scorecardresearch

प्रयोग आणि प्रसार…

नवसर्जनाची ओढ असलेल्या कलावंतांमुळे कलेचा प्रवाह अधिक रुंद होतो.

कुमार गंधर्व – (सौजन्य : kalapini.com)

|| मुकुंद संगोराम
गुरूची विद्या जशीच्या तशी राखण्यातूनही संगीताचा प्रसार होत असेल, पण १९६०च्या दशकापासून प्रयोगशील कलावंतांनी अभिजात संगीत अधिकाधिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवले. त्यानंतरचा काळ ध्वनिफितींच्या सुकाळाचा, पण संगीताचा तो कॅसेट-बाजार अभिजात संगीताला कवेत घेण्यात कमी पडला का?

कलावंतांचे प्रकार दोन. एक म्हणजे मिळालेल्या विद्येचा आदर ठेवत ती जशीच्या तशी पुढे नेण्यासाठी कष्ट करणारे. दुसरे, जे काही मिळाले, त्यात स्वप्रतिभेने नवसर्जन करून कलेमध्ये प्राण फुंकणारे. गुरुमुखातून मिळालेली विद्या जशीच्या तशी सादर करणे हा एक प्रकार आणि त्या शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानावर स्वत:च्या प्रज्ञेचे आवरण चढवून त्यात नव्याने काही निर्माण करण्याची शक्यता सतत तपासून पाहणे हा दुसरा प्रकार. कलावंतांचे हे दोन्ही प्रकार आपापल्या जागी थोरच. पहिल्या प्रकारातील कलावंतांची संख्या मोठी. नजरेत भरेल अशी. परंतु दुसऱ्या गटातील कलावंत हाताच्या बोटावर मोजता येतील असे. तरतमभावाने पाहायचेच ठरवले, तर दुसऱ्या प्रकारातील कलावंतांचे कलेच्या नवनिर्माणातील योगदान अधिक महत्त्वाचे. आपल्या कलेने आयुष्यभर रसिकांना आनंद देत राहणारे कलाकार कलेच्या पुढील वाटचालीसाठी भरीव म्हणता येईल, असे योगदान देऊ  शकत नसले, तरीही त्यांच्यामुळे कलेला जिवंत राहण्याची ऊर्मी मिळते. केवळ लोकप्रियतेचे शिखर गाठले म्हणजे मोठा कलावंत, ही समजूत निर्माण होण्यास प्रचार आणि प्रसाराचा वाढलेला पसारा हे मुख्य कारण. संगीताच्या क्षेत्रात आपापली प्रतिभा परजत राहणाऱ्या अनेक कलावंतांनी आपापल्या परीने योगदान दिले. अभिजात संगीतापुढचे मोठे आव्हान होते, ते संगीताची आवड सर्वदूर निर्माण करण्याचे. कलोपासक श्रोता मिळणे, ही प्रत्येक कलाकारासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. पण त्या कलोपासकांची संख्या वाढल्याशिवाय संगीताचे तरून जाणे ही अवघड बाब होऊ न जाते. कोणत्याही कलाविष्कारात रसिक अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्याचे कलाभान सतत तेवत ठेवणे आणि त्यालाही या कलाविष्काराचा अविभाज्य घटक करून घेणे, ही कलावंतांसाठी महत्त्वाची गोष्ट. संगीतासारख्या प्रयोगक्षम कलेमध्ये तर ते अधिकच आवश्यक. याचे कारण कलेची पूर्तता होण्यासाठीची ती गरज असते. कलावंतांसमोरची मोठी जबाबदारी त्या घटकाला सतत आपल्या संगतीत ठेवण्याची. त्याच्या जाणिवांशी ओळख करून घेण्याची आणि त्यालाही सतत नव्याने काही सांगून त्या जाणिवा समृद्ध करण्याची. संगीतासारख्या कलेतही हे कार्य अनेक शतके सातत्याने होत राहिले, त्यामुळे त्याचा खळाळता प्रवाह कुठेच थांबला नाही.

