scorecardresearch

प्राचीन भारतातील विमानविद्या

भारतात ७००० वर्षांपासून विमानविद्या अस्तित्वात होती असे मांडणारा एक निबंध सादर केला.

aeronautical study in ancient india by Ravindra Rukmini Pandharinath
भारतात ७००० वर्षांपासून विमानविद्या अस्तित्वात होती, असा निबंध विज्ञान परिषदेत सादर झाला व यावर देशभरात चर्चा सुरू झाली.

भारतात ७००० वर्षांपासून विमानविद्या अस्तित्वात होती, असा निबंध विज्ञान परिषदेत सादर झाला व यावर देशभरात चर्चा सुरू झाली. ‘तेव्हाची विमाने पृथ्वीवरच नव्हे, तर परग्रहांवरदेखील जात असत. उलटसुलट कोणत्याही दिशेने उडणारे, आकार बदलणारे किंवा अदृश्य होणारे विमान’ आदी या निबंधातील केवळ कल्पनेच्या भराऱ्या आहेत. असे हास्यास्पद दावे का केले जातात व अनेकांचा त्यावर विश्वास का बसतो, हा खरा प्रश्न आहे..

प्राचीन भारतात धातुविज्ञानापासून अणुविज्ञानापर्यंत आणि विमानापासून क्लोिनग व प्लास्टिक सर्जरीपर्यंत बहुतेक सारे शोध लागले होते, असा दावा अनेक जण करतात. त्यात कितपत तथ्य आहे हे आपण येत्या काही लेखांतून तपासून पाहणार आहोत. सुरुवात विमानविद्येपासून करू या. जेव्हा एखादी बाब वैज्ञानिक परिषदेत किंवा वैज्ञानिक नियतकालिकातून वैज्ञानिक पद्धतीने मांडली जाते, तेव्हाच तिची दखल वैज्ञानिक पातळीवर घेण्यात येते. जानेवारी २०१५ मध्ये मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय विज्ञान परिषदेत (सायन्स काँग्रेस)  कॅप्टन आनंद बोडस व अमेय जाधव या दोघांनी भारतात ७००० वर्षांपासून विमानविद्या अस्तित्वात होती असे मांडणारा एक निबंध सादर केला. तेव्हापासून या वादाला तोंड फुटले व त्यावर अजूनही पडदा पडलेला नाही. आपण बोडस, जाधव व त्यांचे समर्थक यांचे म्हणणे प्रथम समजून घेऊ.

प्राचीन विमानविद्येचे समर्थन

भारतात विमानविद्या गेल्या ७००० वर्षांपासून अस्तित्वात आहे. महर्षी भारद्वाज यांनी ‘बृहद्विमानशास्त्र’ या ग्रंथात विमानबांधणी, उड्डाण व उपयोग यांसाठी ५०० मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, ज्यापैकी फक्त १००-१२० सूचना आज उपलब्ध आहेत. या निबंधासाठी या व वैमानिकशास्त्र या ग्रंथाचा आधार घेतला आहे; पण या विषयावर एकूण ९७ संदर्भग्रंथ आहेत. (यादी दिलेली नाही.) तेव्हाची विमाने ही आधुनिक काळातील विमानापेक्षा अनेक पटींनी उच्च दर्जाची होती. ती पृथ्वीवरच नव्हे, तर परग्रहांवरदेखील जात असत. विमानांचा आकार साधारणत: ६० फूटx६० फूट असा असे. काही विमाने तर २०० फूट लांबीची होती. काही विमाने ४० इंजिनांच्या जोरावर चालत. ही विमाने उजव्या, डाव्या किंवा मागच्या दिशेने उडू शकत. आवश्यकता पडल्यास आकाशात विमानाचा आकार लहान-मोठा करणे शक्य होते. सर्पागमन रहस्यानुसार बटन दाबताच विमान सापाप्रमाणे नागमोडी गतीने उडू लागते. परशब्दग्राहक रहस्यानुसार एक विशिष्ट यंत्र विमानात लावल्यास दुसऱ्या विमानात बसलेल्या व्यक्तींचे बोलणे ऐकू येऊ शकते. रूपाकर्षण रहस्यानुसार दुसऱ्या विमानाच्या आतील सर्व काही दिसते. शब्दाकर्षण मंत्राचा उपयोग करून २६ किमी परिसरातील आवाज ऐकू येतात. युद्धासाठी वापरण्यात येणाऱ्या विमानात शत्रूचे विमान नष्ट करणे, आपले विमान अदृश्य करणे अशा अनेक प्रकारच्या सुविधा होत्या. विमान चालविण्यासाठी विमानावर पडणारा सूर्यप्रकाश, वनस्पती तेल, महाकाय पात्रात ठेवलेल्या हजारो शेर पाऱ्याची वाफ आदींचा उपयोग करण्यात येई. तेव्हाचे वैमानिक पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींपासून बनविलेली वस्त्रे परिधान करत असत आणि गाय, म्हैस किंवा शेळीचे दूध हा त्यांचा आहार असे. ‘वैमानिकशास्त्र’ या पुस्तकात प्राचीन विमानांची रेखाटने दिली आहेत.

