उच्चवर्णीयांच्या तिरस्कृत नजरांपासून स्वत:चा बचाव करत आयुष्याचा पूर्वार्ध शांतपणे जगणारे, पण उत्तरार्धात याच नजरांचा स्फोट झाल्यावर भीषण शोकांतिकेला सामोरे जावे लागल्याने देशभर चर्चेत आलेले भैयालाल भोतमांगे अखेर गेले. माणूस आशेवर जगतो. भोतमांगेसुद्धा न्याय मिळेल, या आशेवर जगत होते. मात्र हृदयविकाराच्या एका झटक्याने त्यांची ही आशा हिरावली गेली.

भैयालाल मूळचे भंडारा जिल्ह्य़ातील तुमसरजवळच्या अंबागडचे. खरलांजी हे त्यांच्या मामाचे गाव. याच गावात भोतमांगे कुटुंबाची पाच एकर शेती होती. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यातील प्रत्येकी एक एकर जागा पाच भावंडांच्या वाटय़ाला आली. लग्नानंतर खरलांजीच्या गावकुसाबाहेर दलित वस्तीत बिऱ्हाड थाटत शेती व शेतमजुरी करणारे भोतमांगे केवळ आठवीपर्यंत शिकलेले होते. शिक्षण कमी असले तरी आंबेडकरांचा ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’, हा मूलमंत्र आत्मसात केलेल्या भोतमांगेंना आपली तीनही मुले शिकावीत असे वाटायचे. त्यासाठीच त्यांची संघर्षमय धडपड सुरू होती. गावगाडय़ातील सामाजिक विषमतेचे चटके सोसूनसुद्धा ताठ मानेने जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या भोतमांगे कुटुंबासाठी २००६ मधील २९ सप्टेंबरचा दिवस काळाकुट्ट ठरला. या गावपरिसरात सावकारी करणाऱ्या सिद्धार्थ गजभिये या परिचिताच्या सवर्णाशी झालेल्या वादात साक्ष देण्याचा निर्धार भोतमांगेच्या पत्नी सुरेखाने दाखवल्याने संतप्त झालेल्या सवर्णानी या कुटुंबातील चौघांना अगदी निर्घृणपणे ठार केले. केवळ शेतात होते म्हणून बचावलेल्या भैयालालचा नंतर न्यायासाठी जो संघर्ष सुरू झाला तो अगदी त्यांच्या निधनापर्यंत सुरूच राहिला. खालच्या जातीतला माणूस सावकारी करतो, त्याच्यासमोर आपल्याला शरण जावे लागते आणि याच सावकाराची बाजू गावगाडय़ातील शेवटच्या पायरीवर असलेले भोतमांगे कुटुंब घेते, हे सहन न झालेल्या कफल्लक, पण उच्च जातीचा माज कायम असणाऱ्यांनी घडवून आणलेल्या या नृशंस हत्याकांडानंतर सारा देश हादरला. सारे समाजमन भैयालालच्या पाठीशी उभे राहिले, पण त्यांच्यातल्या एकाकीपणाची भावना अखेपर्यंत कायम राहिली. भंडाऱ्याला वसतिगृहातील शिपायाची नोकरी, निवृत्तीनंतर विशेष बाब म्हणून मिळालेली मुदतवाढ व यातून मिळणाऱ्या ठरावीक उत्पन्नाच्या बळावर भैयालाल न्याय मिळावा म्हणून कधी नागपूर, तर कधी दिल्लीच्या चकरा मारत राहिले. मात्र सर्वोच्च न्यायव्यवस्थेपर्यंत त्यांची वेदना पोहोचलीच नाही. भंडारा न्यायालयाने दिलेली फाशी उच्च न्यायालयात जन्मठेपेपर्यंत बदलली. आता सर्वोच्च पातळीवर तरी आठ आरोपींच्या गळ्यात फास अडकेल, या आशेवर असलेल्या भैयालालला व्यवस्थेशी दोन हात करताना पावलागणिक हवालदिल करणारा पराभवच बघावा लागला.

मृत्यूच्या दोनच दिवस आधी ते नागपुरात वकिलांशी बोलले होते. कधी सुरू होईल सुनावणी, हा त्यांचा प्रश्न आता मृत्यूनेच संपवून टाकला आहे. भैयालालच्या मागे सारा समाज उभा राहिला. सरकारने पाठीशी असल्याचे दाखवले, पण पूर्ण व्यवस्था मात्र त्याला न्याय मिळावा म्हणून तत्परतेने वागली नाही आणि त्याच न्यायाचे स्वप्न अधुरेच राहिले. आता त्यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाचा निकाल काहीही लागला तरी फुले, आंबेडकर, शाहूंच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या या भूमीत खरलांजीची भळभळती जखम मात्र कायम राहणार आहे. कारण, परिस्थितीत फारसा फरक पडलेला दिसत नाही.