राज्यकर्त्यांना लोकशाही व्यवस्थेची जाणीव करून देण्याचा विषय तसा सकाळपासूनच त्यांच्या डोक्यात घोळत होता. आन्हिके आटोपल्यावर त्यांनी कुंचला हाती घेतला व सराईतपणे त्यांचा हात फिरू लागला. एव्हाना व्यंगचित्राला आकार येऊ लागला असतानाच फोनचा ‘बीप’ वाजला. एरवी ‘सायलेंट मोड’वर असलेला त्यांचा फोन एखादी कामगिरी फत्ते झाली तरच वाजत असे. तशी सोयच त्यांनी करून ठेवली होती. त्यामुळे आवाज येताच त्यांनी ‘स्क्रीन’वर बघितले. ‘खळ्ळऽऽखटय़ाक्ऽऽ यशस्वी’ असा संदीपचा संदेश वाचून ते सुखावले. झटपट चित्र पूर्ण करून त्यांनी टीव्ही सुरू केला. तोवर तोडफोडीची दृश्ये सुरू झाली होती. ‘मल्टिनॅशनल’ असली म्हणून काय झाले; इशारा दिल्यावर तर ऐकायलाच हवे ना! महाराष्ट्रात राहून मराठीचा गळा घोटणे कसे सहन करणार? आपण व्यंगचित्र काढले लोकशाहीवर अन् आनंदित झालो ठोकशाहीवर, असा विचार मनात येताच ते एकदम चरकले. त्यांनी हातातला ‘नॅपकिन’ ओठांवरून फिरवला. कलेच्या भरवशावर राजकारण थोडीच पुढे सरकणार? शेवटी चित्रांचा आवाज फार तर सुशिक्षितांच्या घरापर्यंत पोहोचेल, पण काठीचा आवाज सर्वदूर पसरतो. अगदी क्षणात. लोक म्हणतात, बंद पडणाऱ्या मराठी शाळांचा मुद्दा हाती का घेत नाही? अरे, तिथे काठी कुणावर चालवायची? इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना घालणाऱ्या पालकांवर? तसे करायचे म्हटले तर आमच्याच अर्ध्या सैनिकांना झोडपावे लागणार. मुद्दे कसे आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा घडवणारे हवेत. आता दोन तासांत ही कंपनी ताळ्यावर येईल. मग साधे ‘गूगल सर्च’ केले तरी जगभरात पक्षाचे नाव दिसेल! तशीही व्यक्तिश: आपल्याला हिंसा आवडत नाही. चित्रातून बोचकारे घेणाऱ्या प्रातिभ हिंसेवर आपले खरे प्रेम. त्याचा घाव शरीरावर नाही, मनावर होत असतो. मात्र केवळ मनावरच्या घावाने वठणीवर येणारे लोकच आता राहिले नाहीत. म्हणून तर काठीचा आधार घ्यावा लागतो. यामुळेच तर आपल्याकडली गर्दीही अलीकडे वाढतच चाललेली. भलेही दादू सत्तेत असला तरी! लोकांना फट्दिशी न्याय हवा असतो. तो मिळवून देण्याची ताकद केवळ आपल्याच पक्षात आहे, एवढा संदेश सर्वदूर गेला तरी पुरे! सत्ता काय, आज ना उद्या येईलच की! तसेही मिळमिळीत राजकारण आपल्याला आवडत नाहीच. साहेबांनासुद्धा ते आवडायचे नाहीच. त्यांचे खरे वारस आपणच. मराठी माणूस व भाषा हाच त्यांचा मूळ मुद्दा होता. तोच आपण हाती घेतला तर त्यात वाईट काय? आता दिवसागणिक याच मुद्दय़ाला धारदार करत न्यायचे. अगदी व्यंगचित्रासारखे! दाक्षिणात्य भाषांसमोर नांगी टाकणाऱ्या या कंपन्यांना येथेच मुजोरी कशी सुचते? तेही आपण असताना! लोक म्हणतात, मराठी माणूसच मराठी विसरत चाललाय; त्यासाठी काही करा. अरे, आपल्या अवगुणाकडे नंतर बघूच की! आधी बाहेरच्यांना सरळ करायला हवे. एकदा ते सुतासारखे सरळ झाले की आपसूकच आपल्या माणसांना मराठीची गोडी लागेल. ते विचारात गढले असतानाच वहिनी ‘मोबाइल’ घेऊन आत आल्या. त्यांनी कंपनीच्या ‘वेबसाइट’वरचा तो बदल मोठय़ाने वाचून दाखवला : ‘मराठी, लवकरच येत आहे.’ हे ऐकून ते सुखावले. तेवढय़ात साहाय्यकाने फोन त्यांच्या कानाला लावला. पलीकडून ‘सॉरी सॉरी’ ऐकून त्यांनी तो परत दिला अन् आठ दिवसांनी त्यांना ‘सदिच्छा’ भेटीसाठी बोलाव असे सांगत ते परत लोकशाहीच्या व्यंगचित्राकडे वळले..