मुकुंद संगोराम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संगीताचा अर्थ स्थळकाळानुसार बदलू शकतोच; पण आधी ध्वनिमुद्रणाचे आणि मग रेडिओचे तंत्र आले, त्याने स्थळाच्या बंधनातून मुक्त करताना काळाचे- अगदी मिनिटांचेच- बंधन मात्र घातले! अखेर ‘एलपी रेकॉर्ड’मुळे काळही लांबला आणि एकीकडे मैफल तर दुसरीकडे ध्वनिमुद्रणे अशी मिश्रधून रंगत गेली…

भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेने भारतीय संगीताच्या विकासासाठी फारसे भरघोस प्रयत्न केले नाहीत. मात्र तंत्रज्ञानाला या देशात पूर्ण मुभा दिली. एवढेच नव्हे, तर निदान भारतीय अभिजात संगीत कोमेजून जाईल, अशी तरी कोणती ठोस कृती केली नाही. तिथली वाद्ये भारतात आली, त्याचे येथील संगीताने स्वागतच केले. त्यापूर्वी मुसलमानी आमदनीत आलेल्या वाद्यांबाबतही असेच घडले होते, परंतु ती वाद्ये येथील संगीताशी सहजपणे समरसून जाणारी होती. युरोपीयांसह व्हायोलिन, पियानो, ऑर्गन, हार्मोनिअम यांसारखी वाद्ये येथे आली आणि त्यावरही लगेच भारतीय संगीताचे संस्कार व्हायला सुरुवात झाली. ध्वनिमुद्रणाचे तंत्रज्ञान आले, तेव्हा त्या वेळच्या भारताच्या राजधानीत, म्हणजे कोलकात्यात १९०२ मध्ये पहिले ध्वनिमुद्रण झाले, ते गोहरजानचे, म्हणजे एका कलावतीचे. (राजा राममोहन राय यांनी सतीची चाल रद्द व्हावी यासाठी कोलकात्यात आंदोलन केले, तेही त्यानंतर सुमारे तीस वर्षांनी. इकडे महाराष्ट्री संगीत नाटकात ‘स्त्री पार्ट’ करण्यासही महिलांना मज्जाव होता!) या तंत्रापाठोपाठ आणखी एक तंत्रज्ञान उपयोगी पडले. ते म्हणजे नभोवाणी.

संगीताने सारा भारत व्यापून टाकण्याच्या काळात भारतीय स्वातंत्र्ययुद्ध ऐन भरात आले होते. दुसरे महायुद्ध संपता संपता ब्रिटिशांच्या सत्तेला ग्रहण लागण्याची शक्यता निर्माण होत होती आणि त्याच काळात जर्मनीविरुद्ध लढणाऱ्या ब्रिटनमध्ये, जर्मनीत खूप आधी जन्मलेल्या लुडविग व्हॅन बीथोव्हनच्या (१७७०-१८२७) संगीताने आधीपासूनच अक्षरश: मोहिनी घातली होती. संगीत सातासमुद्रापार जाऊ  शकते, याचे बीथोव्हेन हे जागतिक उदाहरण. दुसऱ्या महायुद्धात नाझींनी बीथोव्हेनचे संगीत त्यांच्या राजकीय हेतूने पद्धतशीरपणे वापरले. मित्र राष्ट्रांनी नाझी जर्मनीविरुद्ध युद्ध जिंकले होते. परंतु जर्मनीच्याच बीथोव्हेनचे ‘ऑपेरा फिडेलियो’ हे व्हिएना येथे मुक्तीचे चिन्ह म्हणून १९४५ मध्ये सादर केले गेले. त्याआधी सात वर्षांपूर्वी, नाझींनी नव्याने व्यापलेल्या ऑस्ट्रियामध्ये ‘व्हिक्टरी ऑपेरा’ म्हणून हाच ऑपेरा सादर करण्यात आला होता. संगीत ही एक जिवंत गोष्ट असते आणि त्यावर आजूबाजूच्या परिस्थितीचा, घटना- घडामोडींचा परिणाम होत असतो, याचे असे दर्शन जगातील अनेक देशांच्या संगीतात शोधता येईल. जागतिक पातळीवर संगीताच्या जडणघडणीत जे बदल झाले, त्याला भवतालातीलच असंख्य गोष्टी कारणीभूत ठरल्या.