कल्पनेच्या भराऱ्या की विज्ञान?

विज्ञानाशी प्राथमिक परिचय असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला वरील वर्णन वाचताना वाक्या-वाक्याला ठेचकाळल्यासारखे होईल. ‘बृहद्विमानशास्त्र’ व ‘वैमानिकशास्त्र’ या ग्रंथांचा सर्वागीण अभ्यास करून बंगळूरु येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या प्रख्यात संस्थेतील एच एस मुकुंद व त्यांच्या ४ सहकाऱ्यांनी लिहिलेला एक शोधनिबंध ‘सायंटिफिक ओपिनियन’ या जर्नलमध्ये १९७४ मध्ये प्रकाशित झाला आहे. त्यात त्यांनी असे सिद्ध केले आहे की, प्रस्तुत ग्रंथ हे इ.स. १९०० ते १९२२ मध्ये लिहिले गेले. त्यातील भाषेची रचना पाहता ते हजारो वर्षांपूर्वी रचले गेल्याचा दावा टिकण्यासारखा नाही. वेदांतील भाषा अतिशय व्यामिश्र स्वरूपाची आहे, तर या ग्रंथातील भाषाशैली सहजसुलभ आहे. त्यात काढलेली विमानाची रेखाटने ही मजकुराशी सुसंगत नाहीत. ती स्थानिक अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका ड्राफ्ट्समनने काढली होती व त्यावर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतातील इंजिनीयर समूहात प्रचलित कल्पनांचा प्रभाव जाणवतो. शकुन, त्रिपुर, रुक्म आणि सुंदर या चार विमानांची रेखाटने पाहिल्यावर असे लक्षात येते की, त्यात विमानगतिशास्त्र (एरोडायनामिक्स) सोडाच, निदान सामान्य भौतिकी व भूमितीच्या प्राथमिक नियमांचाही विचार करण्यात आलेला नाही. विमानांचा आकार हा पक्ष्यांप्रमाणे लांबट व मागेपुढे निमुळता होत जाणारा असा असतो. त्यामुळेच त्याला हवेचा होणारा प्रतिरोध कमी होतो व उड्डाणाला आवश्यक ऊध्र्वगामी धक्का (अपवर्ड थ्रस्ट) मिळणे शक्य होते; परंतु या ग्रंथातील विमानांचा आकार चक्क बहुकोनी असून त्यात मनोऱ्यासारखे पुढे आलेले भाग आहेत. त्यामुळे उड्डाणाला मदत होण्याऐवजी अडथळा होण्याचीच दाट शक्यता आहे. सुंदर विमानात इंधन म्हणून गाढवाच्या मूत्राचा वापर केला जातो. शकुन विमानात त्यासाठी पंचामृत (दूध, दही, तूप, मध, गूळ यांचे मिश्रण) वापरले जाते, याबद्दल काही न बोललेलेच बरे. विमान बनविण्यासाठी ज्या धातूंचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यांची निर्मिती, गुणधर्म यांच्याविषयी कसलीही माहिती दिलेली नाही. प्रस्तुत निबंधात केलेले दावे पूर्णपणे अवैज्ञानिक किंवा हास्यास्पद स्वरूपाचे आहे. ते करताना वैज्ञानिक पद्धतीचे वारंवार उल्लंघन केले आहे.

