अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाच्या ‘मध्यपूर्व, दक्षिण आशिया व आफ्रिका अभ्यास विभागा’त सहयोगी प्राध्यापक एवढीच अॅलिसन बुश यांची ओळख असती, तर त्यांच्या अकाली मृत्यूने भारतातील अनेक अभ्यासकांना चुटपुट लागली नसती. हिंदी साहित्याचा इतिहास या विषयात अॅलिसन यांचा अभ्यास होता, त्यात दिशादर्शक असे संशोधन त्या करू शकतील, असा विश्वास अनेकांना असतानाच, डाव अर्ध्यावर सोडून अॅलिसन निघून गेल्या. हिंदी साहित्याची परंपरा मोठी असली तरी, साधारण १७७० पासून पुढल्या ‘रीती’काव्याचा सखोल अभ्यास अॅलिसन बुश यांनी केला. आपल्या महाराष्ट्रात जो काळ ‘पंत आणि तंत’ यांच्या – म्हणजे पंडिती आणि शाहिरी काव्याचा – आहे, त्याच्याशी हिंदीतील ‘रीती’ काव्याच्या काळाचे एकच साधर्म्य असे की, कुणी ना कुणी आश्रयदाता असताना या काळात झालेली काव्यनिर्मिती ही अधिक लोकांपर्यंत पोहोचणारी ठरे. त्या छपाईपूर्व काळातील अनेक हस्तलिखितांचा अभ्यास अॅलिसन यांनी केला. ‘द पोएट्री ऑफ किंग्ज : क्लासिकल हिंदी लिटरेचर इन मुघल इंडिया’ (२०११) हा त्यांचा पहिला अभ्यासग्रंथ, मुघलकाळातील हिंदीची स्थितीगती आणि भाषेवरील राजकीय प्रभाव यांचा सूक्ष्म अभ्यास त्या करीत आहेत, याची ग्वाही देणारा ठरला. कोलंबिया विद्यापीठात गतकालीन हिंदी साहित्याचा पूर्णवेळ अभ्यासक्रम नाही. तरीही वर्षांकाठी एक अंशकालीन अभ्यासक्रम त्या चालवीत. एरवी त्यांना मुघलकालीन भारताचा इतिहासही येथे अॅलिसन यांना शिकवावा लागे. त्याचे चांगले पडसाद त्यांच्या भाषाभ्यासात आणि काव्याभ्यासात उमटलेले दिसतात. सम्राट अकबराच्या काळात जयपूरचे राजे मानसिंह यांचे चरित्र लिहिले गेले त्याचा अभ्यास करताना ‘एका राजाचे बादशहाच्या काळातील चरित्र’ हे भान अॅलिसन यांनी कायम ठेवले! हिंदी पंतकाव्य हे निव्वळ शब्दफुलोरा न मानता, त्या शब्दांआडचे सूचक अर्थ, प्रतिमासृष्टीचा परिसर आणि त्यातून होणारे व्यापक जीवनदर्शन यांकडे पाहायला हवे, अशा विश्वासातून अभ्यास करणाऱ्यांपैकी त्या होत्या. त्यामुळेच त्यांनी अभ्यासान्ती केलेली निरीक्षणे ही अर्थाच्या नव्या दिशा उलगडणारी आणि भाषिक इतिहासाला राजकीय/सामाजिक इतिहासाशी जोडणारी ठरली. आजवर हे काम झाले नाही असे नव्हे, परंतु भाषेच्या सामाजिक अभ्यासामागे विशिष्ट राजकीय विचारसरणी असे. ती न पाळता अॅलिसन कार्यरत राहिल्या. सुषमा स्वराज परराष्ट्रमंत्री असताना, सप्टेंबर २०१८ मध्ये झालेल्या जागतिक हिंदी संमेलनात अॅलिसन यांना ‘विश्व हिन्दी सम्मान’ देण्यात आला होता.
संग्रहित लेख, दिनांक 5th Nov 2019 रोजी प्रकाशित
अॅलिसन बुश
हिंदी साहित्याची परंपरा मोठी असली तरी, साधारण १७७० पासून पुढल्या ‘रीती’काव्याचा सखोल अभ्यास अॅलिसन बुश यांनी केला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 05-11-2019 at 00:03 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alison bush profile abn