(एक अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी यांची  भेट कार्यालयात न होता, भलत्याच ठिकाणी झाली. तेव्हा त्यांच्यामधला सुखसंवाद)

अधिकारी – कैसे हो ?

कर्मचारी – काय सांगू सर, माझा पुरता बाजा वाजवलाय या साऱ्यांनी. यांच्या कोठडीत असलो की वेगळा जबाब, त्यांच्या असलो की वेगळा. त्यामुळे बरेचदा मी कुठे काय बोललो तेच आठवत नाही. लिहून ठेवले तर तोही कागद हिसकावून वाचतात. कामाचा नसेल व विरोधात जाणारा असेल तर फाडून टाकतात.

अधिकारी – अरे मग एकच जबाब ठेवायचा की!

कर्मचारी – कसा ठेवणार? जागा बदलली की ‘तुला वाचवतो’ अशी लालूच दाखवून जबाब घेतात. सुटण्याची आशा पल्लवित झाली की बोलावेच लागते मग ते म्हणतील तसे. हे जाऊ द्या. तुम्ही कसे आहात? मजेत ना!

अधिकारी – लपूनछपून फिरण्यात कसली रे मजा! खरी मजा आहे ती बॉसगिरीतच. चलाख लोकांच्या ट्रिक ठाऊक होत्या म्हणून सापडलो नाही एवढेच. एकदा एका घरी आश्रय मागितला तर ‘लाहोर से आये हो या कराची से’ असे ऐकावे लागले.

कर्मचारी – मी आधीच सांगितले होते. सारे काही करेन पण एकटा सुळावर जाणार नाही. तुम्ही माझा बचाव करायचा सोडून कळपच बदलला.

अधिकारी – अरे, प्रतिकूल स्थितीत आक्रमण हाच बचाव असतो हे साधे सूत्र तुला कळले नाही त्याला मी काय करू?

कर्मचारी – (किंचित आवाज वाढवत) असे घूमजाव करू नका सर. कळप बदलला म्हणून सारे विसरायचे नसते. मला सेवेत घेणारे तर तुम्हीच होतात ना!

अधिकारी – धीरे बोलो. तुला सेवेत घेण्याचे ऋण तू मनात ठेव, तोंडावाटे प्रकट करू नको. अशा वेळी नाव कुणाचे घ्यायचे हे तुला चांगले ठाऊक आहे. माझे पुनर्वसन झाले की सांभाळून घेईन तुला.

कर्मचारी- आता आश्वासनावर विश्वासच राहिला नाही माझा. बडतर्फ असतानाही ती मिळाली म्हणून सेवेत आलो. पुन्हा बडतर्फ झाल्यावरही ती मिळतच आहेत. एकजात सारे सारखे. वापरून घेतात नुसते.

अधिकारी- हे तुला फारच उशिरा कळलेले दिसते. मी तर सेवेत आल्यापासून वापरायचे व वापरून घेऊ द्यायचे हे तत्त्व कटाक्षाने पाळत आलो. त्यामुळे मला कळप बदलाचा त्रासच कधी होत नाही.

कर्मचारी – तुमच्या या तत्त्वाचा बळी मी ठरलोय, त्याचे काय?

अधिकारी – अरे मी वरिष्ठ, तू कनिष्ठ. छोटय़ांच्या डोक्यावर पाय देऊन समोर जाण्याची आमची सवय जुनीच.

कर्मचारी – मग फायद्याच्या वेळी कशी समानता आठवते तुम्हा लोकांना?

अधिकारी- शट अप्! हा शब्दही काढू नको इथे. आयोगासमोर आहोत आपण. कार्यालयात नाही.

कर्मचारी – जाऊ द्या साहेब. आता देवच माझे रक्षण करेल.

अधिकारी – (हसत) देवावर नाही पण अव्यवस्थित व्यवस्थेवर विश्वास जरूर ठेव. तीच तुझ्या रक्षणासाठी अप्रत्यक्षपणे धावून येईल.

कर्मचारी – पण या साऱ्या प्रकरणांचे होणार काय शेवटी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधिकारी – फारच कच्चा लिंबू दिसतोस तू. अरे अशा प्रकरणांचे पुढे काय होते हे तुला ठाऊक झालेले असायला हवे. राजकारणात हवेतले बाण हवेतच विरत असतात. सत्तापालट झाल्यावर  बाकी सारेच आपल्याला विसरतील. (तेवढय़ात आसपासच्यांचा आरडाओरडा सुरू होतो. तो बघून दोघेही विरुद्ध दिशेला तोंड फिरवतात)