साधे खेळण्यातले विमान बनवायचे असल्यास आपण काय करू? कागद, प्लास्टिक, पुठ्ठा, हलका धातू यांपैकी कोणत्या मटेरियलचा वापर करावा? जड मटेरियल वापरायचे झाल्यास गुरुत्वाकर्षणावर मात करण्यासाठी त्याला ऊर्जा कशी मिळेल? ते उडू लागल्यावर ते हवेत कसे तरंगत राहील? त्याला कसे वळविता येईल व सुरक्षितरीत्या खाली कसे उतरविता येईल? या सर्व बाबींचा आपण विचार करू. तो न करता आपण वैमानिकाचे कपडे, त्याचा आहार ठरवला व ते आपोआप आकाशात उडेल व तासन्तास उडत राहील, असे म्हटले तर काय होईल? प्रत्यक्ष विमाननिर्मिती ही हजारो कोटी डॉलरची गुंतवणूक, विविध विद्याशाखांमधील शेकडो शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व सुमारे तीन दशकांपासून सतत विकसित होत जाणारे विश्वव्यापी विज्ञान-तंत्रज्ञान, या सर्वाचा आधार असल्याशिवाय शक्य होत नाही. ते काहीही अस्तित्वात नसताना हजारो वर्षांपूर्वी आपल्या देशात विमाननिर्मिती होत होती असे मानणे म्हणजे अक्षरज्ञान नसणाऱ्या व्यक्तीने एकदम महाकाव्य रचले असे म्हणण्याजोगे आहे. आजचा बहुउपयोगी मोबाइल फोन अस्तित्वात येण्यापूर्वी साधा फोन, टीव्ही, रेडिओ, प्रतिमांचे संदेशवहन हे शोध लागले होते. त्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक्स ही ज्ञानशाखा विकसित झाली होती. विमानगतिशास्त्र विकसित होण्यापूर्वी गतीचे नियम व भौतिकीच्या प्राथमिक संकल्पनांची पायाभरणी झाली होती. विद्युतनिर्मिती, इंटर्नल कम्बश्चन इंजिन, खनिज इंधने यांचा शोध लागला होता. भारतात ७००० सोडाच, हजार वर्षांपूर्वी यापैकी कोणत्या गोष्टींचा शोध लागला असल्याचा कोणताही पुरावा अस्तित्वात नसताना एकदम विमाननिर्मितीचा दावा करणे हे कोणत्याही वैज्ञानिक निकषांवर टिकणार नाही. उलटसुलट कोणत्याही दिशेने उडणारे, आकार बदलणारे किंवा अदृश्य होणारे विमान या केवळ कल्पनेच्या भराऱ्या आहेत. पंचामृत किंवा गाढवाच्या मूत्राचा इंधन म्हणून वापर करून कोणी एक फूट लांबीचे टिनाचे विमान हवेत उडवून दाखवले तरी खूप होईल.

या सर्व चच्रेतून आणखी बरेच प्रश्न उपस्थित होतात.

असे हास्यास्पद दावे का केले जातात व अनेकांचा त्यावर विश्वास का बसतो? भारतीय परंपरेतील वैज्ञानिकतेविषयी केले जाणारे सर्व दावे असेच निर्थक आहेत का? पाश्चात्त्यांनी विकसित केलेली वैज्ञानिक परंपरा हीच प्रमाणभूत का मानावी? भारतात जर विमान बनविण्याइतपत प्रगत तंत्रज्ञान निर्माण झाले होते, तर ते कुठे गेले? त्याच्या खाणाखुणा कोठे दिसतात का? ऋग्वेदात जर विमाननिर्मितीचा उल्लेख आहे, तर त्यानंतरच्या शेकडो वर्षांच्या साहित्यात तो का आढळत नाही? भारतातील विज्ञान व तंत्रज्ञान लुप्त का व कसे झाले?

या व अशा प्रश्नांचा शोध पुढील लेखांतून घेऊ; पण (या लेखासह) कोणतीही गोष्ट वैज्ञानिक निकषांवर घासून पाहिल्याशिवाय स्वीकारू मात्र नका.

लेखक समाज-विज्ञान यांच्या आंतर संबंधांचे अभ्यासक व कार्यकर्ते आहेत. ई-मेल : ravindrarp@gmail.com

मराठीतील सर्व विज्ञान भान ( Vigyan-bhan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article about aeronautical study in ancient india by ravindra rukmini pandharinath