मुंबईकरांना आजही भयस्वप्न दाखवणारी ‘२६ जुलै’ २००५ मध्ये आली होती.. त्या पुराची दशकपूर्ती पुढल्या वर्षी होईलच, पण त्याआधीचा, यंदाच्या २०१४ चा पावसाळा उशिरा आलेला, तरीही सुखावणारा आहे.. चांगल्या पावसाचं, आबादाणीचं सुखस्वप्न चिरंतनच असल्याची ग्वाही कोंबाकोंबांतून मिळू लागली आहे..
कुणी त्याला ‘ एल निनो इफेक्ट’ म्हणतात, तर कुणी ‘ग्लोबल वॉर्मिग’चा परिणाम म्हणतात. पण हे शब्द कानावर पडण्यास सुरुवात झाली त्याच्या किती तरी आधीपासून, निसर्ग लहरी असतो, हे मात्र आपण ऐकत आलोच आहोत. निसर्गाचं चक्र बदललं आहे, सगळंच बेभरवशी झालं आहे, असं म्हणतानाही, मृगाची चाहूल लागताच माथ्यावरच्या अथांग पसरलेल्या निळ्या आकाशाच्या एखाद्या कोपऱ्यात कुठे ढगाचा काळा चुकार तुकडा तरी दिसतो का हे शोधणाऱ्या शेतकऱ्याची छायाचित्रे वर्तमानपत्रातून आपण वर्षांनुवर्षे पाहतच आलो आहोत. दूरचित्रवाणी वाहिन्यांवर सात दिवस, चोवीस तास बातम्यांचा रतीब सुरू झाला, कपाळावर आडवा हात धरून केविलवाण्या नजरेनं आकाश न्याहाळत भेगाळलेल्या शेतात बसलेल्या शेतकऱ्याच्या थेट चित्रणानं, या दृश्यांची तीव्रता अधिक भेदक केली आणि निसर्गाच्या लहरीपणाच्या एकएक ऐकीव माहितीला घराघरांतील छोटय़ा पडद्यांवरील दृश्य-पुराव्यांची जोड मिळू लागली. एल निनो आणि ग्लोबल वॉर्मिगचा ‘जागतिक बोलबाला’ सुरू होण्याआधीही निसर्गाच्या कोपाचे फटके बसतच होते. त्यामुळेच, कधी भर उन्हाळ्यात वादळी वारे सुसाटपणे वाहू लागतात आणि उन्हाच्या चटक्यांनी भाजणाऱ्या जमिनीवर अचानक मोठमोठय़ा गारांचा मारा सुरू होऊन हातातोंडाशी आलेली पिकं मलूलपणे भुईसपाट होतात. कधी हिवाळ्याच्या हंगामात थंडीची चाहूलदेखील लागतच नाही. घामाच्या धारांनी शरीरे चिंब होऊ लागतात. अशा गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवांना आता तसे नवखेपण राहिलेले नाही. आजकालच्या पावसाळ्याचेही तसेच आहे. तरीदेखील हवामान खात्याच्या बेभरवशी अंदाजावर विसंबून न राहता, वर्षांनुवर्षांच्या आडाख्यांनुसार मृग नक्षत्र सुरू होताच पाऊस येणार या जाणिवेने भारावलेला तमाम शेतकरीवर्ग नांगरणी-पेरणी करून मोकळा होतो आणि पावसाच्या पहिल्या शिडकाव्यानंतर शेतात उगवणाऱ्या कोवळ्या हिरवाईची स्वप्ने मनात रंगवू लागतो. पण पाऊस पडतच नाही. नक्षत्राच्या आडाख्यानुसार, त्या दिवसांत आकाशात काळ्याकुट्ट ढगांची दाटी व्हायलाच हवी असते. विजांचा कडकडाट आणि सोसाटय़ाचे वारे सुटायलाच हवे असतात. पण तसं काहीच घडत नाही. मग निराश झालेला शेतकरी दुष्काळाच्या भयानं धास्तावतो आणि भेगाळलेल्या शेतातल्या एका आडोशाला नांगर उभा करून हताशपणे आकाश न्याहाळू लागतो. विहिरी कोरडय़ा पडतात, मायेनं गोठय़ात जपलेल्या आणि जोपासलेल्या जनावरांच्या चिंतेचं सावट घराघरांवर पसरतं आणि निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसणार, या भीतीनं सारं काही उदास होऊन जातं. असं झालं, की सरकारी यंत्रणाही जाग्या होतात. गावोगावी जनावरांच्या छावण्यांची तयारी सुरू होते, टँकर लॉबी सक्रिय होते आणि चारदोन दिवसांआड गावात येणाऱ्या टँकरमधील पाण्याचा ताबा मिळविण्यासाठी गावागावांत तंटेही होऊ लागतात. दुष्काळाच्या सावटातून पुन्हा तीच एक गोष्ट अधोरेखित होते, ‘निसर्ग लहरी असतो’..