नभोवाणीने स्वातंत्र्याच्या काहीच वर्षे आधी भारतात पाऊल टाकले आणि भारतीय संगीताला नवसंजीवनी प्राप्त होण्याची एक संधीच प्राप्त झाली. जून १९२३ मध्ये ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब’ची स्थापना झाली आणि संगीत ऐकण्याची आणखी एक संधी श्रोत्यांसाठी उपलब्ध झाली. खासगी नभोवाणीचे सरकारीकरण झाले, तरीही त्याची सर्वांत अधिक मोहिनी अभिजात संगीत रसिकांवरच पडली. ‘आकाशवाणी’च्या स्थापनेनंतरची सुमारे तीन दशके या माध्यमाने संगीताच्या क्षेत्रात अधिराज्य गाजवले. ‘आकाशवाणी संगीत संमेलनां’च्या आयोजनामुळे देशभरातील अनेक नामवंत कलाकारांची प्रत्यक्ष मैफल सहजपणे ऐकता येऊ  लागली. कलावंतांसाठीही ती एक पर्वणीच होती. त्या काळात म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या प्रारंभी सगळ्या मोठ्या कलावंतांना आकाशवाणीवरील कार्यक्रमांचे ‘चेन बुकिंग’ मिळत असे. एका शहरातून दुसऱ्या शहरात असा हा प्रवास सरकारी खर्चाने होई. त्या शहरात काही दिवस राहून परिसरातील आणखी काही गावांमध्येही जलशांचे आयोजन होई. असा हा बराच काळ चालणारा प्रवास कलावंतांसाठी उपयोगी ठरत असे. त्यांना राष्ट्रीय स्तरावर स्वरमंच मिळत असे आणि देशभरातील श्रोत्यांना घरबसल्या उत्तमोत्तम गायन ऐकायला मिळत असे. भारतीय संगीताच्या विकासात आकाशवाणीने दिलेले योगदान मोलाचेच होते. दुर्दैवाने सध्याच्या काळात आकाशवाणीवर अभिजात संगीताला मिळणारे स्थान नगण्य म्हणता येईल, एवढे अल्प आहे. पु. मं. लाड, झुल्फिकार अली बुखारी, कृ. द. दीक्षित यांच्यासारख्या आकाशवाणीवरील कलासक्त अधिकाऱ्यांच्या संगीतप्रेमामुळे कलावंतांनाही आकाशवाणीची देशभरातील केंद्रे माहेरची सावली देत असत. कलावंतांना संधी मिळण्यासाठी परीक्षा द्यावी लागे. त्यावर त्यांचा दर्जा ठरत असे. मानधन त्याच्याशी निगडित असे. अनेक दिग्गज कलाकारांनी अशा परीक्षा देण्यास नकार दिला. परंतु अनेकांना आकाशवाणीने स्वत:हून बोलावून घेतले. स्वातंत्र्य मिळेपर्यंत संगीताचे स्वरावकाश विज्ञान आणि तंत्रज्ञानाने विस्फारले गेले, यात शंका नाही.

ब्रिटिशांनी भारतीय संगीताशी नाळ जुळवण्याचा प्रयत्न केला नाही, तसे येथील कलावंतांना भारताबाहेर जाण्यासही प्रोत्साहन दिले नाही. परंतु तंत्रज्ञानाचा प्रभाव इतका उग्र होता, की त्याने हे संगीत सातासमुद्रापार पोहोचणे शक्य होणार होते. ध्वनिमुद्रिकेचा सात मिनिटांचा अवधी वीस मिनिटांपर्यंत वाढण्यासाठी भारताला स्वातंत्र्य मिळूनही काही वर्षे जावी लागली होती. १९४० ते ५० या काळात मुंबई आणि कोलकात्यात अनेक संगीत परिषदा होत असत. त्यातही म्युझिक सर्कल ही नव्याने निर्माण झालेली संस्था या शहरांमध्ये स्थिरावू लागली होती. मुंबईच्या मुख्य परिसराबरोबरच अंधेरी, विलेपार्ले या भागांतही अशा सर्कल संगीताचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुढाकार घेत असत. पुणे, हुबळी, धारवाड यांसारख्या शहरांमध्येही हेच वातावरण होते. शंभर किंवा फार तर तीनचारशे रसिकांच्या या मैफली. फारच थोड्या खुच्र्या. बहुतेक जण खाली जमिनीवरच बसून संगीत श्रवण करीत असत. कलावंतांसाठीही थोडीशीच उंच बैठक असे. आकाशवाणीमुळे अशा प्रत्यक्ष मैफलींना जाण्याची इच्छा होणाऱ्या श्रोत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस भरच पडत होती. ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाल्या तर आपल्या प्रत्यक्ष कार्यक्रमांना कोण येईल, अशी धास्ती असणाऱ्या कलावंतांना हे लक्षात येत नव्हते, की त्या ऐकून प्रत्यक्ष कार्यक्रम ऐकण्याची इच्छा प्रबळ होण्याचीच शक्यता अधिक. ज्या कलावंतांना हे कळले, त्यांनी तंत्रावर स्वार होऊ न संगीत पुढे नेण्यास बहुमोल मदत केली.

