|| संहिता जोशी
सध्या ‘कृत्रिम प्रज्ञा’ असं जिला म्हटलं जातं, तिनं विदेतला तोचतोचपणा काय आहे ते ओळखलं! ती युक्ती वापरून आपण कंटाळवाणी कामं कमी केली.. हे करताना ‘बुद्धी म्हणजे काय?’ याची उत्तरं बदलत गेली आहेत..
माझा एक ज्येष्ठ मित्र म्हणतो, ‘‘मी सिनेमा बघायला, गायला माणसं ठेवल्येत.’’ यातला विनोद काय ते सांगायची गरज नसावी. मध्यंतरी एका लेखात वाचलं – अवजारं वापरणं ही गोष्ट फक्त मनुष्यांपुरती मर्यादित नाही. चिम्पान्झी, आपले वानरगण (प्रायमेट) नातेवाईक, झाडाची काडी वापरून मुंग्या गोळा करून खातात. दगड वापरून कडक वस्तू फोडणंही इतर वानरगणांमध्ये दिसतं. मनुष्यांचा व्यवच्छेदक गुणधर्म म्हणजे गोष्टी स्वयंचलित करणं. चाक ही स्वयंचलनाची एक पायरी. चालण्याचा कंटाळा आला, वेगाची गंमत वाटली किंवा मोठं अंतर पार करायचं आहे, तर चाक वापरलं. चाक वापरून धान्य दळलं, नांगर चालवले.. आणि अशी किती तरी उदाहरणं देता येतील. आपल्याला नावडणारी, कंटाळवाणी वाटणारी कामं करण्यासाठी, किंवा मानवी शरीर आणि बुद्धीच्या मर्यादा येतात तिथे आपण यंत्र वापरण्याचा प्रयत्न करतो.
हल्ली विदाविज्ञान (डेटा सायन्स) या शब्दालाही फार ग्लॅमर नाही. पण कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशियल इंटलिजन्स) म्हटलं की लगेच काही महत्त्वाचं असावं असं लोकांना वाटतं. याचं कारण, मला वाटतं, बुद्धी या गोष्टीची आपल्याला हौस किंवा कदर आहे. मनुष्यप्राण्याला शिकार, धावणं, उंच उडी अशा अनेक प्रकारांत इतर अनेक प्राणी सहज हरवतील; त्यामुळे मनुष्यजातीची बदनामी झाली असं कोणीही म्हणणार नाही. पण इतर कोणत्याही प्राण्यांपेक्षा मनुष्यप्राण्याचा मेंदू अधिक प्रगत आहे, असं आपण समजतो. त्यामुळे आपल्याला नकोशी वाटणारी कामं (इतरांवर आणि आता) यंत्रांवर ढकलायला आपल्याला आवडतं.
आपल्याला नावडणारी, कंटाळवाणी वाटणारी कामं करण्याला ‘बुद्धी’ म्हणणार का? शाळेत आपल्याकडून पाढे घोटून घेतात किंवा हस्ताक्षर आणि शुद्धलेखन-स्पेलिंगच्या चाचण्या घेतात. ही कामं यंत्रांनी सहज होतात. मी गेले ११ महिने लेख लिहितेय, माझं अक्षर कसं आहे कोणीही विचारलेलं नाही. २७ आणि २९ चे पाढे आठवण्याचा प्रयत्नही मी करत नाही; ज्या संगणकावर लेख लिहिते, त्यावरच गुणाकार-भागाकारही सहज करता येतात. क्रिकेटच्या मॅचमध्ये जिंकण्यासाठी किती धावगती हवी किंवा एखादा शब्द मराठीत कुठून, कसा आला ही माहिती तशी रोचक, रंजक असते. यथावकाश अशा सगळ्या गोष्टी जालावर कुठे तरी लिहिल्या जातील आणि गूगल करून त्या शोधताही येतील. शब्दकोश किंवा विकिपीडिया ही उदाहरणं.
आपल्याला नकोशी वाटणारी कामं आपण नाहीशीच करतो – विहिरीतून पाणी शेंदणं हे काम मजेशीर वगरे नाही; शक्यतोवर जास्तीत जास्त घरांमध्ये नळ आणण्याचा विचार होतो आणि पाणी शेंदण्याचं, वाहून आणण्याचं कामच नाहीसं होतं. किंवा सांडपाण्याची आधुनिक सोय. किंवा कामं स्वयंचलित करण्याचा प्रयत्न करतो. दळणासाठी गिरण्या किंवा कपडे धुण्याची यंत्रं वापरून आपण आपल्यावर असणारं काम यंत्राकडून करवून घेतो. ही कामं शारीरिक श्रमांची.
तसे बौद्धिक श्रमही असतात. २७ चा पाढा! तो झाला की मग वाढत्या क्रमानं किचकट कामं यंत्राकडून करवून घेतली जातात. गाडी चालवताना आपल्या गाडीच्या फार जवळ इतर कोणतीही गाडी, मनुष्य, इमारत, गाय काहीही आलं तर गाडी आता आपण होऊन ब्रेक मारू शकते. हे तंत्रज्ञान आता साध्या (ज्या गाडय़ा चालवण्यासाठी मनुष्याची गरज आहे अशा) गाडय़ांमध्ये उपलब्ध आहे.
