– अतुल सुलाखे jayjagat24@gmail.com

हे उत्तम माते, उत्तम नदी, उत्तम देवी, हे ‘सरस्वती,’ आज आमचे जीवन अप्रशस्त बनल्यासारखे आहे. आई, ते तू प्रशस्त कर.

– ‘महाराष्ट्राची सरस्वती’ या लेखातून.

मधुकर या विनोबांच्या लेखसंग्रहात ‘महाराष्ट्राची सरस्वती’ हा लेख आहे. भौगोलिकदृष्टय़ा छोटय़ा असणाऱ्या इंद्रायणी नदीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व सांगत विनोबांनी तिला सरस्वती नदीची उपमा दिली आहे. इंद्रायणी, ज्ञानोबा आणि तुकोबा हा त्रिवेणी संगम विनोबांनी मोठय़ा मनोज्ञ रीतीने उभा केला आहे. ‘एकादश व्रतां’वर लिहिताना विनोबांनी वरील सूत्राचा अप्रत्यक्ष आधार घेतल्याचे दिसते.

विनोबांच्या मते, ही ११ व्रते म्हणजे गांधीजींनी दिलेला एक रचनात्मक कार्यक्रम आहे. त्याला ते सुंदर आणि परिपूर्ण कर्मयोग म्हणतात.

आपण नुसत्या तत्त्वज्ञानाचा आधार घेतला तर ते हवेत राहते. नुसते कर्मच करत राहिलो तर जीवन उंची गाठत नाही. त्यामुळे तत्त्वज्ञानयुक्त कर्मयोग आणि कर्मयोगयुक्त तत्त्वज्ञान जिथे साकारते तिथे मानवतेचा जन्म होतो. एवढे सांगूनही विनोबांना ज्ञान आणि कर्मयुक्त जीवन परिपूर्ण वाटत नाही. ज्ञान आणि कर्माला जीवनशुद्धीच्या साधनेची जोड असेल तर कर्म आणि ज्ञानाचा मेळ परिपूर्ण होतो. ही जीवनशुद्धीची साधना म्हणजे ही ‘एकादश व्रते.’ साम्ययोग हे जीवनात उतरवण्याचे दर्शन आहे. याची पूर्वअट म्हणून या व्रतांकडे पहावे लागते. एरवी तोंडाने साम्य जपत राहायचे आणि कामाचे ढीग उपसून त्यात कर्मयोग शोधायचा ही गोष्ट उघडच अपूर्ण आहे.

या व्रतांना गांधीजींनी आणखी एक आयाम दिला. खरे तर व्रतांची कल्पना भारतीय परंपरेला अपरिचित नाही. श्रमण, भिक्खू आणि ब्राह्मण या तिन्ही प्रवाहांमधे व्रतांना महत्त्वाचे स्थान आहे. योगशास्त्रातील यम-नियम म्हणजे जीवन साधना आहे. तथापि जीवनसाधनेचा हा मार्ग धार्मिक क्षेत्रापुरताच होता. म्हणजे यमनियमांचे काटेकोर पालन करणारी व्यक्ती ‘योगी’ म्हटली जाते. तथापि सर्वोदयी परिवारात ती देशसेवक आहे. थोडक्यात आध्यात्मिक पृष्ठभूमी असणारी समाजहिताची आस असणारी व्यक्ती.

गीता प्रवचनांच्या सतराव्या अध्यायात, विनोबांनी साधकाचा कार्यक्रम विशद केला आहे. साधकाच्या या कार्यक्रमाला अभंग व्रतांचा आधार आहे. ही ‘जीवनाची कला’ आहे हे अभंग व्रतांचे अचूक वर्णन आहे.

आपल्याला व्रतांचे बंधन वाटते. ती अनावश्यक वाटतात. विनोबांचे म्हणणे नेमके याच्या उलट आहे. व्रते असतील तर जीवन सोपे आणि सुरक्षित होते. जीवनाला एक शिस्त हवी या तत्त्वाची आज कधी नव्हे एवढी गरज आहे. अभंग व्रतांची योजनाच त्यासाठी आहे.

या व्रतांना परंपरेचा आधार आहे. वर्तमानाचे भान आहे आणि नवीन व्रतांना वाव आहे. विनोबांनी ‘अिनदा’ या व्रताची भर घालून ही संख्या १२ केली.

आध्यात्मिक आणि सामाजिक उन्नतीला जीवनशुद्धीची जोड असेल तर साम्ययोग परिपूर्ण होतो. या अनोख्या त्रिवेणी संगमातील सरस्वतीला, जीवन प्रशस्त होण्यासाठी, अभंग व्रतांच्या पालनाचे बळ मिळावे हीच प्रार्थना.

‘अप्रशस्ता इव स्मस्मि प्रशस्तिमम्ब नस्कृधि।’

      – ऋग्वेद