ऐश्वर्या टिपणीस या दिल्लीच्या स्कूल ऑफ प्लानिंग अॅण्ड आर्किटेक्चर या संस्थेच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांनी देशातील संवर्धन वास्तुरचनाकार म्हणून पुरातन वास्तूंचा वारसा जपण्यात मोठे काम केले. मध्य प्रदेशातील महिदपूर किल्ल्याचे संवर्धन, डेहराडून येथील डून स्कूलच्या इमारतीचे संवर्धन हे त्यांचे प्रकल्प गाजले. त्यासाठी त्यांना युनेस्कोचा पुरस्कारही मिळाला होता. भारतातील ज्या फ्रेंच वारसा इमारती आहेत त्यांचे त्यांनी जतन केले आहे. चंद्रनगर ही कोलकात्यापासून ४० कि.मी. अंतरावर असलेली फ्रेंच वसाहत त्यांनी संवर्धन तंत्राने जपली. टिपणीस यांनी युरोपीय शहर संवर्धन या विषयात स्कॉटलंडच्या डँडी विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली. ब्रिटनमध्ये वास्तुरचनेचे प्रशिक्षण घेतले. ‘व्हर्नाक्युलर ट्रॅडिशन्स-कंटेम्पररी आर्किटेक्चर’ हे पुस्तक त्यांनी लिहिले असून अनेक वृत्तपत्रांतून वास्तुकलेवर लेखनही केले आहे. त्यांनी पश्चिम बंगालमधील चिनसुरा ही डच वास्तू संवर्धित केली असून जागतिक वारसा असलेल्या दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचा सर्वंकष संवर्धन व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
‘नवीन इमारतींच्या रचना तयार करण्यात इतर सहकाऱ्यांप्रमाणे माझे मन रमणार नव्हते, त्यामुळे यातील संवर्धन वास्तुरचनेची वेगळी वाट निवडली,’ असे त्या सांगतात. भूतकाळ व भविष्यकाळ यांचे नाते जोडण्याचे हे काम नक्कीच सोपे नाही, पण त्यात ऐश्वर्या यांनी मिळवलेले नैपुण्य हे निश्चितच शहरी संस्कृतीची जुनी ओळख जपणारे आहे.