सकाळी नेहमीप्रमाणे ऊर्मिला ‘डॉगी’ला घेऊन फिरण्यासाठी बाहेर पडली तेव्हा विचारांनी तिच्या डोक्यात गर्दी केली होती. मागे पंजाशी हात मिळवतानासुद्धा असेच घडले होते व आज शिवबंधनात अडकतानाही तेच. या नाना विचारांना थोपवणे कठीणच, असे म्हणत ती पुढे जायला निघाली तोच नाना या शब्दावर थबकली. तिला नेहमी घरातील चर्चेत येणारे नानासाहेब गोरे आठवले. आज पक्षबदलाच्या दिवशीच तत्त्वनिष्ठ माणसाची आठवण यावी हे वाईटच. आपले चुकत तर नाही ना अशी शंका मनात येताच ती थांबली. तेवढय़ात ‘डॉगी’ तिला समोर ओढू लागला. आता काहीही झाले तरी माघार घ्यायची नाही, असे म्हणत ती झपाझप चालू लागली. पण विचार पिच्छा सोडायला तयार नव्हतेच. वडिलांनी अगदी निष्ठेने आयुष्यभर समाजवाद जोपासला. त्यांना काय मिळाले? कार्यकर्ते होते, कार्यकर्तेच राहिले. असे आयुष्य जगण्यापेक्षा थोडी निष्ठा व्यवहारीपणे वापरली तर काय फरक पडतो? तशीही आता सेना पूर्वीची राहिली नाही. आघाडीत सामील झाल्यामुळे त्यांनाही ग्लॅमरस पण धर्मनिरपेक्ष चेहरा हवाच होता. सिनेमातली माणसे सुपर मॅन (नव्हे वुमन) असतात, चमत्कार करू शकतात ही दक्षिणेत निर्माण झालेली अंधश्रद्धा सध्या इथेही वेगाने पसरू लागेल, असा विचार मनात येताच ऊर्मिलाला हसू आले. तिला ‘चमत्कार’चे शूटिंगही आठवले. राजकारणातही नेहमी चमत्कार घडतच असतात. आता आपलेच बघा ना! सगळे समाजवादी जातात तसे आपणही काँग्रेसच्या कळपात शिरलो. लोकप्रियतेला जनमताची जोड मिळाली की सहज दिल्लीत पोहोचू असे तेव्हा वाटले होते पण नाही जमले. आणि आता अचानक सेनेचे निमंत्रण, वरून आमदारकीची ऑफर. इतक्या लवकर हे घडेल असे वाटलेच नव्हते. सेना काय किंवा काँग्रेस काय? या दोघांचा व आपला शत्रू एकच. पुन्हा दोघे आघाडीत. ताटातले वाटीत नि वाटीतले ताटात ठेवले तर फरक काय, असा विचार करत आपण हे निमंत्रण स्वीकारले. त्या हिमाचली, बंगालींपेक्षा मराठी मुलगी केव्हाही विचाराने सरसच. हेच आता दाखवून द्यायचे. वासंतिक वैचारिकता काय असते हे या बाहेरच्यांना काय कळणार? सध्याच्या कर्कश वातावरणाला सौम्यपणे भेदण्याची ताकद आहे आपल्यात. काही मदत लागली तर बाबा आहेतच की! खरे तर राजकारणात प्रवेश करतानाच आपण सेनेचा विचार करायला हवा होता. तेव्हा सत्तेत असूनसुद्धा सेनेचे विरोधकांसारखे वागणे हे आपल्या लक्षात कसे आले नाही? बाबांनीही याची आठवण करून दिली नाही. त्यांच्या डोक्यात सेनेची आधीची प्रतिमा फिट बसलेली. आता हा पक्ष बदललाय. गेल्या एक वर्षांत तर पूर्णच बदललाय. ‘देरसेही सही, सही मुकाम पे पहुंचे’ हे वाक्य आठवताच तिला हसू आले. आता मराठी पक्षात आल्यामुळे हिंदीचा प्रभाव मनातून काढून टाकायला हवा. हिंदीसाठी आहेत ना त्या. ज्यांना माझ्यामुळे काँग्रेसमधून सेनेत जावे लागले. खरेच, महाराष्ट्र किती उदारमतवादी! इथे वंचितच्या माणसाला काँग्रेस हात देते, काँग्रेसच्या माणसांना सेना बंधन बांधते. भाजपच्या लोकांना राष्ट्रवादी घडय़ाळ बांधते.. राजकारण किती बदलले काळाच्या ओघात. अगदी सिनेमासारखे! विचार करता करता आपण खूपच चाललो हे ऊर्मिलाच्या लक्षात आले. तेवढय़ात बाजूने जाणाऱ्या आलिशान मोटारीकडे बघून ‘डॉगी’ जोरात भुंकू लागला. ही गाडी देवरांची की निरुपमची? .. ऊर्मिलाकडे न पाहता गाडी गेलीसुद्धा!
संग्रहित लेख, दिनांक 2nd Dec 2020 रोजी प्रकाशित
सही मुकाम पे?!
तिला नेहमी घरातील चर्चेत येणारे नानासाहेब गोरे आठवले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 02-12-2020 at 02:48 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ulta chasma urmila matondkar shiv sena zws