स्वामी स्वरूपानंद संकलित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ओवी आणि तिचा अर्थ आता विस्तारानं पाहू. ही ओवी अशी:
तें क्रियाजात आघवें। जें जैसें निपजेल स्वभावें। तें भावना करोनि करावें। माझिया मोहरा।।२५।। (अ. ९ / ४००).
प्रचलितार्थ : तात्पर्य, जे जे कर्म तुझ्याकडून स्वभावत: घडेल मग ते सांग असो वा असांग, ते सर्व कर्म माझ्याप्रीत्यर्थ आहे, अशा समजुतीने कर.
विशेषार्थ : या ओवीचे दोन विशेषार्थ ठळकपणे जाणवतात. पहिला अर्थ प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीत असलेल्या आपल्यासारख्या सर्वसाधारण साधकांसाठीचा आहे. तो असा की, ‘‘स्वरूपाचा भाव टिकवून तुझ्याकडून जे जे कर्म घडेल त्यावर ते अवघं माझ्याच इच्छेनं झालं या भावनेची मोहोर उमटवून मलाच ते अर्पण कर.’’ दुसरा अर्थ हा साधनेत प्रगती करीत असलेल्या साधकासाठीचा आहे. तो म्हणजे, ‘‘साधनपथावर तुझ्याकडून स्वाभाविकपणे ज्या काही यौगिक क्रिया घडतील त्या घडूनही माझ्याविषयीचा भाव गमावू न देता अर्थात अहंकाराचा स्पर्श मनाला होऊ न देता साधनेतील हे कथित यशही माझ्याचकडे वळवून टाक. अर्थात साधनेत कितीही प्रगती होवो, कितीही अनुभव येवोत, कितीही सिद्धी वाटय़ाला येवोत, तुला माझ्या वाटेवरून ढळायचं नाही, हे पक्कं लक्षात ठेव. या यश, सिद्धींमुळे तू वाट चुकलास तर घसरण आहे!’’
विशेषार्थ विवरण: हे विवरण सुरू करण्याआधी पोथीचा जो प्रचलित अर्थ आहे त्यानेदेखील मनात ज्या शंका उत्पन्न होऊ शकतात, त्यांचा विचार करू. कारण पोथीतला हा अर्थही नकळत एका महत्त्वाच्या मुद्दय़ाला स्पर्श करीत आहे. ओवीचा प्रचलित अर्थ वर आहेच. त्यातील, जे जे कर्म तुझ्याकडून स्वभावत: घडेल, मग ते सांग असो वा असांग, ते माझ्याप्रीत्यर्थ कर, हा जो बोध आहे त्यानं मनात गोंधळही निर्माण होऊ शकतो. सांग म्हणजे चांगलं आणि असांग म्हणजे वाईट. मोहग्रस्त जिवाकडून स्वभावत: असांग कर्मच तर घडतं! स्वभावत: याचाच अर्थ देहबुद्धीनुसार नाही का? मग देहस्वभावानुसार जे घडेल मग ते चांगलं कर्म असो वा वाईट कर्म असो, सत्कर्म असो वा दुष्कर्म असो, ते माझ्यासाठी तू करीत आहेस, असं मानून कर, असं भगवंताला सांगायचं आहे का? मग एखादा खुशाल दुष्कर्म करीत राहील आणि हे भगवंतासाठीच मी करीत आहे, असंही सांगत राहील, तर ते स्वीकारार्ह आहे का? हे प्रश्न आपल्याला अधिक अंतर्मुख करतात आणि त्याचवेळी सहसा लक्षात न येणारी जीवनाची एक बाजूही प्रकाशित करतात. एखादा चांगलं कर्म करतो ते का आणि एखादा दुष्कर्म करतो ते का? मी चांगलं कर्म करतो त्यामागे किती तरी गोष्टी कारणीभूत असतात. सत्कर्म करण्यासाठी मला परिस्थितीचा आणि भोवतालच्या माणसांचाही किती तरी आधार असू शकतो. पण एखाद्याच्या वाटय़ाला ही अनुकूलताच नसेल तर? त्याचं जीवन आजूबाजूची परिस्थिती आणि माणसं यामुळे जन्मापासूनच दुष्कर्माकडेच प्रवाहित असलं तर?