ज्या जगात आपण राहातो त्याच जगात संतही राहातात, असं आपल्याला दिसतं. प्रत्यक्षात ज्या जगात आपण दु:ख भोगत असतो, क्षणोक्षणी विविध प्रकारच्या भयानं आणि भवानं व्याप्त असतो त्याच जगात संत मात्र अत्यंत परमानंदात आणि निर्भयतेनं वावरत असतात. म्हणूनच श्रीनिसर्गदत्त महाराज म्हणतात की, तुमचं जग आणि माझं जग एक नाही. मी तुमच्या जगात नाही. तुमचं जग तुम्हीच निर्माण केलेलं आहे आणि जे स्वनिर्मित आहे त्याचा अंतही तुम्हालाच करावा लागेल! या साऱ्याचा संबंध अर्जुना समत्व चित्ताचें। तें चि सार जाण योगाचें। जेथ मन आणि बुद्धीचें। ऐक्य आथी।। या ओवीशी आहे बरं! मग एकाच जगात वावरणाऱ्या माझ्यात आणि संतांमध्ये अर्थात माझ्या आणि त्यांच्या चित्तवृत्तींमध्ये नेमका फरक काय असतो हो? यासाठी पुन्हा एकवार स्वामी विवेकानंद यांच्या ‘राजयोगा’कडे वळावं लागेल. इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. मागे एका वाचकानं काहीशा नाराजीनं म्हटलं की, या सदरात स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र व बोधाचा स्पर्शही नाही. थोडक्यात स्वामींनी जे विचार मांडले ते प्रामुख्यानं यात हवेत, अशी त्यांची वरकरणी अगदी रास्त वाटणारी तक्रार होती. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. आपल्या सर्व चिंतनात स्वामींविषयीच्या आठवणी आणि त्यांनी मांडलेले विचार याबरोबरच केवळ त्याच आध्यात्मिक ग्रंथांचा आधार घेतला आहे ज्यांचा स्वामीही उत्तर देण्यासाठी अभिनव वापर करीत असत! म्हणजे एखाद्यानं काही प्रश्न विचारला तर त्याला स्वामी कोणतंही पुस्तक देत आणि त्याचं कोणतंही पान उघडायला सांगत अथवा स्वत: उघडून देत आणि त्यावरच त्या प्रश्नाचं उत्तर असे! तसंच एक निसर्गदत्त महाराज वगळले तर आतापर्यंत त्याच संतसत्पुरुषांच्या बोधाचा या सदरात आधार घेतला आहे ‘जो म्हणजे मीच’, असं स्वत: स्वामींनीच अखेरच्या दिवसांत पूर्ण ऐक्यभावनेनं सांगितलं होतं! नाथपंथीय सत्पुरुषांचा आधारही परंपरेच्या औचित्यातून घेतला आहे. तेव्हा आता ‘राजयोगा’कडे वळू. आपला प्रश्न असा होता की, एकाच जगात वावरणाऱ्या माझ्यात आणि संतांमध्ये अर्थात माझ्या आणि त्यांच्या चित्तवृत्तींमध्ये नेमका फरक काय असतो? स्वामीजी सांगतात, ‘‘तलावाचा तळ आपल्याला दिसत नाही, कारण त्याचा पृष्ठभाग तरंगांनी झाकलेला असतो. या तळाचं दर्शन, हे तरंग विरून पाणी शांत झालं म्हणजे होतं. पाणी गढूळ किंवा सारखं हिंदकळतं असेल तर तळ दिसणार नाही. पण जर ते स्वच्छ असून त्यात लाटा उसळत नसतील तर तळ दिसेल. आपले खरे स्व-रूप, आपला आत्मा तलावाच्या तळासारखा आहे, चित्त हे तलावासारखं आहे आणि त्याच्या वृत्ती या तलावावरील तरंगांप्रमाणे आहेत’’ (राजयोग, पृ. ११०). थोडक्यात आपलं जगणं हे देहबुद्धीनुसार असतं, वृत्तींच्या तरंगांनी आत्मस्वरूप आपल्याला जाणवत नाही. त्याची जाणीव नाही म्हणून आपली आत्मशक्ती जागी नाही. सत्पुरुषांच्या चित्तात वृत्तींचे तरंग उसळत नाहीत, विकारवृत्तींनी त्यांचं चित्त गढूळ नाही, त्यामुळे सदोदित स्वरूपस्थ राहून ते स्व-स्थ असतात तर आपण अ-स्व-स्थ असतो!