नवसर्जनाची ओढ असलेल्या कलावंतांमुळे कलेचा प्रवाह अधिक रुंद होतो. पुढीलांसाठी नवी वाट तयार करण्याचे आव्हानही देतो. हे आव्हान स्वीकारण्याची क्षमता प्रत्येकात असते, असे नाही. वकूब, जाणीव, समज, प्रतिभा, प्रज्ञा अशा अनेक स्तरांवर ते अवलंबून असते. ऐंशीच्या दशकापर्यंत हे असे सातत्याने घडत आले. त्यामुळेच ग्वाल्हेर घराण्याचे संस्थापक उस्ताद नथ्थन खाँ, त्यांची परंपरा पुढे चालवणारे हद्दू हस्सू खाँ यांच्यापासून पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर (१८४९-१९२६), पं. विष्णू दिगंबर पलुस्कर (१८५५-१९४६), किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खाँ (१८७२-१९३७), जयपूर घराण्याचे अध्वर्यू उ. अल्लादिया खाँ (१८५५-१९४६) यांच्यासारख्यांनी जी नवी वाट चोखाळली, ती नंतरच्या काळात विस्तीर्ण झाली. याचे कारण या सगळ्यांनी सातत्याने नवे प्रयोग केले, त्यामध्ये आपली सारी बुद्धिमत्ता पणाला लावताना, पुढच्या पिढीसाठी एक गृहपाठही सांगून ठेवला. नवतेची  ही परंपरा ख्याल गायनशैलीत आपल्या अपूर्व कामगिरीने आजही उजळत राहणारे सदारंग (मूळ नाव नियामत खाँ, १६७०-१७४८) आणि त्यांचे पुतणे अदारंग (मूळ नाव फिरोज खाँ) यांनी परंपरेत राहूनच ही वाट प्रशस्त केली.  विसाव्या शतकातील कलावंतांनी या नवपरंपरेलाही नवा साज दिला आणि भारतीय अभिजात संगीतात मोलाची भर घातली. ऐंशीच्या दशकापर्यंत म्हणजे जागतिकीकरणाच्या प्रारंभापूर्वी हे कलावंत आणि रसिक या दोघांच्याच संबंधांपुरते मर्यादित राहिले. या दशकात कलावंतांच्या आविष्काराला अधिक मोठ्या प्रमाणात दाद मिळत गेली आणि त्यामुळे केवळ कलात्मकतेलाच प्राधान्यही मिळत गेले. स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशभरात संगीतासाठीचा सर्वांत आनंददायी काळ असे या दशकाचे वर्णन करावे लागेल.

गायन आणि वादन या संगीताच्या दोन्ही क्षेत्रांसाठी हा काळ बहराचा होता. कलावंत बिदागीच्या मोहात नव्हते आणि रसिक उत्तम संगीत ऐकण्याच्या मन:स्थितीत होते, असा हा संयोग. महोत्सवांबरोबरच खासगी मैफिलींना अक्षरश: उधाण आलेल्या या दशकांत रसिकाला त्याची आवड निवड बदलत बदलत आपल्या स्वरसंगतीत ठेवण्याचे काम या काळातील सगळ्या कलावंतांनी मनापासून केले. महोत्सवी संगीत आणि जलशातील संगीत यातील नेमका गुणात्मक फरक ओळखत कलावंत रसिकांना तृप्त करण्यातच समाधान मानत होते. रसिकांच्या रसिकतेचा लघुत्तम साधारण विभाजक काढून त्यांना आवडेल असे गायन सादर करत असतानाच, उपस्थितांपैकी चोखंदळ रसिकांचीही मान डोलावेल, याची काळजी कलावंतांना घ्यावी लागते. त्यामुळे नव्यानेच श्रोता होऊ इच्छिणाऱ्यासाठी संगीत ही जीवाभावाची कला होऊ लागते. त्यामुळेच नवनव्या प्रयोगांना या काळात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला. कुमार गंधर्व यांचे ‘त्रिवेणी’, ‘ऋतुराज महफिल’, ‘भूप दर्शन’, ‘गीतवर्षा’, ‘मला उमजलेले बालगंधर्व’, ‘मालवा की लोकधुनें’ यांसारखे अनेक नवोन्मेषी सांगीतिक प्रयोग या काळात रसिकांसाठी पर्वणी होती. सतत काही नवे, सौंदर्यपूर्ण आणि कलात्मक असे घडण्यासाठी या दशकापर्यंतचा काळ महत्त्वाचा होता. पं. भीमसेन जोशी यांची ‘संतवाणी’, रंगवाणी’ हे प्रयोग याच काळात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते. किशोरीताई आमोणकरांसारख्या कलावंताला याच काळाच्या टप्प्यात आपल्या परंपरेशी इमान राखत, भावदर्शनाच्या कलात्मक आविष्काराचे प्रयोग करता आले. याचे कारण रसिक या सगळ्या प्रयोगांकडे अतिशय लक्षपूर्वक नजर ठेवून होते. कलेची ही नवी ‘नजर’ कलावंत आणि श्रोते या दोघांसाठीही तेवढीच अपूर्वाईची होती. नवरागनिर्मितीचा ध्यास कितीतरी शतके अनेक कलावंतांनी घेतलाच होता. त्याचे लोकप्रिय होणे ही खरी गरज असते. या सगळ्या कलावंतांनी हे काम अतिशय मन लावून केले. भीमसेनजींचा ‘कलाश्री’ किंवा कुमारजींचा ‘गांधी मल्हार’ हा त्या काळातील रसिकांच्या चर्चेचा विषय बनला. याचे कारण संगीताची परिणामकारकता टिकून राहण्याचा अवधी तेव्हा खूपच जास्त होता. नवनिर्मिती स्वत:च्या आनंदासाठी होते, परंतु त्याची पूर्तता रसिकांनी दाद दिल्यानंतर होते. अभिजात संगीतातील कलावंत ‘सेलिब्रिटी’ होण्याच्या या दशकात पुढील काळातील नव्या त्सुनामीची तजवीज काही प्रमाणात तरी होऊ शकली आणि त्यामुळे संगीताचा परिघ आणखी काही दशके तेजाळत राहिला.

