‘शिवाच्या जिवाची गोष्ट’ (शनिवारचे संपादकीय, २१ जून) वाचली आणि वाटले की लांडग्यापुढे जर लबाड, कोल्ह्य़ापुढे धूर्त ही विशेषणे लावायची असतील तर, माणसापुढे ढोंगी हे विशेषण समर्पक ठरेल. शिवावर ‘लादल्या गेलेल्या ब्रह्मचर्याबद्दल’ मनाला चटका लागणे साहजिकच आहे.
सरकार चालवत असलेले प्रोजेक्ट टायगर वगरे कार्यक्रम यामागचा हेतू निष्पाप जीव वाचावेत हा नसून पुढच्या पिढय़ांना काय फक्त यांचे चित्रच दाखवायचे का ही काळजी आहे. सनातन्यांचा गोहत्येला विरोध आहे, पण म्हशींशी त्यांचे काही देणेघेणे नाही. प्राण्यांची कत्तल करण्याआगोदर पाणी पाजणे म्हणजे केवढा हा परोपकार! .. उदाहरणे बरीच आहेत. वाढती गुन्हेगारी, अत्याचार यांच्या मुळाशी मानवी मनातून लोप पावत चाललेली भूतदया हेसुद्धा एक कारण आहे, असे वाटते.
आरक्षण हे कोत्या मनोवृत्तीचे लक्षण
‘मराठा मुसलमान मेळवावा’ हा अग्रलेख (२७ जून) वाचला. अग्रलेखात आणि ‘..म्हणून मराठा समाज मागास’ या मधु कांबळे यांच्या लेखात सामाजिक, शैक्षणिक आणि आíथक मागासलेपणाचे जे दाखले दिले आहेत ते निव्वळ हास्यास्पद वाटतात. राणे समितीने ज्या साडेचार लाख कुटुंबांचा सव्र्हे केला तो करण्याकरिता कुठच्या निकषावर या कुटुंबांची निवड केली होती? शिक्षणात आरक्षणाचा प्रयत्न फसल्यावर एकाच उपाय उरतो तो आपली जात कशी वंचित आहे हे दाखवून नोकरीत आरक्षण मिळवायचे. खरे तर आज कोणालाही कुठच्याही क्षेत्रात काम करायला बंदी नाही. जातीचे राजकारण हे आता त्या जातीच्या मागासलेपणामुळे नसून त्या जातीच्या मताच्या गठ्ठय़ाकडे डोळे ठेवून केले जाते. अंतराळविज्ञान, अणुशक्ती या विषयांत नेमणुकीकरिता जरी सरकारी नोकऱ्या असल्या तरी गरज असते ती केवळ गुणवत्तेची. मग तुमची जात कुठचीही असो. थोडक्यात जातीवर आरक्षण मागणे हेच कोत्या मनोवृत्तीचे लक्षण आहे.
निमिष वा. पाटगांवकर, विलेपाल्रे (पूर्व)
‘म्हाडा’ अधिकाऱ्यास दुसऱ्यांदा लॉटरी कशी?
‘म्हाडाची पुढच्या वर्षी २८०० घरे’ हे वृत्त आणि ‘उप मुख्याधिकाऱ्यांना दुसऱ्यांदा लॉटरी’ ही चौकट (२६ जून) वाचून प्रश्न पडला की, लाखो लोकांना घराची गरज असताना म्हाडाने दर वर्षी दोन-अडीच हजार घरे बांधून नक्की काय साधणार आहे ?
या वर्षी २४६१ घरांसाठी ९० हजार अर्ज आले होते. पुढील वर्षी २८०० घरांसाठी लाखभर तरी अर्ज येतील. म्हणजे एका घरामागे ४५ अर्ज झाले. अशा वेळी एकाच व्यक्तीस मग ती मुख्याधिकारी का असेना दुसऱ्यांदा सोडत लागतेच कशी? एकदा सोडत लागल्यावर ते नाव बाद का केले जात नाही? सध्याच्या वाढत्या प्रचंड किमतींमुळे घर घेणे आता स्वप्नवत झाले असून सामान्य माणसाच्या खूप अपेक्षा म्हाडाच्या सोडतीकडून असतात. त्यामुळे म्हाडाने जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. जास्तीत जास्त किफायतशीर भावातील घरे बांधून सामान्य माणसाला दिलासा दिला पाहिजे. दर वर्षी फक्त मूठभर घरांची सोडत काढून म्हाडा घर घेण्याची मनीषा बाळगणाऱ्या लोकांमध्ये आशा पल्लवित करत असते याचे भान त्यांनी ठेवायला हवे.
