तसे हे नियम कुणी तयार केलेले नाहीत. तरीही चुकतमाकत का होईना प्रत्येक नेत्याने ते आत्मसात केलेले दिसतात. कारण एकच. यात प्रसिद्धीसोबत सहानुभूती मोफत मिळते. होय, आपण दु:ख-पर्यटनाबद्दल बोलत आहोत. हे करताना काय करायला हवे व काय नको याची मोठीच खबरदारी घ्यावी लागते. सर्वात आधी दु:ख निर्माण करणारे संकट कुठे उद्भवले? तिथे आपली सत्ता आहे की विरोधकांची? ज्यांच्या वाटय़ाला दु:ख आले त्यांची सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी काय? पीडितांचे जातीय उतरंडीतील स्थान कोणते? या प्रश्नांचा सखोल विचार करणे गरजेचे असते. सर्व गोष्टी योग्यरीत्या जुळून आल्या की निघण्याची तयारी करणे उत्तम! जाताना शक्यतो पांढरे कपडे घालावे. आपत्ती नैसर्गिक असेल तर घातलेला बूट वा चप्पल घरी परत येणार नाही याची तयारी ठेवावी लागते. शक्यतो अशा ठिकाणी हवाई मार्गाने प्रवास टाळला जातो. खराब रस्त्याने, चिखल तुडवत चालणे महत्त्वाचे. त्यातून योग्य तो परिणाम साधता येतो. बूट खराब होतील म्हणून सुरक्षा रक्षकांच्या हाताच्या पालखीवर बसणे अगदी चुकीचे. बाकी पीडितांची भेट घेताना चेहरा मलूल व शक्यतो दु:खी ठेवण्याचा प्रयत्न करणे, दु:खितांचा कैवार घेऊन हजर असलेल्या अधिकाऱ्यांना फटकारणे, न्याय मिळवून देऊ असे सांगताना स्वर आश्वासक राहील याची काळजी घेणे, दु:खाची तीव्रता व पीडितांकडून होणाऱ्या आक्रोशाचा स्तर बघून चेहऱ्यावरचे प्रतिक्रियावादी हावभाव नियंत्रित करणे हे ओघाने आलेच! जिथे जायचे आहे तिथे जमावबंदीचे कलम लागू असेल तर ते मोडण्याच्या तयारीने लगोलग निघणे केव्हाही उत्तम. रस्त्यात होणारी अडवणूक, मग अटक व सुटका नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा जाणे यातून चांगला टीआरपी मिळू शकतो हे प्रत्येकजण आजकाल लक्षात ठेवतोच. संकटग्रस्तांना भेटताना समवयस्क असेल तर कवेत घेणे, बुजुर्ग असेल तर पाया पडणे या कर्तव्याकडे लक्ष देणे गरजेचे. अनेकदा पोलीस वाट अडवतात. मग प्रचंड रेटारेटी सुरू होते. अशावेळी गर्दीच्या धक्काबुक्कीची वाट न पाहता रस्त्यात पडण्याचा क्षण साधता यायला हवा. तृणमूलच्या डेरेकसारखे हसे व्हायला नको. संकटग्रस्तांना भेटताना अनेकदा कार्यकर्ते रेटारेटी करतात. अशावेळी ज्याला भेटायचे आहे तोच बाजूला फेकला जातो. तसे होणार नाही याची काळजी घ्यावीच. संकटाचे स्वरूप मोठे असेल व तीन चार ठिकाणी जायचे असेल तर वारंवार कपडे बदलणे अतिशय वाईट. शिवराजजींपासून बोध घेत अनेकांनी ही सवय सोडून दिली असली तरी लोकप्रियतेच्या कोशात अडकलेला एखादा अजूनही ती पाळतोच हा भाग अलहिदा! असे पर्यटन करताना थांबण्याची जागा, जेवणाचा मेनू याकडे लक्ष देणे केव्हाही चांगले. साध्या विश्रामगृहात, मीठभाकरीचे जेवण हा उत्तम पर्याय. तोही अनेकांनी सध्या स्वीकारला आहेच. सर्वात शेवटी दु:खाची तीव्रता लक्षात घेऊन माध्यमांसमोर बोलताना पीडितांच्या पाठीशी आहोतच असे आश्वासन देणे, सरकारी पर्यटन असेल तर मदत जाहीर करणे, संकटास विरोधकांनाच जबाबदार ठरवत त्यांच्यावर टीका करणे, विरोधक असाल तर आंदोलनाची घोषणा करणे. तातडीच्या मदतीसाठी पक्षकार्यकर्त्यांना कामाला लावल्याचे जाहीर करणे आवश्यक. एकदाचे हे पार पाडले की नेते पडद्याआड जाऊन त्यांच्या पद्धतीने वागायला मोकळे! आता तुम्ही म्हणाल की यातून साध्य काय होते. तर पूर्वापार हे नियम रूढ करताना कुणी विचारच केला नाही हो! त्याला आम्ही काय करणार?