‘टु किल अ मॉकिंगबर्ड’ या हार्पर ली यांच्या गाजलेल्या कादंबरीनंतर तब्बल ५५ वर्षांनी त्यांचं दुसरं पुस्तक अखेर वाचकांहाती पडणार, अशी बातमी फेब्रुवारीत आली, तेव्हा अनेकजण ‘महिरले’ होते. हे महिरणं फुकाचं नव्हतं. ‘टु किल अ मॉकिंगबर्ड’ वाचलेल्या आणि त्यापासून काही ना काही मिळवलंय असं वाटणाऱ्या जगभरच्या अनेकानेक वाचकांना ली यांच्या दुसऱ्या पुस्तकाची प्रतीक्षा होती.. पण ही लेखिका अशी की, पुढं काय याबद्दल कुणी विचारलेलंही तिला खपत नसे! पत्रकारांना मुलाखती देणं वगैरे दूरच. वाचकांना हा दुरावा सहन करावा लागल्यामुळे उशीरा का होईना, त्यांच्या ‘गो सेट अ वॉचमन’ या अप्रकाशित हस्तलिखिताचं पुस्तक होतंय म्हटल्यावर अनेकांना ते वाचावंसं वाटणार, हे उघड आहे. ‘लोकसत्ता- बुकमार्क’नंही, हेमंत कर्णिक यांचा ‘मॉकिंगबर्ड’बद्दलचा लेख छापून या लेखिकेचं दुसरं पुस्तक कसं असेल, याबद्दलच्या उत्कंठेत आपला वाटा उचलला होता.
मात्र ही उत्कंठा खोटीच ठरणार की काय, अशी श्ांका यावी असं एक वादळ मध्येच घोंघावलं. ‘गो सेट अ वॉचमन’ हे पुस्तक प्रकाशित व्हावं की होऊ नये, याचा निर्णय घेण्याच्या परिस्थितीत स्वत हार्पर ली नाहीत, त्यामुळे त्यांच्या एजंटानं कपटाने ही बातमी पसरवलेली असून त्यात तथ्य नाही, असा ‘शोध’ अमेरिकेच्या अटलांटा राज्यातल्या एका स्थानिक पत्रकारानं लावला. हा स्थानिक पत्रकार म्हणे, हार्पर ली ज्या वृद्धाश्रमात राहतात, तिथेही जाऊन आला होता आणि ली यांना भेटायचा वारंवार प्रयत्न करूनही त्या भेटल्या नव्हत्या. त्याच्या एका पत्राला तर त्यांनी ‘गो अवे’ अशा तीव्र शब्दांत उत्तर दिलं होतं. एवढय़ावरून, त्यांची मनस्थिती ठीक नाहीच असा निष्कर्ष या पत्रकारानं काढला. हे प्रकरण इतकं लांबलं की, कुणीतरी मध्येच अटलांटा प्रशासनाच्या वृद्ध-सुरक्षा विभागाला पत्र लिहिलं आणि ‘संमतीविना पुस्तक प्रकाशनाच्या घोषणा करणं ही हार्पर ली यांची फसवणूकच होत्येय.. तुम्ही लक्ष घाला’ अशी विनंती केली. ही विनंती त्या प्रशासकीय विभागानं मान्य केली आणि चौकशीही सुरू केली.
अखेर, त्या चौकशीचा निष्कर्ष गुरुवारी आला! हार्पर ली या मानसिक आणि बौद्धिकदृष्टय़ा चांगल्या स्थितीतच आहेत, त्यामुळे त्यांची संमती खोटेपणानं जाहीर केल्याच्या तक्रारींत तथ्य नाही, असा निर्वाळा चौकशीअंती जाहीर झाला. न्यूयॉर्क टाइम्स, गार्डियन, बीबीसी, अशा माध्यमांतून अटलांटिकच्या दोन्ही तटांवर ‘येणार की नाही दुसरं पुस्तक?’ अशा कुशंका व्यक्त होऊ लागल्या होत्या, त्यांना पूर्णविराम मिळाला आणि हे पुस्तक येणार म्हणजे येणारच, हे अखेर वृद्ध-सुरक्षा विभागामुळे का होईना, स्पष्ट झालं!
संग्रहित लेख, दिनांक 14th Mar 2015 रोजी प्रकाशित
येणार म्हणजे, येणारच!
‘टु किल अ मॉकिंगबर्ड’ या हार्पर ली यांच्या गाजलेल्या कादंबरीनंतर तब्बल ५५ वर्षांनी त्यांचं दुसरं पुस्तक अखेर वाचकांहाती पडणार, अशी बातमी फेब्रुवारीत आली, तेव्हा अनेकजण ‘महिरले’ होते.

First published on: 14-03-2015 at 01:21 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To kill mockingbird novel by harper lee