बास्केटबॉल म्हटले की सहा फुटांपेक्षा जास्त उंचीचे ताडमाड खेळाडू आणि त्यांच्यापेक्षा उंचीवर असलेल्या गोलजाळ्यात चेंडू टाकण्यासाठीची चुरस हे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. आपल्याकडे अशी उंची असलेले खेळाडू मुबलक आहेत. मात्र क्रिकेटभोवतीच खेळाचा पसारा केंद्रित झाल्याने बास्केटबॉलकडे मात्र दुर्लक्षच होते. परंतु जागतिक स्तरावर बास्केटबॉल आणि त्याची लीग स्पर्धा हा प्रेक्षकांच्या आकर्षणाचा, टीव्हीसाठी टीआरपीचा आणि खेळाडूंसाठी घसघशीत आर्थिक नफ्याचा मुद्दा ठरतो. अमेरिकेतील एनबीए अर्थात ‘नॅशनल बास्केटबॉल लीग’ हे त्याचे लोकप्रिय प्रारूप. आपल्या प्रमाणवेळेनुसार भल्या सकाळी किंवा रात्री टीव्हीवर अनुभवण्याची गोष्ट यापुरतेच आपले भावविश्व मर्यादित होते. मात्र भारतीय वंशाच्या सॅम भुल्लर या खेळाडूने एनबीएमधील स्कॅरमॅन्टो किंग्स या संघात स्थान पटकावले आहे.
प्रवेश खडतर समजल्या जाणाऱ्या एनबीएमधील संघात स्थान पटकावणारा सॅम पहिला भारतीय वंशाचा खेळाडू आहे, यावरून त्याच्या यशाचे दुर्मीळत्व सिद्ध होते. पंजाबमधल्या अवतार आणि वरिंदर भुल्लर दाम्पत्याचा हा मोठा मुलगा. कामाच्या निमित्ताने भुल्लर कुटुंबीय कॅनडाला स्थायिक झाले. पालकांनीच सॅमचे नाव बास्केटबॉल प्रशिक्षण केंद्रात दाखल केले. फुरसतीच्या वेळेचा सदुपयोग म्हणून केलेल्या या कृतीतून एक व्यावसायिक बास्केटबॉलपटू घडेल याची सॅमच्या आई-वडिलांना अजिबातच कल्पना नव्हती. निसर्गाने दिलेल्या उंचीच्या वरदानाला कौशल्याची आणि मेहनतीची जोड देत सॅमने बास्केटबॉलची धुळाक्षरे गिरवली. बास्केटबॉल हाच आपला ध्यास हे लक्षात आल्यावर सॅम प्रगत प्रशिक्षणासाठी कॅनडाहून अमेरिकेतल्या पेन्सिल्व्हानियासाला रवाना झाला.  ‘न्यू मेक्सिको स्टेट एजिस’ या महाविद्यालयीन संघाकडून खेळताना दमदार खेळ करत सॅमने व्यावसायिक संघांना आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडले. या संघाचा सगळ्यात मौल्यवान खेळाडूचा किताबही त्याने नावावर केला. या सगळ्याची परिणती म्हणजे एनबीए प्रवेश. लीगने घोषित केलेल्या संघांच्या मूळ यादीत सॅमचे नाव नव्हते. मात्र काही तासांतच स्कॅरमॅन्टो किंग्सने आपली चूक सुधारत त्याला संघात समाविष्ट केले.
सॅमच्या यशाने अमेरिकेतल्या महाविद्यालयीन स्तरावरच्या दर्जात्मक आणि शिस्तबद्ध स्पर्धा संरचनेची महतीही अधोरेखित झाली आहे. बास्केटबॉलला संपूर्ण वेळ देता यावा, यासाठी सॅमने महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षांच्या अभ्यासक्रमातून माघार घेतली आहे. खेळासाठी अभ्यासाला सोडचिठ्ठी हा निर्णय अमेरिकेत क्रीडापटूंना मिळणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक आदराचे प्रतीक आहे.