ध्येय ठरलं की मग सर्व क्षमता ध्येयपूर्तीसाठीच एकवटल्या पाहिजेत. मन जोवर संसारात गुंतून आहे, तोवर ते ध्येयविचारात, ध्येयचिंतनात, ध्येयमननात, ध्येयप्रयत्नांन गुंतणार नाही. यासाठी ते उद्+आसीन् म्हणजे वरच्या पातळीवर स्थिरावलंच पाहिजे! स्वामी स्वरूपानंदही सांगतात, ‘‘नको होऊं मना इंद्रियांचा दास। प्रपंचीं उदास राहें सदा।। १।। हरि-पायीं भाव ठेवीं एक-निष्ठ। न मानीं वरिष्ठ दुजें कांही।। २।। लौकिकाचा संग दु:खासी कारण। करी नागवण स्व-हिताची।। ३।। स्वामी म्हणे होईं हरि-पायी लीन। तरी चि कल्याण पावसील।। ४।। ’’  (संजीवनी गाथा, २३६) हे मना, इंद्रियाचं दास्य सोडलंस तरच प्रपंचात उदासीन होता येईल. प्रत्यक्षात मन इंद्रियांचा दास नाही, मनानं इंद्रियांना दास बनवून ठेवलं आहे! मनाच्या ओढीनुसार, ऊर्मीनुसार ती राबतात. तरी मनाला समजावण्यासाठी मनाच्याच दोषावर बोट न ठेवता सद्गुरू सांगतात की, हे मना इंद्रियांचा दास बनू नकोस. या दास्याचा पसारा असा जो प्रपंच, त्याबाबत उदासीन हो. आसक्त होऊन त्यात पिचून जाऊ नकोस. हरिच्या चरणी एकनिष्ठ हो, त्या हरिचरणी भाव ठेव. हरि म्हणजे समस्त भवदु:खाचं हरण करणारा जो सद्गुरू आहे, त्याच्या पायी भाव एकवटंव. त्यापेक्षा कशाला वरिष्ठ मानू नकोस, महत्त्व देऊ नकोस. आपला सर्व गोंधळ इथेच आहे. आपण स्वत:ला आध्यात्मिक मानतो, काहीबाही साधनाही करतो पण जगण्यात त्याला जे खरं महत्त्व द्यायला पाहिजे, ते देत नाही. भौतिक जगण्यालाच खरं महत्त्व देतो, त्याचा सांभाळ गुरुशरणतेच्या जोरावर होईल, असं आपण मानतो. याचाच अर्थ खरं मोल, खरं महत्त्व भौतिकालाच देतो. मग आपला नावलौकिक  आपल्याला महत्त्वाचा वाटतो, तो भौतिकाच्याच आधारावर मिळतो, या समजातून भौतिकाचा भक्कम आधारही मिळवण्याच्या धडपडीत आपण अखंड मग्न असतो. मग त्या भौतिकाला जे अनुकूल आहे, त्या भौतिकाची प्राप्ती ज्या गोष्टीनं होईल, त्या गोष्टीसाठी प्रयत्न करण्यातच आपलं खरं हित आहे, असं आपण मानू लागतो. म्हणून स्वामी स्पष्ट सांगतात, अरे तू जे जे तुझ्या हिताचं मानत आहेस त्याची नागवण कर, त्याची छाननी कर, त्याचा तपास कर. लौकिकाची जी आस तुला आहे, लौकिकाचा जो ध्यास आणि हव्यास तुला आहे त्यामुळेच तुला पदोपदी दु:ख भोगावं लागत आहे. हा लौकिकाचा हव्यासच तुझ्या खऱ्या हिताची नागवण करीत आहे. म्हणून या लौकिकाच्या हव्यासातून होणाऱ्या प्रयत्नांना हितकारक मानून जगू नकोस. हरिपायी, म्हणजे सद्गुरूंची पावलं ज्या मार्गानं जातात त्या आचरणमार्गात, त्या साधनामार्गात स्वत:ला लीन कर. तरच खरं कल्याण प्राप्त होईल. तेव्हा या साधनामार्गात लीन कसं व्हावं, हाच खरा प्रश्न आहे. त्या उत्तराचं प्रात्यक्षिक सद्गुरू माझ्या जगण्यातच उतरवतील! तसं झालं तरच मनातले अशाश्वताच्या ओढीचे सर्व संकल्प मावळतील आणि सत्यसंकल्पाशिवाय दुसरा कोणताच संकल्प उरणार नाही. ‘‘मग अपेक्षित जें आपुलें। तेही सांगती पुसिलें। जेणें अंत:करण बोधलें। संकल्पा न ये ।।’’ हीच ती स्थिती!