अतुल सुलाखे

गांधी परिवारात किमान सहा नेते असे दिसतात की जे गांधीजींच्या विचारांचे भाष्यकार होते. आचार्य दादा धर्माधिकारी तर गांधी-विनोबांप्रमाणेच सर्वोदयाचेही विवेचक होते. तरीही विनोबांद्वारे सर्वोदय विचार समजावून घ्यावा लागतो. याची काही कारणे आहेत.

विनोबांची वैचारिक जडणघडण गांधीजींनी केली. विनोबांच्या शब्दात सांगायचे तर ‘मैं बापू का पाला हुआ एक जंगली जानवर हूँ।’

हा क्रांतिकारी तरुण गांधीजींच्या सहवासात अहिंसेचा साधक झाला. सार्वजनिक जीवनात टोकाची नैतिकता नसली तरी चालते अशी विनोबांची धारणा होती. ती गांधीजींनी बदलली. आध्यात्मिक मूल्ये व्यवहारात आणण्यासाठीच असतात हे बापूंनी त्यांना सांगितले.

विनोबांनी गांधीजींच्या नंतर जो विचार मांडला जे प्रयोग केले ते गांधीजींच्या शिकवणीशी सुसंगतच होते. शिवाय दोन्ही नेते किमान दोन-अडीच दशके एकत्र होते. ‘आजवर सगळेजण आश्रमाकडून काहीतरी घेण्यासाठी आले. मात्र हा एकच तरुण आश्रमाला देण्यासाठी आला,’ असे गांधीजी म्हणत. या अभिन्नत्वामुळे, विनोबांच्या व्यापक प्रयोगांमुळे त्यांनी केलेले सर्वोदयाचे चिंतन महत्त्वाचे ठरते. सर्वोदय सर्वाच्या हिताचा आहे असा आरंभ करत विनोबा विषयाला हात घालतात. भारतीय संस्कृती वेगळी असून पाश्चिमात्य जगाकडून किमान समाजशास्त्राच्या बाबतीत फारसे शिकावे अशी परिस्थिती नाही. विज्ञान आणि इतर क्षेत्रांत आपल्याला त्यांच्याकडून खूप शिकता येईल, पण समाजशास्त्र त्याला अपवाद आहे.

भारतीय संस्कृतीची प्रमुख शिकवण संयमाची आहे. धर्मशास्त्र, अध्यात्म यांनी हे मूल्य ठसवले. आपले राजनीतिशास्त्रही संयमाची शिकवण देते. आधुनिक काळात समाजवादाची भाषा सगळीकडे दिसते. तथापि समाजवाद म्हणजे ‘समाजदेवो भव’ ही विनोबांची व्याख्या आहे. प्रत्येक व्यक्ती संयमशील झाल्याखेरीज खरा समाजवाद येत नाही.

हे तत्त्व आज विसरल्यासारखे झाले आहे. देशाच्या आर्थिक योजनेत सार्वजनिक आणि खासगी क्षेत्र असे मतप्रवाह दिसतात. लोकांच्या हाती अधिक काम दिले तर भांडवलदार घाबरतात आणि भांडवलदारांना अधिकार द्यावेत तर समाजवादी घाबरतात. यासाठी दोहोंना ५० टक्के अधिकार देऊन हा प्रश्न सोडवण्याची योजना दिसते. त्यानंतर व्यक्तीचा हिस्सा शून्य करून समाजाच्या हाती सर्वाधिकार यावेत अशी ही योजना आहे.

सर्वोदयाची योजना याहून भिन्न आहे. सर्वोदय, व्यक्ती आणि समाज यांच्या हाती १०० टक्के अधिकार राहील यासाठी प्रयत्नशील असतो. इथे विनोबा कुटुंबाचे उदाहरण देतात. कुटुंबात प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची असते त्यांच्यामधे कोणताही भेद नसतो. तेच गणित सर्वोदय विचार प्रमाण मानतो. ही भूमिका विद्यापीठांमधे सांगितली जात नाही.

खरेतर हा भारतीय संस्कृतीचा विचार आहे. व्यक्तीने समाजाची सेवा करावी आणि समाजाने प्रत्येक व्यक्तीची अशी सर्वोदयाची योजना आहे. सात स्वर, वर्णमाला, षड्रस  यांच्यात जसा परस्पर विरोध नाही तसाच सर्वोदयाच्या रचनेतही विरोध नाही. व्यवस्थित योजना आखली तर प्रत्येक व्यक्तीला काम मिळेल आणि समाजाचेही भले होईल. ही योजना प्रत्यक्षात का दिसत नाही आणि तिच्या मुळाशी नेमके कोणते तत्त्व आहे हे महत्त्वाचे प्रश्न आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

jayjagat24 @gmail.com