राष्ट्रीय राजकारणाला नवीन वळण देणारी निवजणूक असं या निकालाचं वर्णन करावं लागेल. याचं कारण केवळ भाजपच्या संख्याबळामध्ये नाही तर ज्या पध्दतीने निवडणूकीत मतदारांनी तिसरी आघाडी म्हणून ओळखल्या जाणा-या फुटकळ पक्षांचा नि:पात केला आहे तो निश्चितच स्वागतार्ह म्हणाला लागेल. माया, ममता आणि जया अशा लहरी आणि चक्रम नेत्यांच्या नाकदु-या काढण्याची गरज नरेंद्र मोदी यांना राहणार नाही. हा अतिशय मोठा बदल म्हणावयास हवा. इतकेच काय पण भारतीय जनता पक्षाला या पुढच्या कालखंडामध्ये शिवसेना नेतृत्वाची देखिल मनमानी सहन करावी लागणार नाही. नरेंद्र मोदी यांचे हे यश महाप्रचंड म्हणावय़ास हवे.
त्याचबरोबर निष्क्रिय, निष्प्रभ आणि मस्तवाल राजकारण्यांना सरसकटपणे घरी पाठवून मतदारांनी भारतीय लोकशाही प्रौढ होत चालली आहे, हे दाखविले आहे.
इतके मोठे मताधिक्य हे वेगळी जबाबदारी घेऊन येते, ती सहन करण्याची क्षमता मोदी यांना आता दाखवून द्यावी लागेल. यापुढे आघाडीचे राजकारण हे कार्यक्षमतेच्या अभावाचे कारण ठरू शकणार नाही. मनमोहन सिंग सरकारच्या धोरण लकव्याच्या पार्श्वभूमीवर भरघोस मते देऊन मतदारांनी नरेंद्र मोदी यांच्या समोरील ही सबब आधीच दूर केली आहे. त्यामुळे काम करणे आणि जनतेची स्वप्ने सोडा, परंतु गरजपूर्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणे याला पर्याय ठेवलेला नाहीये. ‘करा वा मरा’ असा थेट संदेश मतदारांनी राजकीय पक्षांना दिला असून त्याचे स्वागतच करावयास हवे.
महाराष्ट्रापुरता विचार करावयास झाल्यास ही निवडणूक भाजपपेक्षा सत्ताभिलाषी शिवसेना आणि मनसे यांच्यासाठी अधिक महत्वाची ठरते. भरपूर मताधिक्याने सामर्थ्यवान झालेला भाजप यापुढे महाराष्ट्रात शिवसेनेची मनमानी सहन करणार नाही. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांत याचा प्रत्यय येणार असून शिवसेनेला महाराष्ट्राच्या राजकारणात यापुढे दुय्यम भूमिका स्वीकारावी लागेल. तशीच गत शरद पवार यांची होणार असून महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे शरद पवार हे समीकरण या निवडणुकीने पूर्णपणे धुळीस मिळविले आहे. तसेच कॉंग्रेसलाही जबर तडाखा या निकालांमुळे बसणार असून प्रादेशिक पातळीवर नेतृत्वाला निष्प्रभ करण्याच्या कॉंग्रेसच्या राजकारणाला हा दणदणीत इशारा म्हणावयास हवा. दिल्लीमध्ये दिसलेला मतदारांचा ‘करा वा मरा’ हा इशारा महाराष्ट्रासदेखिल तंतोतंत लागू होणार असून भ्रष्ट आणि सुस्त कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या शेवटाची ही सुरूवात ठरू शकेल.
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2014 रोजी प्रकाशित
विशेष संपादकीय – करा वा मरा
निष्क्रिय, निष्प्रभ आणि मस्तवाल राजकारण्यांना सरसकटपणे घरी पाठवून मतदारांनी भारतीय लोकशाही प्रौढ होत चालली आहे, हे दाखविले आहे.

First published on: 16-05-2014 at 02:51 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special edit do or die