सिलिकॉन व्हॅलीत उद्योजक बनायला वयाची अट नाही. आपल्या अभिनवशीलतेच्या जिवावर शुभम बॅनर्जी हा अवघा तेरा वर्षांचा भारतीय वंशाचा मुलगा तिथे आठवीत असतानाच उद्योजक बनला आहे; अर्थातच नफेखोर उद्योजक नाही. दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील किफायतशीर मुद्रक त्याने तयार केला आहे. ब्रेल ही दृष्टिहीनांसाठीची लिपी आहे. शुभमच्या या साहसी प्रयोगात त्याला तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘इंटेल कॉर्पोरेशन’ या कंपनीनेही साथ दिली आहे. त्याच्या ब्रॅगो लॅबमध्ये या कंपनीने गुंतवणूकही केली आहे. अमेरिकेतील शाळांमध्ये विज्ञान जत्रा होतात, तिथे शुभमने पहिल्यांदा लेगो रोबोटिक संच मांडला होता; दृष्टिहीनांसाठी स्वस्तातील मुद्रकाची ती पूर्वावृत्ती होती. त्याने एकदा आई-वडिलांना असा प्रश्न विचारला की, दृष्टिहीन लोक कसे वाचतात, त्यावर आई-वडिलांनी उत्तर दिले, ‘गुगल इट’. मुलाने गुगल केले. त्याला त्यातून असे कळले की, दृष्टिहीनांसाठी असलेला मुद्रक (प्रिंटर) २००० डॉलरला मिळतो. विकसनशील देशात व इतरत्रही दृष्टिहीनांना तो परवडण्यासारखा नव्हता म्हणून त्याने लेगो माइंडस्टॉर्म इव्ही संच तयार केला. तो या वर्षी बाजारात येत आहे, त्याची किंमत अवघी ३५० डॉलर असेल व वजन काही पाऊंड असेल. सध्याचे प्रिंटर हे २० पाऊंड वजनाचे, म्हणजे नऊ किलोचे आहेत. या मुद्रकाने ब्रेल लिपीतील कागदपत्रे छापता येतील. व्यक्तिगत संगणक व इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरही ते शक्य होणार आहे, त्याची ब्रेगो २.० ही आवृत्ती इलेक्ट्रॉनिक मजकुराचे ब्रेलमध्ये रूपांतर करू शकते. इंटेल कंपनीत काम करणारे त्याचे वडील निलय बॅनर्जी यांनी सुरुवातीला त्याच्या या प्रकल्पात ३५ हजार डॉलरची गुंतवणूक केली. कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी होण्याइतका तो (कायद्याने) मोठा नाही, म्हणून त्याच्या आई मालिनी बॅनर्जी यांनी ही जबाबदारी सांभाळली आहे. 

शुभमचा जन्म बेल्जियममध्ये हॅसेल्ट येथे झाला, नंतर तो आई-वडिलांबरोबर कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथे आला. डॉन कॅलेजॉन स्कूल येथे त्याचे शिक्षण झाले, नंतर सांता क्लारा येथे मंगोलिया सायन्स अ‍ॅकॅडमीत त्याने प्रवेश घेतला. शुभमच्या मते किफायतशीर तंत्रज्ञान हे सध्या मोठे आव्हान आहे. जगात २८.५ कोटी दृष्टिहीन लोक आहेत व त्यातील ९० टक्के विकसनशील देशात आहेत. त्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्यासाठी त्याने तंत्रज्ञानाचा केलेला वापर हा त्याच्या वैचारिक प्रगल्भतेची साक्ष देणारा आहे.