‘समर्थाऽ भवत्वाशिषा तेऽ भृषम्’ ही ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ची शेवटची ओळ भक्तिभावाने गाऊन झाली. शाखा विसर्जित झाली. तसा पहिला दुसऱ्याला म्हणाला, ‘चल, जरा गप्पा मारू.’ पहिल्याच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता बघत दुसरा लगेच तयार झाला. ‘सध्या जे काही चालले आहे ते बरोबर नाही. आपले आयुष्य आपण या पक्षाला सत्तेत आणण्यासाठी घालवले. आपल्या श्रमातून वाढलेला हा पक्ष सत्ताप्राप्तीनंतर इतरांपेक्षा वेगळा वागेल असे वाटले होते, पण तसे होताना दिसत नाही. काल त्या भागवताच्या पोराने आपल्याच एका जुन्या जाणत्याला बेदम मारले.’ पहिल्याच्या तोंडून भागवत हा शब्द ऐकून दुसरा चर्र झाला. ‘अरे हा शब्द वापरू नको, उगीच आजूबाजूच्यांचे कान टवकारतात. त्यापेक्षा संभाजीनगरचे एक खासदार म्हण!’ झालेली चूक पहिल्याच्या लक्षात आली, पण त्याच्यातली अस्वस्थता त्याला स्वस्थ बसू देईना.
‘आपण सत्तेचे स्वप्न हिंदूने हिंदूंना मारण्यासाठी पाहिले होते का? गेली आठशे वर्षे खाली मान घालून जगणाऱ्या हिंदूंना ताठ मानेने जगता यावे यासाठी आपले प्रयत्न होते. ते यशस्वी झाले, पण आता भलतेच बघायला मिळत आहे. तो तळकोकणातला नरुपुत्र रोज काय काय बरळतो. कसले घाण शब्द वापरतो. कुणाच्या अंगावर चिखल काय टाकतो. कुणी साखरेची गोष्ट काढली की कोंबडीची आठवण काय करून देतो. आता साखरेचा व कोंबडीचा संबंध काय? समोर दिसेल त्याला अंगावर घेतलेच पाहिजे ही आपली संस्कृ ती कधीच नव्हती. अशी शिकवण तर आपला परिवारही कधी देत नाही. तरीही या ‘आयात वस्तूं’कडून होणारे हे हिडीस प्रदर्शन थांबायला तयार नाही. पक्षात आल्यावर एक दिवस गणवेशात हजेरी लावली म्हणजे परिवार आपला झाला असे यांना कसे वाटू शकते?’ पहिल्याकडून होणारी प्रश्नांची सरबत्ती बघून दुसरा सुखावला. हा आपल्याच मनातले बोलतोय ही भावना त्यामागे होती. मग दुसऱ्यालाही हुरूप आला. ‘त्या छत्तीसगडमध्ये कुणा सिंग नावाच्या मंत्रीणबाई अशाच बरळल्या. अधिकाऱ्यांना खोलीत कोंडून पट्टय़ाने मारेन म्हणाल्या. निवडून येण्याच्या निकषावर आपण कुठले कुठले गणंग गोळा करतोय, त्यांना जबाबदाऱ्या पण देतोय आणि हे सारे पक्षाची अब्रू खड्डय़ात घालताहेत. शेवटी यात परिवाराचे नाक कापले जाते त्याचे काय? काँग्रेसने देशभरात जो गोंधळ घालून ठेवला तो निस्तरायचा सोडून आपलेच लोक नवा गोंधळ निर्माण करत असतील तर करायचे काय?’ दुसऱ्याचे म्हणणे ऐकून पहिल्याला आणखी बरे वाटले. आपल्या कुजबुजीकडे कुणाचे लक्ष तर नाही ना हे त्याने हळूच चौफेर नजर टाकून पाहून घेतले. आपण दुखणे तर समजून घेतले, पण उपचाराचे काय? यावर दोघांनाही उत्तर सापडेना. ही भावना वरिष्ठांपर्यंत नेली तरी ते ‘दिलेले काम करा, उगाच डोके चालवू नका’, हेच म्हणणार यावर दोघांचेही एकमत झाले. शेवटी सत्ता माणसालाच काय परिवारालासुद्धा बिघडवते या तर्कावर दोघेही येऊन थबकले. किती चांगले होते ते सत्ता नसतानाचे दिवस.. असे पहिल्याने म्हणताच दुसऱ्याने हसून दाद दिली. दोघेही आपापल्या वाटेने निघाले.. त्यांच्या पावलांतून आत्मनिर्भरतेचा निश्चय दिसून येत होता!
