आता राज्यात खराखुरा ‘आनंदाचा दिनु’ अवतरला आहे. तिकडे देशाचे दरडोई उत्पन्न कितीही खालावले, महागाईचा निर्देशांक कितीही भडकला, रुपया कितीही स्वस्त झाला, मंदीचे सावट कितीही गडद झाले तरीही, महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेस त्याची जराही झळ लागणार नाही असा अनवट सोहळा आता सुरू झाला आहे. आजवर, वडापाव खाऊन गुजराण करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या जगण्याचा संघर्ष पाहून सत्ताधाऱ्यांच्या मनाची होणारी तगमग आता शांत झाली आहे. कारण, या सोहळ्याला वचनपूर्तीच्या आनंदाची झालर लागली आहे. आता बाकीच्या निर्देशांकांचा आलेख कसाही वेडावाकडा झाला, तरी महाराष्ट्राच्या भूक निर्देशांकाचा आलेख मात्र, उतरताच राहणार आहे. कधीकाळी जुन्या सरकारने राज्यात ‘आनंद मंत्रालय’ स्थापन करण्याची घोषणा केली होती. इतरही अनेक लोककल्याणकारी घोषणांप्रमाणेच आनंद मंत्रालयाची ती घोषणाही बासनात विरघळून गेली असली, तरी आनंदाचा निर्देशांक मात्र आता उसळी मारून उभारी घेऊ लागला आहे. ही सारी करामत ज्या एका सोहळ्याची आहे त्याचे नाव, ‘शिवभोजन सोहळा’!.. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर राज्यातील काही नेमक्या खानावळींमध्ये या सोहळ्याचा प्रारंभ झाला. ज्यांचे नशीब बलवत्तर, त्यांना त्या शिवभोजनाच्या थाळीचा प्रसाद याचि देही अनुभवता आला. वचनपूर्तीची गोडी लाभलेली ही थाळी अगोदर उद्घाटनाच्या निमित्ताने चाखणाऱ्या नशीबवंतांपैकी सगळ्यांनाच फोटोत झळकण्याचे भाग्य लाभले नसले, तरी जागोजागी गाजावाजा करीत या सोहळ्याचे अनावरण झाले, आणि भुकेल्या जनताजनार्दनाच्या लोकसंख्येतील मोजक्यांच्या पोटात शिवभोजनाचा प्रसाद पडला. ठाण्यात पहिल्या थाळीचा आस्वाद घेऊन जितेंद्रभाऊ आव्हाड यांनी या वचनपूर्ती सोहळ्याचे उद्घाटन केले, आणि फेसबुक-ट्विटरादी समाजमाध्यमांतून जितेंद्रभाऊंचे फोटोही झळकले. समाजात छिद्रान्वेषी प्रवृत्ती सर्वत्र असतात. त्यांना एखाद्या छायाचित्रातील ‘फोकस’ केलेला भाग दिसत नाही, पण आजूबाजूच्या एखाद्या कोपऱ्यातील नकोशी वस्तू मात्र चटकन टिपता येते. जितेंद्रभाऊंच्या फोटोचेही तेच झाले. दहा रुपयांच्या शिवभोजन थाळीचा आस्वाद घेणाऱ्या जितेंद्रभाऊंच्या राजेशाही सोहळ्याप्रसंगी टेबलवर थाळीशेजारी असलेल्या वीस रुपयांच्या पाणी-बाटलीवर अनेक नजरा स्थिरावल्या, आणि शिवभोजनाऐवजी त्या पाण्याचीच जोरदार चर्चा झाली. तिकडे बीडमध्ये धनंजयभाऊ मुंडे यांनीही शिवभोजनाच्या पंगती उठविल्या. ज्येष्ठांना या थाळीचा प्रसाद स्वहस्ते अर्पण करणाऱ्या धनुभाऊंचा सोहळा मात्र, बाटली नसल्याने चर्चेत आलाच नाही. जितेंद्रभाऊंच्या सोहळ्याला वचनपूर्तीच्या आनंदाचे जोरदार भरते आले होते, असे म्हणतात. बहुधा भाऊंनी शिवभोजनाचा पहिला घास तोंडात घेताच, अनेकांनी मनातल्या मनात असंख्य घोषणांचा पाऊस पाडला असे म्हणतात. हा सगळा अनधिकृत वृत्तांत असला, तरी त्या क्षणी, सोहळ्याच्या प्रसंगी पार पाडावयाच्या परंपरेनुसार, ‘नाव’देखील घेतले, अशी गुप्त सूत्रांची माहिती आहे. अशा बातम्या समाजमाध्यमांवर झपाटय़ाने पसरतात. असाच कुणीतरी समाजमाध्यमकर्मी त्या सोहळ्याचा ‘याचि डोळां’ साक्षीदार होऊन कोणा कोपऱ्यात उभा असताना, त्याच्या कानावर ते शब्द पडले. ‘दहावाल्या थाळीसोबत वीसवाली बाटली, शिवथाळी संपवून भाऊंनी बोटे चाटली!’.. हे ऐकून त्या समाजमाध्यमकर्मीने मनातल्या मनात टाळ्याही वाजविल्या, पण अन्य उपस्थितांनी मनातल्या मनात दिलेल्या घोषणांचा आवाजच एवढा मोठा होता, की त्यामुळे त्याचा आवाज कुणालाच ऐकू आला नाही, अशी चर्चा आहे..