मोक्ष म्हणजे काय? मोक्ष किंवा मुक्ती हे शब्द सनातन तत्त्वज्ञानात अनेकवार येतात. माणूसही सहज म्हणतो की मुक्तीसाठी प्रत्येकानं देवाची भक्ती केली पाहिजे. तरीही वापरानं अत्यंत परिचित झालेल्या या संकल्पनांचा वास्तविक अर्थ आपण जाणतोच असं नाही. कित्येकांना वाटतं मोक्ष म्हणजे मृत्यूनंतर मिळणारी गोष्ट आहे. मोक्ष ही मृत्यूनंतरची गोष्ट आहे का हो? माउलींची जी ओवी आपण पाहात आहोत त्या ओवीतच स्पष्ट म्हटलं आहे की अनुक्रमाच्या आधाराने जो स्वधर्माचं आचरण करतो तो त्या योगे निश्चितपणे मोक्ष प्राप्त करतो. इथे मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त करतो, असं जराही सुचविलेलं नाही. म्हणजेच मोक्ष ही जगतानाच प्राप्त करण्याची, जगतानाच अनुभवण्याची गोष्ट आहे. आद्य शंकराचार्यही ‘विवेकचूडामणी’ ग्रंथात म्हणतात की, ‘‘इहैव समृच्छति’’ म्हणजे येथेच जिवंतपणी तुला मोक्षाचं परमसुख अनुभवता येईल. आता मोक्षाचा हा अधिकार काय मूठभर लोकांनाच आहे? तुकाराम महाराज गर्जून सांगतात की, तो सर्वानाच आहे. माणूस म्हणून जन्मलेल्या प्रत्येकाला मुक्तीचा अधिकार आहे. मनुष्याचा जन्म हा मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठीच आहे. आता माणसाला मोक्ष हवा, मुक्ती हवी याचाच अर्थ तो कोणत्या ना कोणत्या बंधनात आहेच. मग हे बंधन कोणतं आहे? ‘आनंद तरंग’ (प्रकाशक- कॉन्टिनेन्टल) या ग्रंथात श्रीपाद कुलकर्णी म्हणतात की, ‘‘आपणा सर्वाना जीवनात प्रत्यही कसली ना कसली बंधने जाणवत असतात. हातापायात बेडय़ा असलेला तुरुंगातील कैदी हे बंधनाचे अत्यंत स्थूल उदाहरण झाले. हे बंधन शारीरिक स्वरूपाचे आहे. परंतु आपणास जाणवणारी बंधने ही मानसिक स्वरूपाची व अधिक सूक्ष्म असतात.’’ (पृ. २८५-८६). म्हणजेच आपल्याला जाणवणारी बंधने ही मानसिक स्वरूपाची व अधिक सूक्ष्म असतात, याचाच अर्थ या सूक्ष्म मानसिक बंधातून निवृत्ती हाही मोक्षच असला पाहिजे. ‘आनंद तरंग’ ग्रंथात कुलकर्णी  यांनी मानवी बंधनं आणि त्यापासूनचं मानवी कल्पनेतलं स्वातंत्र्य याची मार्मीक चर्चा केली आहे. मानवी बंधनाच्या उपपत्त्या राजकारणात, समाजकारणात, अर्थशास्त्रात येतात, असं सांगतात. अर्थात मानवी स्वातंत्र्याच्या उपपत्त्याही राजकारण, समाजकारण आणि अर्थशास्त्रात असतात. म्हणजेच राजकीय स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्य. देश परतंत्र होता तेव्हा राजकीय स्वातंत्र्य मिळाले की देशाचं भलं होईल, असं मानलं जात होतं. काहींचा सामाजिक स्वातंत्र्याला अग्रक्रम होता. सामाजिक स्वातंत्र्य आलं की समाज सुखी होईल, असं मानलं जात होतं. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे राहणीचं मान सुधारणं. ते साधलं की लोक सुखी होतील, असं अर्थवेत्ते गर्जून सांगतात. कुलकर्णी म्हणतात, ‘‘या प्रत्येकाच्या सांगण्यात काही ना काही तथ्ये जरूर आहेत पण ऐतिहासिक अनुभवाचा जमाखर्च मांडता ही सारी अर्धसत्ये आहेत.’’ म्हणजेच राजकीय स्वातंत्र्य मिळालं, अनेक कायद्यांद्वारे सामाजिक स्वातंत्र्य मिळालं, आर्थिक प्रगतीमुळे आर्थिक स्वातंत्र्यही लाभलं पण  तरी माणूस बंधमुक्त, सुखी झाला नाही!