काय ते बॉलीवूडचे घेऊन बसलात हो! ते दक्षिणेचे टॉलीवूड बघा. तिकडे सिनेमा संपला की राजकारण सुरू. या दोहोतून येणारे देवत्व जोडीला आहेच. बॉलीवूडमध्ये काय आहे? ते अमिताभ, शत्रुघ्न, नगमा. मारे मोठा गाजावाजा करत राजकारणात गेले अन् गटांगळ्या खात परत आले. त्या हेमाजी बिचाऱ्या टिकल्या. तशा त्या फारशा बोलतही नाहीतच म्हणा! इकडे अभिनेता म्हातारा झाला की कुणी विचारत नाही. तिकडे बघा- रजनी काय किंवा कमल काय, साठी उलटली, तरी त्यांच्या देवळांची संख्या वाढतेच आहे. आता तर रजनीने घोषणाच केलीय, निवडणुकीत उतरण्याची. दगडांचा देव नाकारणारे लोक माणसाला देव समजू लागल्यावर त्याने तरी का मागे राहावे? सिनेमातला नायक असो वा मुख्यमंत्री, दोघांनाही दुर्जनांचा नाश करून सज्जनांना न्याय द्यावा लागतोच ना! उद्दिष्ट एकच असल्यावर भूमिका कुठलीही असली तरी काय फरक पडतो? हा साधा सरळ विचार उत्तरेतले लोक फार करत नाहीत. म्हणून तर त्यांना राजकारणातल्या बेगडी नेत्यांचा आधार घ्यावा लागतो. त्यांचा खोटा अभिनय खरा मानून घ्यावा लागतो. दक्षिणेत तसा बेगडीपणा नाहीच. त्यामुळे नटांना सिनेमा असो वा राजकारण, कायम स्पर्धेला तयार राहावेच लागते. आता रजनीचेच बघा ना! चाहत्यांची संघटना काढून काही वर्षे झाली, पण योग्य संधीची वाट बघत होता तो! आपल्याला कुणी मराठी म्हणू नये, बडोदा घराण्याशी नाव जोडू नये, कानडी तर म्हणूच नये यासाठी प्रचंड काळजी घेतल्यावर तो आता सज्ज झालाय. शेवटी प्रश्न अस्सल तमिळ अस्मितेचा आहे ना! त्यावर कुणी शंका घ्यायला नको म्हणून. जयललितांनाही अशीच काळजी घ्यावी लागली होती. तरी मधे मधे त्यांचे कानडीपण समोर यायचेच. त्यांचा पूर्वानुभव ठाऊक असलेल्या रजनीने थोडा उशीर केला तर बिघडले कुठे? शेवटी सामना मतदारांशी नाही तर भक्तांशी आहे. ते पडदा असो वा देऊळ, हळदीकुंकू टाकायला केव्हाही तयार असतात. फक्त त्यांच्या श्रद्धेला धक्का पोहोचला नाही म्हणजे झाले! इतकी वर्षे सिनेमात काम करून जिवंत अभिनय करण्यात तरबेज झालेल्या रजनीला हे ठाऊक असणारच ना! समोर प्रेक्षक असो वा जनता, मोहिनी घालण्यासाठी फार काही करावे लागतच नाही. दोनचार नव्या लकबी लोकप्रिय कशा होतील ते बघायचे. मग ती डोळ्यांवर गॉगल लावण्याची असो वा उंचावर फेकलेली सिगरेट ओठांत पकडण्याची असो अथवा पिस्तुलातल्या एकाच गोळीचे तीन तुकडे करून तिघांना ठार मारण्याची असो. एकदा का भक्त खूश झाले की राज्यकारभारसुद्धा निवांतपणे करता येतो. जोडीला अम्माच्या जागी येणारे ‘रजनी कँटीन’ आहेच की! आता रजनीसमोर काळजीचे विषय दोनच. मराठी माणसांनी ‘हा आमचा, मूळ नाव शिवाजी’ असा गळा काढायला नको. कानडींनी तर नकोच नको. आता अम्मा नाहीत, त्यांची धूर्त मैत्रीण तर गजाआडच आहे. करुणानिधींच्या घरातच भांडणे आहेत. अशा वेळी करिष्मा करणारा उरतोच कोण? रजनीच ना! मग संधी साधण्याची योग्य वेळ हीच आहे असा विचार तो करत असेल तर त्यात गैर ते काय? तशीही हसनबाबूची चिंता तो करत नाही. त्याची देवळे कमी; क्लबही छोटे! रजनीच्या दुसऱ्या काळजीचा विषय आहे देशपातळीवर लोकप्रिय असलेला राजकीय नट. राजकारणातल्या अभिनयात त्याला मागे टाकायचे तर त्याच्याशी हात मिळवायचा की दोन हात करायचे याच काळजीने त्याला सध्या ग्रासले आहे म्हणे!