श्रीसद्गुरूंचं खरं स्वरूप सर्वसामान्य साधक जाणू शकत नाही. मनुष्यभावानंच तो सद्गुरूंकडे पाहतो आणि त्या भावानंच त्यांची सेवाही करतो. भौतिकाच्या प्रभावात अडकलेल्या जिवाला त्यातून सोडवणं आणि कर्तव्यर्कम करीत असतानाही त्याचं चित्त परमात्मतत्त्वात रंगवणं, या त्यांच्या खऱ्या व्यापक कार्याची जाण त्याला नसते. त्यामुळेच आपल्या भौतिक जगण्यातल्या अडीअडचणी त्यांच्या कृपेनं दूर व्हाव्यात, अशी आसही तो मनात बाळगतो. परमतत्त्वाची जाण आल्यानं त्या तत्त्वाशी एकरूप झालेले संतच त्यांचं खरं चैतन्य स्वरूप जाणतात. त्या स्वरूपाचा ते स्वीकारही करतात. स्वीकार म्हणजे पूर्ण ग्रहण करणं, त्या स्वरूपाशी एकतानता, एकलयता साधणं. त्या स्वरूपाची जाण ठेवून वाटचाल करणं. भौतिक नश्वर आहे आणि त्या भौतिकातच ईश्वर तत्त्वामध्ये साधकाला विलीन करण्यासाठी सद्गुरूही प्रकटले आहेत. तो ईश्वर जसा व्यापक आहे, त्याचप्रमाणे पहिल्या पायरीवरील साधकासाठी भौतिकाचा प्रभावही व्यापक आहे. त्या प्रभावात अडकलेला साधक त्यातच अडकून भिरभिरण्याचीही भीती आहे. पुढील ओवीत भौतिक प्रभावाच्या या व्यापकतेचं आणि भौतिक जगाच्या क्षणभंगुरत्वाचं सूचन आहे. ही ओवी अशी-
उपजे तें नाशे। नाशलें पुनरपि दिसे। हे घटिकायंत्र तैसें। परिभ्रमे गा।।६।। (२/ १५९).
प्रचलितार्थ : जे उत्पन्न होते ते नाश पावते व नाश पावलेले पुन्हा दिसते. वाळूच्या घडाळ्यासारखा वा रहाटगाडग्यासारखा असा हा क्रम अखंड चालतो.
विशेषार्थ : भौतिक जगाचा विस्तार किती आहे? हे जग दृश्यही आहे आणि अदृश्यही आहे. ज्या जगात मी वावरतो ते स्थूल, दृश्य भौतिक जग जितकं मोठं आहे त्यापेक्षा माझ्या अंतरंगातलं सूक्ष्म आणि अदृश्य भौतिक जगही विराट आहे. हे आंतरिक जगच अधिक प्रभाव पाडणारं आहे. बाहेरच्या जगात मी एखादंच घर विकत घेतो पण माझ्या आंतरिक जगात माझं घर कसं असावं, याच्या कल्पनांचा पसारा भरपूर आहे. माझ्या अंत:करणात उसळणारी वृत्ती, वासना, कल्पना, प्रेरणा मला बाहेरच्या जगात त्या अनुरूप प्रयत्न करायला लावतात. अंतरंगात उत्पन्न होणाऱ्या या कल्पना, वासना, वृत्ती कशा आहेत? त्या उत्पन्न होतात आणि कालांतरानं नष्टही होतात, त्या नष्ट होतात पण कायमच्या जात नाहीत, त्या पुन्हा कधी उत्पन्न होतील आणि मला त्यांच्या तालावर नाचवू लागतील, याचा भरवसा नाही. उपजे ते नाशे, नाशले पुनरपि दिसे! तेव्हा प्रत्यक्ष, स्थूल, दृश्य भौतिक जग कितीही खरं वाटलं तरी त्याच्यापेक्षा अंतरंगातील जगाची माझ्यावर अधिक सत्ता आहे. बाहेरच्या जगातही हा खेळ आहेच. या जगात जे उत्पन्न होतं त्याचा नाश अटळ आहे. ज्याला जन्म आहे, त्याचा मृत्यू अटळ आहे. ज्याला आरंभ आहे, त्याचा अंत अटळ आहे. जग असं सतत बदलतं असूनही त्याच्या क्षणभंगुरत्वाची जाण मला येत नाही. मला ते अखंड आणि अमर्त्यच भासतं. नदीचं पाणी वेगानं वाहत असताना क्षणोक्षणी खरं तर प्रवाह नवाच असतो पण मला ते जाणवत नाही. तसं हे जग मला कायमचं वाटतं आणि कायम माझंच राहावंसं वाटतं. त्यामुळे त्यातच मी भिरभिरत राहतो.
चैतन्य प्रेम