खरे तर आम्हाला जेवढी गुपिते ठाऊक आहेत ना, तेवढी कुणालाच नाहीत. शिक्षणसंस्था चालक कोठून किती पैसे घेतात, त्यातले किती शाळेवर व किती स्वत:वर खर्च करतात हे सारे आम्ही इतक्या वर्षांपासून जवळून बघत आलो पण आजवर कधी तोंड उघडले नाही. उघडणार तरी कसे? नोकरी जायची चिंता होतीच की! आता तर नव्या निर्णयाने ती चिंता आणखी गहिरी करून टाकली राव! शिक्षण क्षेत्रात चाललेल्या गैरव्यवहाराचे आम्ही खरे साक्षीदार. खरे तर सरकारने आमचा खबऱ्या म्हणून वापर करून घ्यायला हवा. ते न करता आम्हालाच संपवण्याची भाषा? भले आमचे पद सर्वात खालचे असेल पण त्यावर काम करायला सुद्धा निष्ठा लागते हो! ही नोकरी मिळवायची असेल तर प्रसंगी स्वयंपाक, मुले सांभाळणे, बाजारहाट ही सारी कौशल्ये अंगी असावी लागतात. साहेबांच्या होत हो मिळवणे शिकावे लागते. तुम्ही शाळेत असा वा साहेबांच्या घरी, पडेल ते काम करण्याची तयारी ठेवावी लागते. शाळेवर मोर्चा आला की सारी धावपळ करावी लागते. आता तुम्हीच सांगा, एवढे करूनसुद्धा शिक्षण क्षेत्राला आकार देण्यात आमचा काहीच वाटा नाही का? आमच्या कार्याची दखल घ्यायची सोडून आम्हालाच हद्दपार करायला निघालात? म्हणजे, कितीही अन्याय झाला तरी रोज हसत हसत काम करायची सवयच आम्हाला.. मग आमच्या व्यथेकडे लक्ष तरी कोण देणार म्हणा! तुम्हाला सांगतो, कंत्राटी पद्धत आली तर ही पदेच भरली जाणार नाहीत पुढे. सारे अनुदान चालकाच्या घशात. कॉपरेरेट मंडळी म्हणे कॉफी घेणे, झेरॉक्स काढणे ही कामे स्वत:ची स्वत:च करतात. पण कामाची सवय तुटलेले हे शाळेतले लोक विद्यार्थ्यांना कामाला जुंपतील. हे चालणार आहे का तुम्हाला? शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा दुवा अशी आजवरची आमची ओळख. संस्थाचालकाचा स्वभाव कसा, त्यांच्या डोक्यात कुणाला नोकरी देण्याचे घोळत आहे, शाळेतला कोण शिक्षक कसा, प्राचार्य कसे या साऱ्यांची माहिती आमच्याजवळ. ती गरजूंना उपलब्ध करून देत काम पुढे नेण्याचे कसब आम्ही आत्मसात केलेले. आता हे सारे कोण करणार? यात थोडे इकडचे तिकडे झाले तरी नोकरी जाण्याची भीती नसायची. आता कंत्राटी माणूस कशाला एवढी हिंमत दाखवेल? आम्हा शिपायांसारखी प्रामाणिक जमात या पृथ्वीतलावर नाही. गरजवंतांना, अडलेल्यांना रस्ता दाखवण्याचे काम आजवर आम्ही निष्ठेने केले. तेही फार अपेक्षा न बाळगता. शाळा असो वा साहेबांचे घर. आमचे महत्त्व संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला कळले. आता त्यालाच बेदखल करायला निघालेत तुम्ही! आज आमच्यावर गदा आणली, उद्या साऱ्याच शिपायांवर आणाल. अहो, शिपाई ही आपल्या कार्यसंस्कृतीची शान! तो असला की बरीच कामे हलकी होऊन जातात. परस्पर प्रकरणांचा निपटारा होतो. तेव्हा कायम टोपी घातलेल्या व सदैव गणवेशात वावरणाऱ्या या गरीब प्राण्यावर दया करा मुख्यमंत्रीजी. पाहिजे तर तुमच्या सभोवती वावरणाऱ्या आमच्या बांधवांना विचारा. तेही तुम्हाला आमचे अस्तित्व किती गरजेचे हेच सांगतील.