यंदादेखील तसंच झालं. मान्सूनचे वारे वेगानं केरळच्या दिशेने येताहेत आणि पावसाळा वेळेवर सुरू होणार अशी वर्दी हवामान खात्यानं दिली, तेव्हा सरकारी यंत्रणांना हायसं वाटलं. मे महिन्यात दुष्काळी भागांतही, जेमतेम ओलाव्याच्या आधारानं जमिनीतून येऊ घातलेलं मूठभराएवढं उत्पन्न हाताशी लागेल आणि पावसाळ्यात पुन्हा त्या जमिनी नव्या पिकांनी तरारतील अशी स्वप्ने पाहणाऱ्या शेतकऱ्यांना एका रात्रीत गारपिटीनं उद्ध्वस्त करून टाकलं होतं. पाऊस सुरू झाला की या हानीतून सावरून उभे राहण्याची उमेद बाळगत शेतकऱ्यांनी शेतात नांगर घातले, तेव्हा मान्सूनच्या वाऱ्यांच्या सुखरूप प्रवासाची वर्दी त्यांच्या कानावरही पोहोचली होती. अखेर मान्सूनचे वारे केरळातून महाराष्ट्रात आले, मान्सून दाखल झाल्याची बातमीही त्याच वेगाने सगळीकडे पोहोचली. असे झाले की पाऊस वाजतगाजत, धसमुसळेपणा करत येतो, हा नेहमीचा अनुभव. पण त्या बातमीसोबतचा यंदाचा पाऊस मात्र चोरपावलानंच आला. कुठंकुठं जेमतेम शिंपडून त्यानं पुन्हा काढता पाय घेतला. जमिनी आणि विहिरी कोरडय़ाच राहिल्या. नद्या, नाले आणि कालव्यांचे मलूल झालेले प्रवाह मान्सूनच्या आगमनाच्या केवळ बातमीनं जिवंत होणं शक्यच नव्हतं. पुन्हा शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आणि महाराष्ट्राच्याच भूगोलावर काळजीची काजळी पसरली. तरीही, पावसाचं चक्र कधीकधी असं मागेपुढे होतं, अशी समजूत काढत शेतकरी कामात गुरफटून गेला. चिंतेची काजळी अशीच गडदगडद होत असताना, दुष्काळाचे सावट तीव्र होत असताना पुन्हा अचानक पावसाच्या धारा बरसू लागल्या.. उशिरा का होईना, महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाल्याची आनंदवार्ता घेऊनच सर्वदूर पाऊस कोसळू लागला. मुंबईच्या पावसाला नेहमीच एक वेगळा चेहरा असतो. या पावसाची रूपंही वेगळी असतात. पाऊस बरसू लागला, की छत्र्या, रेनकोट विसरायचेच असतात आणि पहिल्या पावसाच्या धारा झेलत मनसोक्त भिजायचं असतं, हा मुंबईचा अलिखित नियम. यंदा तो उत्साहक्षण थोडा उशिरा आला, पण पावसाळ्याची खरीखुरी जाणीव देणारा पाऊस कोसळू लागताच मुंबईकरांनी तो नियम इमानेइतबारे पाळला. मुंबईत असा पावसाळा उशिरा आणि हळुहळू जोर धरू लागलेला असताना, गावागावांतही पर्जन्योत्सवाला सुरुवात झालीच होती.
