवळपास आठ तास कठीण पर्वतारोहण करून ती तिथपर्यंत पोहोचली, तिच्या या यशाचे आणखी एक वेगळेपण आहे. तिच्यासमवेत ताशी व नुगशी मलिक या दोन जुळय़ा भारतीय बहिणींनीही ढगाळ वातावरणात हे यश साजरे केले. दोन भारतीय बहिणींबरोबर तिने ८८४८ मीटर उंचीचे एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले त्या वेळी तिचा भाऊ मिर्झा अली हाही तिच्याबरोबर होता. या सर्वानी तिथे भारत-पाकिस्तान यांचे झेंडे एकत्रितपणे फडकावून भारत-पाक मैत्रीचा समर्पक संदेश दिला. एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करण्याचा या भावा-बहिणीचा प्रयत्न गेले तीन वर्षे चालू होता. मिर्झा व समीना हे दोघेही अल्पाइन क्लब ऑफ पाकिस्तानचे सदस्य असून या संस्थेने त्यांचा हा विजय साजरा केला. आणखी विशेष म्हणजे तिने एव्हरेस्ट मोहिमेत राखीव ऑक्सिजन वापरला नाही. वयाच्या चौथ्या वर्षांपासून तिला गिर्यारोहणाची आवड असून ती आता हिंदुकुश व काराकोरम येथे गिर्यारोहकांना मार्गदर्शन करते. तिच्या यशावर ‘बियॉण्ड हाइट्स’ हा माहितीपटही काढण्यात आला आहे. या मोहिमेत स्त्री-पुरुष समानतेचाही संदेश या भावा-बहिणीने एकाच वेळी एव्हरेस्ट शिखर सर करून दिला आहे. समीनाच्या यशामागे मित्र, तत्त्वचिंतक व मार्गदर्शक या सर्व भूमिका मिर्झानेच बजावल्या होत्या. २०१० मध्ये समीनाने ६००० मीटरवरील चासकिन शिखर सर केले. नंतर तिने कोह ब्रोबर (माउंट ऑफ एक्व्ॉलिटी) हे शिखर २०११ मध्ये सर केले. स्पँटिक शिखर मात्र समीना व मिर्झा यांना खराब हवामानामुळे सर करता आले नाही; पण त्यामुळे खचून न जाता त्यांनी अत्युच्च शिखर आता सर केले आहे. पाकिस्तानी भाऊ-बहीण व भारतीय जुळय़ा बहिणींच्या या जिद्दीला त्रिवार सलाम!
संग्रहित लेख, दिनांक 29th Jul 2014 रोजी प्रकाशित
समीना बेग
एव्हरेस्टची बर्फाने चमचमणारी शिखरे सर्व साहसी गिर्यारोहकांना सतत खुणावत असतात. यंदा मे महिन्याच्या मोसमात पाकिस्तानची समीना खयाल बेग (२३) ही एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली पाकिस्तानी महिला ठरली.

First published on: 29-07-2014 at 04:04 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samina baig