संगीत ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या घरात या दशकात सहज हाताळता येणारे छोटेखानी ‘टेपरेकॉर्डर’ हे यंत्र आले होते. कॅसेट हा तेव्हाचा परवलीची शब्द होता. इंटरनेटचा शोध प्रत्यक्षात येण्यापूर्वी संगीताचे एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रत्यक्ष पोहोचणे महाग होते. ध्वनिमुद्रिकेच्या माध्यमातून हा प्रवास होत होता, परंतु त्यासाठी घरोघरी ध्वनिमुद्रिका वाजवता येणारे रेकॉर्ड प्लेअर हे यंत्र पोहोचले नव्हते. तुलनेने श्रीमंत आणि  उच्च मध्यमवर्गापर्यंतच या यंत्राची मजल पोहोचली होती. कॅसेट या तंत्रज्ञानाने संगीताचे सारे जगच बदलून गेले. सहज हाताळता येणारे आणि खिशाला परवडणाऱ्या या तंत्राचा प्रारंभ जरी साठच्या दशकात झाला, तरीही त्याचे सार्वत्रिकीकरण होण्यास मात्र दोन दशके जावी लागली. ७० आणि ८०च्या दशकांत कॅसेटद्वारे संगीत ऐकण्याची सवय समाजातल्या सर्व स्तरात पोहोचली होती. संगीत ध्वनिमुद्रित करून त्याची कॅसेट थेट बाजारपेठेत आणण्याच्या व्यवसायालाही याच काळात तेजी आली. भारतीय चित्रपट संगीतासाठी अक्षरश: वरदान ठरलेल्या या तंत्रज्ञानाने अभिजात संगीतालाही कवेत घेतले. तरीही त्या काळात चित्रपट संगीताची ध्वनिमुद्रित कॅसेट पाच-दहा रुपयांना मिळत असताना अभिजात संगीताची कॅसेट मात्र पन्नास रुपयांना मिळत असे. या संगीताची बाजारपेठ तुलनेने लहान असल्याने हा फरक होता, हे खरे, परंतु तेव्हा कोणत्याही संगीतप्रेमीने हे संगीत सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय कमी किमतीत अभिजात संगीत पोहोचवण्यासाठी पुरेसे प्रयत्ना केले नाहीत, हे खरेच. चुकूनमाकून कुणा शहाण्याने तसे काही केलेच असते, तर आजच्या, एकविसाव्या शतकात या संगीताच्या बाजारपेठेची स्थिती किंचित का होईना वधारली असती यात शंका नाही.

mukund.sangoram@expressindia.com

 

मराठीतील सर्व स्वरावकाश ( Swaravkash ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Teacher student classical music by artists audience cassette market akp

ताज्या बातम्या