जूनच्या ऐन हंगामात दडी मारलेल्या पावसानं महाराष्ट्रात सर्वत्र जोमदार हजेरी लावल्यानं शेतकरी आता सुखावला आहे. पाणीटंचाईच्या सावटातून बाहेर पडलेली गावं आणि शहरंही आता आशावादी झाली आहेत. पावसाची रूपं अनुभवण्याचा आगळा सोहळा सगळीकडे सुरू झाला आहे. कोल्हापूरसारख्या शहराला पर्जन्यसुखाची देणगी आहे, असं म्हणतात. यंदा पावसाळा लांबल्यानं, कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेल्या पंचगंगेची धार आटली होती. महाराष्ट्राला झगमगता ठेवण्यासाठी सदैव वाहणाऱ्या कोयनेचे किनारेही कोरडेठाक पडले होते. पंचगंगेच्या पोटातली पुराणी मंदिरं उघडी झाली होती,  तर कोयनेच्या किनाऱ्याला वाळवंटांची कळा आली होती. दुष्काळाच्या भयाची सारी चिन्हे गावोगावच्या नद्या-कालव्यांच्या कोरडय़ा पात्रांतून उमटू लागल्याने दाटलेला उदासपणा धुवून टाकून आता पावसाच्या सरींनी उत्साहाचे शिंपण सुरू केले आहे.. नद्या पुन्हा वाहू लागल्या आहेत. कालव्यांची पातळीही उंचावू लागली आहे. कोरडय़ा, उघडय़ा डोंगरांवर बहुरंगी हिरवाईच्या छटा उमलू लागल्या आहेत..  रानावनातल्या असंख्य झाडाझुडपांनी जपून ठेवलेली नवनिर्मितीची, जमिनीवर कधीचीपासून विखरून ठेवलेली बीजे, पावसाच्या शिडकाव्यासोबत नव्या कोंबानिशी वर येण्यासाठी आसुसतात, त्यांची आस आता पूर्ण होते आहे.. तांबडय़ा-काळ्या मातीवर हिरवीगार रांगोळी खुलण्याचा हा क्षण! कधीकाळी केल्या गेलेल्या पेरण्या वाया जाणार ही भीती कुठल्या कुठे पळाली आहे आणि भेगाळलेल्या जमिनींमधून कोंब अलगदपणे उमटू लागले आहेत.
 महिनाभरापूर्वी मलूल पडलेल्या जिवंतपणाच्या साऱ्या खाणाखुणांना नवी तरतरी आली आहे. उशिराने का होईना, उत्साहात अवतरलेल्या पावसाच्या सरींनी जिवंतपणाला दिलेल्या या नव्या तजेल्याने निसर्गाच्या लहरीपणाच्या कडवट जाणिवा पुसल्या गेल्या आहेत. तो लहरी असला तरी चालेल, बेभरवशी असला तरीही चालेल, पण त्याच्या सोबतीत जगण्यातला आनंद आहे आणि त्याच्या अस्तित्वातच, सुखाचा आणि उत्साहाचाही अनुभव आहे.. पावसाचे हे सुखस्वप्न आपण आता विसरायचेच, अशा हताशेला महाराष्ट्र येत असताना पुन्हा सुखाची हिरवी वाट दिसू लागली आहे.  

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
Abhishek suffered a heart attack during a visit to Delhi zoo
हृदयविकाराच्या झटक्याने पतीचा मृत्यू, मृतदेह पाहताच पत्नीने सातव्या मजल्यावरुन उडी मारत संपवलं आयुष्य
What did Pune get in the state budget for the year 2024-25
अर्थसंकल्पात पुण्याच्या वाट्याला काय?… वाचा सविस्तर