दासबोधात एके ठिकाणी समर्थानी ‘आता वंदू कविश्वर जे का शब्दसृष्टीचे ईश्वर’ असे म्हटले आहे. कारण ते एक सृष्टी निर्माण करत असतात. आणि मला वाटतं कवीच्या भावनांना, जाणिवांना आणि संवेदनांना शब्दरूप देणारी ती अमोघ शक्ती असते भाषा. मराठी भाषा ही मला कायम अशा एखाद्या दिव्य शक्तीसारखी वाटत आली आहे. मला असं वाटतं एखाद्या भाषेचं सौंदर्य आणि तिच्यातली ताकद एकाच वेळी अनुभवायची असेल तर त्या भाषेतील कविता अभ्यासावी. तिचे अगणित पदर प्रत्येक वेळी थक्क करून सोडतात. म्हणून तर आपली काव्य संस्कृती इतकी समृद्ध आहे. माझ्याच एका कवितेत मी

अलवार कधी तलवार कधी

पैठणी सुबक नऊवार कधी

जणू कस्तुरीचा दरवळ दैवी

ती सप्तसुरांवर स्वार कधी

डौलात फडकते रायगडी

नाचते कधी भीमेकाठी

ही माझी माय मराठी

असं वर्णन केलंय. या भाषा आणि ही काव्यपरंपरा एक वसा आहे. उलगडत जावे तितके तिचे पदर नव्याने सापडत जातात. अर्थात तिला आई मानून लेकरू होऊन तिच्या कुशीत शिरायची तुमची तयारी हवी. या भावनेतूनच मला कविता सापडत गेली आणि माझ्या जाणिवा समृद्ध होत गेल्या. कवितेने व्यक्त व्हायची ताकद दिली,आत्मविश्वास दिला आणि कुठल्याही गोष्टीकडे अगदी स्वत:कडेही त्रयस्थपणे पाहण्याचा दृष्टिकोन दिला. अर्थात याकरता मराठी भाषेचा आणि त्यातील समृद्ध काव्यपरंपरेचा मी आजन्म ऋणी आहे. मला नेहमी वाटतं

घेवोनी हिंडतो ज्ञानियाचा वसा।

वाचेवरी ठसा तुकयाचा।।

तैसे पाहो जाता आम्ही हो सोयरे।

म्हणवू लेकरे मराठीची।।

जरी भिन्न तिची रूपे आणि तऱ्हा।

उगमाशी झरा अमृताचा।।

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

-गुरु ठाकूर