शारीरिक आणि बौद्धिक श्रम ज्यांत होतात ती कामं म्हणजे ज्यांत तोचतोचपणा आहे, जी कामं करून काहीही आनंद होत नाही, त्याला काहीही पर्याय नाही; अशी कामं स्वयंचलित करण्याकडे आपला भर असतो. अशी कामं बॉट्स आणि रोबॉट्स करतात. कामाच्या यांत्रिकीकरणामुळे नवीन नोकऱ्या निर्माण होण्याचं प्रमाण कमी होत जाईल आणि कमी शिक्षण-कौशल्यं लागणारी कामं हळूहळू कमी होत जातील; त्यातून निर्माण होणारे प्रश्न, वगरे याची चर्चा या लेखमालेच्या कक्षेबाहेरची आहे.
कृत्रिम प्रज्ञा म्हणून मिरवणारी सॉफ्टवेअरं किंवा संगणकीय आज्ञावलीला ‘बुद्धिमान’ म्हणता येईल का? मी त्याला बहुतेकदा ‘विदाविज्ञान’ म्हणते. लेखमालेत वारंवार येणारं वाक्य, विदेमध्ये दिसणारा पॅटर्न, तोचतोचपणा ओळखून नव्या विदेबद्दल भाकीत करणं हे विदाविज्ञानाचं सध्याचं मुख्य काम आहे. संगणकाला बुद्धिबळ खेळायला शिकवताना बुद्धिबळात वेगवेगळ्या सोंगटय़ा कशा चालतात, हे शिकवलं जातं. प्रतिस्पध्र्याची किती प्यादी मारली, म्हणजे तात्कालिक फायदा झाला का, याचा विचार न करता ज्या चाली केल्या त्यातून संगणक जिंकला का नाही, याकडे लक्ष द्यायला शिकवलं जातं.
गेल्याच आठवडय़ात एका फेसबुक मित्राची बातमी वाचली. जीवघेण्या दम्याचं निदान त्यानं लिहिलेल्या संगणकीय प्रणालीनं यशस्वीरीत्या केलं. लोक ट्विटरवर काय लिहीत आहेत, त्यातून त्यानं विदाविज्ञान वापरलं. दम्याचं निदान वेळेत झालं. पण यात संगणकानं जे केलं ते बुद्धीचं लक्षण होतं का? नाही. दम्याची लक्षणं काय असतात, हे त्याला माहीत होतं; लोकांच्या बोलण्यातून ती लक्षणं दिसली की या लोकांची इतर ट्वीट्स बघायची, त्या भागात या दम्याचे इतर रुग्ण आहेत का हे शोधायचं; अशा प्रकारच्या जीवघेण्या रोगाची लक्षणं शोधण्याच्या कामातला तोचतोचपणा यातून कमी झाला.
आपल्याकडे असणारी विदा कशासाठी वापरता येईल, याचा विचार विदावैज्ञानिकांनाच करावा लागतो. आपल्या स्मार्टफोनचा मायक्रोफोन बरेचदा सुरू असतो; अनेक अॅप्स वरवर निर्थक वाटतील असे सेन्सर्स वापरण्याची परवानगी मागत असतात. यातून बरीच विदा वेगवेगळ्या कंपन्यांना मिळते. त्यातून जीवघेण्या रोगाची साथ पसरण्याची शक्यता कुठे आहे, याचा अंदाज केला गेला. त्यासाठी विदावैज्ञानिकाला बुद्धी वापरावी लागली. विदाविज्ञानानं किंवा ‘कृत्रिम प्रज्ञा’ असं जिला म्हटलं जातं तिनं फक्त विदेतला तोचतोचपणा, पॅटर्न काय आहे ते ओळखलं.
विदाविज्ञानात गणिती-प्रारूपं (मॉडेल) वापरून रोगाची लक्षणं कोणत्या ट्वीटमध्ये दिसतात, हे ठरवलं जातं. प्रारूपांना विदेचं आकलनही होतं; रोग ओळखायला शिकवताना ज्या व्यक्तीची विदा वापरली नव्हती, तिची ट्वीट्स वापरून तिला दमा झाला आहे का नाही, हे ठरवता येतं; प्रारूप विदेची घोकंपट्टी करत नाही. मात्र त्याचा नक्की अर्थ लावण्यासाठी, कोणत्या शब्दावरून किंवा विदेवरून रोग आहे हे ठरवलं, हा निष्कर्ष काढण्यासाठी मानवी बुद्धीची गरज असते.
अमेरिकी सिनेमांत अनेकदा यंत्र विरुद्ध मनुष्य अशी सरधोपट मांडणी दिसते. ‘एक्स माकिना’ हा दणदणीत अपवाद. सध्याची परिस्थिती अशी की, यंत्रं अजूनही आपली बिनडोक आणि कंटाळवाणी कामंच करत आहेत. इतक्यात ते बदलेल याची चिन्हंही नाहीत. जसजशी यंत्रं प्रगत होत जात आहेत, तशी कंटाळवाण्या कामांची यादी वाढत चालली आहे. फक्त जीवघेणा दमा ‘आहे का नाही’ हे ठरवणं बुद्धीचं काम राहिलं नाही; ‘तसं का ठरवलं’ हे बुद्धीचं काम झालं.
बुद्धी म्हणजे नक्की काय, याचे तपशील विदाविज्ञानामुळे फारच भरभर बदलत आहेत. तोचतोचपणा असलेल्या कामांची यादी वाढत चालली आहे. सिनेमा बघण्यातला आनंद किंवा प्रारूपानं दम्याची लक्षणं कोणती ठरवली याचं आकलन यांत सध्या तरी मानवी बुद्धीची एकाधिकारशाही आहे!
लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. ईमेल : 314aditi@gmail.com