माया हेमंत भाटकर, चारकोप, मुंबई</strong>
मनुचाच कित्ता गिरविणार?
मनूने मानवाचे जातीपातीवरून ‘आरक्षण’ पौराणिक काळापासूनच केलेले आहे. त्यात प्रत्येक जातीला आपापली ‘कामे’ नेमून दिलेली होती. ब्राह्मणांनी पूजा-अर्चा, ज्ञानार्जन करावे, क्षत्रियांनी संरक्षण करावे, वैश्यांनी व्यापार करावा व शूद्रांनी हलक्या दज्र्याची कामे करावीत. त्या काळी ‘गुणवत्ता’ हा निकष नव्हताच! त्या काळी अमुक एका जातीत जन्मलेल्या व्यक्तीस (त्याच्यात गुणवत्ता असूनही) त्याच्या जातीबाहेरील कामे करण्यास प्रतिबंध होता. तशी संधीच दिली जात नव्हती. शाळेत-समाजात प्रवेशच दिला जात नव्हता. म्हणून दलित समाज शिक्षणापासून व त्यायोगे समाजात उच्च स्थान मिळण्यापासून वंचित राहत होता. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आता गुणवत्ता हा निकष आहे त्यायोगे सर्व जातींना सर्व प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. कोणीही आपली गुणवत्ता सिद्ध करून कुठल्याही शाखेत प्रवेश घेऊ शकतो. स्वकर्तृत्वावर पुढे येऊ शकतो. मग हे आरक्षण कशाला हवे? मतपेढीकडे पाहून राज्यकत्रे एकप्रकारे मनूचाच कित्ता गिरवीत आहेत. देशाला खरोखरच पुढे न्यावयाचे असेल तर मनूने केलेली चूक आता तरी सुधारावी!
डॉ. सुप्रिया तडकोड, बोरिवली (पूर्व)
रहिवाशांच्या तक्रारींमुळे बॅण्डवादन कमी!
‘बॅण्डसंगीत’ हा मुकुंद संगोराम यांचा लेख (२१ जून) आणि त्यावरील ‘बॅण्ड संगीत पुन्हा ठिकठिकाणी वाजावे’ ही प्रतिक्रिया (लोकमानस, २५ जून) वाचली. काळाच्या ओघात बॅण्डसंस्कृती नष्ट होत चालली आहे, ही वस्तुस्थिती आहे. काही वर्षांपूर्वी मंगल कार्याच्या वेळी बॅण्डवादन करायला बॅण्ड पार्टीला बोलाविणे ही महत्त्वाची गोष्ट असे. लग्न, मुंजीच्या मोसमात बॅण्डवाल्यांचे बुकिंग बऱ्याच आधी करावे लागत असे. बॅण्ड पार्टीच्या प्रमुखाला बॅण्डमास्तर म्हणून ओळखले जाई. बॅण्डमास्तर मुख्यत: क्लॅरिओनेटसारखे सुरेल, पण वाजवायला अवघड असे वाद्य वाजवत असत. त्या त्या वेळची चित्रपटांमधली गाणी, सुगम संगीत, भक्ती संगीत असे सर्व प्रकार बॅण्डवाले तयारी करून वाजवीत असत. तमाम बच्चे कंपनीचे बॅण्डवाले हे एक आकर्षण असे. असंख्य गाणी लोकप्रिय होण्यात बॅण्डवाल्यांचा मोठा वाटा असे. आता मात्र बॅण्डवाल्यांची रया नष्ट होत चालली आहे. इतर कारणांप्रमाणे मंगल कार्यालयांभोवती राहणाऱ्या रहिवाशांकडून केल्या जाणाऱ्या तक्रारी हेदेखील बॅण्डवादन कमी होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे.
अॅड्. सुरेश पटवर्धन, कल्याण</strong>
दानाचा आदर्श
But she is in her grave
And oh! the difference to me
– William Wordsworth
निर्मला सामंत-प्रभावळकरांच्या मुलीने अतिशय कोवळय़ा वयात या जगाचा निरोप घेतला. बातमी वाचून खिन्न वाटले. परंतु अशा संकटाच्या प्रसंगी निर्मलाताई विलक्षण धैर्याने वागल्या. आपले दुख बाजूला ठेवून त्या माऊलीने कन्येच्या अवयवांचे दान केले. निर्मलाताईंनी समाजासमोर एक मोठा आदर्श ठेवला. त्यांना माझा नमस्कार.
अंबरीश मिश्र, बोरिवली