लॉर्ड अॅक्टन नावाच्या एका इंग्रज राजकारणी इतिहासतज्ज्ञाचे एक जगप्रसिद्ध वचन गेली शंभर वर्षे अबाधितपणे सर्वमान्य ठरले आहे. ‘पॉवर करप्टस, अॅण्ड द अब्सोल्यूट पॉवर करप्टस अब्सोल्यूटली!’ जगाच्या राजकीय इतिहासात या वचनाची प्रचीती जागोजागी येत असते. ती कालातीत आहे. आजही, अगदी महाराष्ट्रातदेखील या वचनाची आठवण प्रकर्षांने होत राहावी, अशीच परिस्थिती पुन्हा उद्भवली आहे. नाहीतर, जनतेला भ्रष्टाचारमुक्तीची स्वप्ने दाखवत महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारचे अतिउत्साही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिपदावर आरूढ होताच पहिले देवदर्शन कुणाच्या मेहेरबानीने आणि खर्चाने केले, हा वाद उद्भवलाच नसता. मुनगंटीवारांच्या सहकुटुंब तिरुपती वारीसाठी सात आसनी विमान दिमतीला उभे राहते, हा त्या तिरुपतीचा कृपाप्रसाद की सत्तेच्या झालरीची झळाळी, असा प्रश्न आज अनेकांना पडला आहे. भ्रष्टाचारमुक्तीच्या आणाभाका घेऊन सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर स्वार होऊनच मुनगंटीवारसारख्यांना महाराष्ट्राच्या सत्तासुखाचा लाभ झाला, पण सत्तेवर येताच त्यांना पहिली आठवण झाली ती मात्र, तिरुपतीची. मुनगंटीवार हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत. म्हणजे, महाराष्ट्राचे आíथक भविष्यच त्यांच्या हातात आहे. सध्या महाराष्ट्र गंभीर आíथक पेचप्रसंगातून वाटचाल करीत असल्याने, खर्चाला ४० टक्के कात्री लावण्याची घोषणा अलीकडेच महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली. त्या वेळीच बहुधा, मुनगंटीवार हे भाडोत्री खासगी विमानाने तिरुपतीची सहकुटुंब सफर करण्यात गुंतले होते. पंतप्रधान मोदींनी सत्तेवर येताच सहकारी मंत्र्यांना पहिला कानमंत्र काटकसरीचा दिला. फडणवीस यांनीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिला विमान प्रवास काटकसरीच्या वर्गातूनच केला. त्याला वारेमाप प्रसिद्धीही मिळाली. यातून जनतेमध्ये थोडीशी अनुकूल प्रतिमा तयार होण्याची चिन्हे दिसू लागलेली असतानाच मुनगंटीवार यांनी खासगी विमानाने लाखो रुपये भाडे मोजून तिरुपतीची वारी करावी, हे विचित्रच झाले. सार्वजनिक जीवनात खासगी गोष्टींबाबत गुप्तता बाळगण्याची कसरत केली की तेच अंगाशी येते. मुनगंटीवारांच्या या विमान वारीचेही तसेच झाले. मुंबई-नागपूर, तिरुपती-नागपूर आणि पुन्हा मुंबई अशी हवाई सफर घडवून आणणाऱ्या या कौटुंबिक प्रवासातील एका साथीदारामुळे हे प्रकरण आणखीच संशयास्पद झाले. गोसीखुर्द प्रकल्पातील एक बडा कंत्राटदार असलेल्या आंध्रच्या आमदाराने या तीर्थयात्रेत मुनगंटीवारांची सोबत केली होती. गंमत म्हणजे, महाराष्ट्रात गाजलेल्या कोटय़वधींच्या सिंचन घोटाळ्याच्या चच्रेत या प्रकल्पाकडेही बोट दाखविले जाते. या घोटाळ्याच्या फायली फडणवीस सरकार उघडणार अशी हवा अधूनमधून तापविली जात आहे. दोषींना केवळ दटावण्याइतकाच त्याचा उद्देश असेल, तर गोष्ट निराळी. पण खरोखरीच गांभीर्याने तपास केला जाणार असेल, तर सिंचन प्रकल्पांशी संबंधितांपासून चार हात लांब राहणे गरजेचे असताना, या कंत्राटदाराला सोबत घेऊन मुनगंटीवारांनी विमान यात्रा करावी, हेही संशयास्पदच ठरते. या यात्रेचा खर्च कंत्राटदाराने केला अशी चर्चा असताना, आपल्या तीर्थयात्रेचे बिल मुनगंटीवारांनी पक्षावर फाडले आहे. ‘पक्षाच्या खर्चाने, भाडोत्री विमानातून कौटुंबिक तीर्थयात्रा करणारा अर्थमंत्री’ अशी नवीच स्वप्रतिमा मुनगंटीवारांनी जन्माला घातली आहे. एका मंत्र्याच्या खासगी दौऱ्याला पसा पुरविण्याएवढी श्रीमंती महाराष्ट्रातील भाजपला अचानक कशी आली, हा आणखी एक प्रश्न यातून येतोच. तूर्तास काटकसर, भ्रष्टाचारमुक्ती हे शब्द म्हणजे, केवळ, ‘नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे’, असे वाटण्यासारखी परिस्थितीच पुन्हा आली आहे, हेच खरे!
संग्रहित लेख, दिनांक 12th Dec 2014 रोजी प्रकाशित
.. इकडून तिकडे गेले वारे
लॉर्ड अॅक्टन नावाच्या एका इंग्रज राजकारणी इतिहासतज्ज्ञाचे एक जगप्रसिद्ध वचन गेली शंभर वर्षे अबाधितपणे सर्वमान्य ठरले आहे.

First published on: 12-12-2014 at 01:17 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir mungantiwar power corrupts and absolute power corrupts absolutely