जगातली पहिली अशी वीस मिनिटांची ध्वनिमुद्रिका १९४८ मध्ये अमेरिकेत प्रसिद्ध झाली आणि संगीत प्रसाराच्या वेगाला उधाण येत गेले. भारतात अशी पहिली वीस मिनिटांची ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाली १९५८ मध्ये. कलावंत होते, सतारवादक पंडित रविशंकर. त्यानंतर दोनच वर्षांनी पंडित भीमसेन जोशी यांच्या गायनाच्या ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाल्या. त्या काळात आपल्या गायनाने चकित करून सोडणाऱ्या पंडित कुमार गंधर्वांची अशी ‘लॉन्ग प्लेइंग’ ध्वनिमुद्रिका लगेचच तीन वर्षांत प्रसिद्ध झाली. भारतातील आकाशवाणी या माध्यमामुळे संगीत सहजरीत्या पोहोचत होते, तर या ध्वनिमुद्र्रिकांमुळे ते टिकून राहणे आणि पुन:पुन्हा ऐकता येण्याची सोय झाली होती. यामुळे संगीताचे कार्यक्रम होणे आणि रसिकांना ते समोर बसून ऐकत, त्या संपूर्ण मैफलीचा भाग होणे शक्य झाले.

ज्या काळात सामान्यत: एक राग किमान तास-सव्वा तास तरी गायलाच जायचा, त्या काळात तो वीस मिनिटांत मांडून संपूर्ण रागाचा कलात्मक आनंद निर्माण करायचा, हे कलावंतांसमोर प्रचंड आव्हान होते. आज संगणकावर कोणतेही छायाचित्र साठवून ठेवण्यासाठी खूप जागा व्यापली जाते. परंतु तेच छायाचित्र आंतरजालाच्या मदतीने पुढे पाठवण्यासाठी त्या छायाचित्राची ‘झिप फाइल’ करावी लागते. त्यामुळे त्याचे वजनमान हलके होते, परंतु छायाचित्र मात्र तसूभरही बदलत नाही. वीस मिनिटांच्या ध्वनिमुद्रिकेत या सगळ्या कलावंतांनी नेमके हेच केले. दीड-दोन तासांच्या रागाची ‘झिप फाइल’ केली. हे सांगायला, लिहायला सोपे असेल, परंतु प्रत्यक्षात आणण्यासाठी जी कमालीची प्रतिभा असावी लागते, ती त्या काळात या तंत्राला सामोरे जाऊन त्यावर स्वार होऊ इच्छिणाऱ्या कलावंतांमध्ये होती, असेच म्हणावे लागेल. हा एक प्रकारचा कलात्मक शोधच होता आणि तो लावण्यात आणि त्याचे उपयोजन यशस्वी करण्यात ज्या कलावंतांनी योगदान केले, त्यांचे भारतीय संगीतानेच सतत स्मरण करायला हवे. आज मागे वळून पाहताना असे लक्षात येते, की तंत्रज्ञानाला सामोरे जाण्यासाठी प्रारंभीच्या काळात अतिशय प्रतिभावान आणि सर्जनशील कलावंतांनी मेहनत घेतली. काळाच्या पुढचे पाहण्याची त्यांची क्षमता हे त्यामागील खरे कारण. तेव्हा जर त्या वेळच्या कमअस्सल कलावंतांनीच तंत्राला जवळ केले असते तर? भारतीय अभिजात संगीताला अस्तित्वाची लढाई किती तरी आधीच करणे भाग पडले असते.

mukund.sangoram@expressindia.com

मराठीतील सर्व स्वरावकाश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta swaravkash article lp records abn
First published on: 17-04-2021 at 00:06 IST